दिल्लीमध्ये वायु प्रदुषणाची स्थिती गंभीर, आप सरकारचे मात्र दुर्लक्ष!
22-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये वायुप्रदुषणाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार मंगळवारी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३१८ अर्थात अतिखराब श्रेणीत पोहोचला होता. त्याचवेळी सत्ताधारी आप मात्र प्रदुषणाविषयी अन्य राज्यांना जबाबदार धरण्यात धन्यता मानत आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी अत्यंत वाईट स्थितीत पोहोचली आहे. आनंद विहार परिसरात मंगळवारी सर्वात वाईट परिस्थिती होती. येथे ३८२ एक्यूआयची नोंद जाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर बऱ्यापैकी प्रदूषित झाला आहे. दिल्ली सरकारने हा भाग हॉटस्पॉट भागात ठेवलेले आहे. येथे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील 16 भागांना रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहे, येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे आढळून आले आहे. दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी दररोज अतिखराब श्रेणीत जात असताना सत्ताधारी आपचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅनॉट प्लेस परिसरात उभारण्यात आलेला स्मॉग टॉवर अद्यापही बंद स्थिती आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये पराली अर्थात पिकांचे उरलेले अवशेष जाळण्यास प्रारंभ झाला असून त्यामुळे दिल्लीत येत्या काही दिवसात प्रदुषणाची स्थिती आणखी गंभीर होणार आहे. मात्र, पंजाबमध्ये सत्ता येण्यापूर्वी पंजाबवर खापर फोडणारा आप आता प्रदुषणाचे खापर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांवर फोडत आहे.