"स्थानिक कायद्यांचे पालन करा"; अमेरिकेत भारतीयांच्या अटकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून परदेशात प्रवास करणाऱ्यांना कडक सूचना

    18-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (MEA) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी १७ जुलैला अलिकडच्या काळात अमेरिकेत अटक झालेल्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणांवर भाष्य केले. यावेळी परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना कडक सूचना देत स्थानिक कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आणि परदेशात भारताच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. परदेशात भारतीयांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींच्या वाढत्या घटनांमुळे, परदेशात बेकायदेशीर वर्तनाचे परिणाम अधोरेखित होत असताना ही खबरदारी घेण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दोन प्रकरणांचा उल्लेख करत या मुद्दयावर प्रकाश टाकला. यापैकी पहिले एका भारतीय पर्यटकाला अमेरिकेतील एका दुकानातून सुमारे $१,००० किमतीच्या वस्तू चोरताना पकडले गेले आणि दुसरे चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित आरोपाखाली वॉशिंग्टन राज्यात ४२ वर्षीय भारतीय नागरिकाला ताब्यात घेण्यात आले."परदेशात जाणाऱ्या आमच्या सर्व लोकांना आमची सतत विनंती आहे की, त्यांनी त्या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे आणि देशाची चांगली प्रतिमा निर्माण करावी," असे यावेळी जयस्वाल म्हणाले.

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणाबाबत ते म्हणाले, "हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. भारतीय नागरिकांनी स्थानिक कायद्यांचे पालन केले पाहिजे. आम्ही परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक कायदे, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन करावे असे सांगण्याचा प्रयत्न करू." दुकानातून चोरीच्या घटनेचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतातील अमेरिकन दूतावासाने व्हिसा धारकांना कडक इशारा दिल्यानंतर लगेचच हे विधान आले आहे. चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांमुळे व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात अमेरिकेच्या प्रवासावर कायमची बंदी येऊ शकते, असा इशारा दूतावासाने दिला.

अमेरिकेच्या अलिकडच्या धोरणांनुसार इमिग्रेशन अंमलबजावणीत वाढ आणि व्हिसा तपासणीत कडक बदल झाल्यामुळे, भारतीय नागरिकांना कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आणि परदेशी कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने आश्वासन दिले की, ते स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे, तसेच नागरिकांना जबाबदार आणि कायद्याचे पालन करणारे प्रवासी होण्याचे आवाहन केले आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\