विकासवाटा विस्तारणार

    25-Nov-2024
Total Views |

india china 
 
तुम्ही एकवेळ तुमचे मित्र बदलू शकता, परंतु आपले शेजारी बदलता येत नाहीत,” असे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. हीच स्थिती भारतालाही लागू होते. भारताला असे शेजारी आहेत, ज्यांच्यासोबत संबंध नेहमीच कधी कठोर, कधी मधुर असे राहिले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यामध्ये सीमावाद सुरू होता. अनेक चर्चेच्या फेर्‍या पार पडूनही, यावर कोणताही तोडगा निघालेला नव्हता. मात्र, ‘ब्रिक्स’ संमेलनापूर्वीच सीमेवर पेट्रोलिंग करण्याबाबतच्या विषयावर, भारत-चीनमध्ये सहमती झाली. ज्यातून चर्चेची नवे दारे खुली झाली आहे. त्याचप्रमाणे ‘ब्रिक्स’ संमेलनात, तब्बल पाच वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर नुकतेच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीकरिता व्हिएनतीयानला गेले होते. याचदरम्यान त्यांनी चीनी संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा केली. यामुळे भारत-चीन संबंध सामान्य होत असल्याचे दिसून येत आहे. याचे जागतिक पटलावर काय परिणाम होतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
 
चीनची अधिकाधिक सीमा भारताला लागून आहे. ही सीमा तब्बल ३ हजार, ४८८ किलोमीटर इतकी आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक सांस्कृतिक साम्यदेखील पाहायला मिळते. पूर्वी रेशम मार्गाची दक्षिण शाखा चीनच्या शियान शहराला आणि भारताच्या पाटलीपुत्र शहराला जोडत होती. पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या शताब्दीला अनेक बौद्ध तीर्थयात्री आणि विद्वानांनी या मार्गाने चीनची यात्रा केली होती. हेच संबंध आता आधुनिक युगातही अधिक मजबूत होत आहे. सद्यस्थितीत विचार करता, १९६२ सालच्या युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरूच होता. मात्र, आता ‘एससीओ’, ‘ब्रिक्स’ यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे दोन्ही देश सदस्य आहेत. मागील चार वर्षांपासून सीमेवर सुरू असलेली तणावपूर्ण परिस्थिती, आता जवळपास निवळली आहे. ‘ब्रिक्स’ संमेलनादरम्यान दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्येही चर्चा झाल्यानंतर, दोन्ही देशांचे संबंध आता सामान्य झाले आहेत. भारत आणि चीनमधील बदलत्या समीकरणांमुळे अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
 
इकडे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा दणदणीत पराभव केला. ट्रम्प हे चीनविरोधात नेहमी आक्रमक परराष्ट्र नितीचा पुरस्कार करत असतात. त्याउलट भारतासोबत मात्र ट्रम्प नेहमीच मैत्रीपूर्ण भूमिका घेतात. त्यामुळे चीनला भारताशी जुळवून घेण्याशिवाय दुसरा पर्यायदेखील शिल्लक राहात नाही. जागतिक स्तरावर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. भारत प्रशांत क्षेत्रालाही मोठे महत्त्व आले आहे. चीनला आता ‘क्वाड’ संघटनेची भीती वाटू लागली आहे. चीनची अर्थव्यवस्थाही गडबडू लागली आहे. विकास होण्याऐवजी चीन अधोगतीकडे वाटचाल करू लागला आहे. मंदीमुळे आर्थिक व्यवहार कमी होत असून, विकास दर कमी होत चालला आहे. २०२३ साली असलेला ५.२ टक्के विकास दर २०२४ साली ४.८ टक्के इतकाच राहण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी जानेवारीत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. ट्रम्प चीनकडून निर्यात केल्या जाणार्‍या साहित्यावर अधिकाधिक कर लावणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चीनला पूर्वी बायडन काळात होणारे व्यापाराचे फायदे ट्रम्प काळात तोट्याचे ठरणार आहे. चीनकडे आर्थिक व्यवहारासाठी भारतासारखा दुसरा पर्याय सध्या तरी दिसत नाही.
 
चीनमध्ये सरासरी वयोमानदेखील वाढत आहे. घटती युवकांची संख्या आणि वाढत जाणारी ज्येष्ठांची संख्या चीनसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताशी पंगा घेण्यात चीनला सर्वाधिक तोटा आहे. पाकिस्तानमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, चीनला म्हणावा तसा फायदा झाला नाही. भारताला घेरण्याचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले. तिकडे श्रीलंका, बांगलादेशमध्ये चीनला धडा मिळालाच आहे. मुळात चीन-भारताचे संबंध सामान्य होणे ही दोन्ही देशासाठी चांगले लक्षण असून, यात दोन्ही देशांचा फायदा आहे. यामुळे भारताचे पश्चिमी जगतातील स्थानदेखील आणखी मजबूत होणार आहे. तसेही भारताच्या नेहमी चर्चेतून समाधान या नितीला प्राधान्य असते. त्यामुळेच भारत-चीन संबंध आता सामान्य होत असून, यामुळे भारताच्या विकासवाटा आणखी विस्तारतील एवढे मात्र नक्की.
 
पवन बोरस्ते