ऋषिकेश जोशी दिग्दर्शित आणि अभिराम भडकमकर लिखित ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग, पुण्यात 5 ऑक्टोबर 2024 रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झाला. दि. 8 जुलै 1921 रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी मिळून, ‘संगीत मानापमान’ या नाटकाचा प्रयोग केला होता. ‘टिळक स्वराज्य’ फंडासाठी रक्कम जमा करण्याच्या उद्देशाने, या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रयोग मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरला. या अभूतपूर्व प्रयोगाला हजारो रसिकांनी उपस्थिती दर्शवली होती. अगदी व्यवहारी भाषेत सांगायचे म्हटले तर, ज्या काळात सोने 15 रुपये तोळा मिळत होते, तेव्हा या नाटकाचे तिकीटाचे दर 100 रुपये होते. तसेच रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे, या नाटकाचे उत्पन्न 16 हजार, 800 रुपये जमा झाले होते. ’गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हा नाट्य प्रयोग, याच ऐतिहासिक घटनेची साक्ष देतो. या प्रयोगाला पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात झालेला ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ या संगीत नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी, अभिनेते-दिग्दर्शक-लेखक प्रविण तरडे यांनीही हजेरी लावली होती. तरडेंना हे नाटक कसे वाटले? त्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया त्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली.
‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ खरे तर, ‘संगीत मानापमान’ हे नाटक आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण, ‘संयुक्त मानापमान’ हे नाटक देखील झाले होते, आणि ते कसे आणि का झाले? त्याची निर्मिती कशी झाली? दोन दिग्गज अभिनेते म्हणजे बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले हे एकाच रंगमंचावर आले, हे प्रेक्षकांनी ‘याची देही याची डोळा’ पाहिले आहे आणि हे सगळे कसे घडले, याचीच गोष्ट लेखक अभिराम भ़डकमकर आणि दिग्दर्शिक ऋषिकेश जोशी यांनी अत्यंत ताकदीने या नाटकामधून मांडली आहे. पहिल्या रांगेत बसून अशा नाटकाचा प्रयोग पाहताना, क्षणाक्षणाला अंगावर काटा येत होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, नाट्य प्रयोगाच्या दरम्यान जितक्या प्रेक्षकांच्या टाळ्या महत्वाच्या असतात, हशा महत्वाचा असतो, तितकाच महत्वाचा असतो तो म्हणजे वन्समोअर. आता एखाद्या गद्य नाटकामध्ये नटाने संवाद छान म्हटला म्हणून, प्रेक्षकांकडून त्याला वन्समोअर मिळत नाही. त्यामुळे वन्समोअरच्या कथा आम्ही ज्या ऐकल्या, त्या संगीत नाटकांबद्दलच होत्या. परंतु, त्या का होत्या? इतक्या वर्षांनंतरही अगदी नव्या पिढीकडूनही, वन्समोअर कसा मिळतो? हे प्रत्यक्ष या पुण्यातील प्रयोगादरम्यान पाहायला मिळाले.
एखाद्या संगीत नाटकात नाट्यपद सादर होेते, नट गातो म्हणजे काय होते? त्यावेळी केशवराव भोसले किंवा बालगंधर्वगात असतील, तेव्हा नक्की काय होत असेल? हे या नाट्य सादरीकरणामुळे अनुभवता आले. ’नाही बोलत मी नाथा’ हे नाट्यपद ऐकताना, क्षणाक्षणाला अंगावर काटा येत होता. खरे तर संपदा माने हिचे कौतुक केले पाहिजेच, पण त्याचबरोबर ज्यांनी धैर्यदर साकारला त्या कलाकाराचेही कौतुक केले पाहिजे. दोघे खूपच समरस होऊन गात होते. या सगळ्या कलाकार आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे, गद्य आणि संगीत नाटक याचा अनोखा मिलाप या नाटकाच्या माध्यमातून घडला आहे. या नाटकातील प्रत्येकाने म्हणजेच निरंजन, परमेश्वर या सगळ्यांनीच ज्या ताकदीने काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. विशेषत: संगीतसूर्य केशवराव भोसले यांची भूमिका ज्या नटाने केली आहे, त्याचेही विशेष कौतुक केले पाहिजे. अभिनयामध्ये जिवंतपणा काय असतो? हे त्या नटाने दाखवले. आणि ज्या नटाने बालगंधर्व साकारले त्यांनी हे सिद्ध केले की, बालगंधर्वांची देहबोली, त्यांच्या देहबोलीतली सात्विकता यामुळे प्रत्यक्ष रंगमंचावर बालगंधर्वच समोर आहेत, असे भासले. नाटकातील चारही कलाकारांनी या संगीत नाट्याला एका वेगळ्याच उंची प्रदान केली आहे. या नाट्यप्रयोगाच्यावेळी सूत्रधाराची भूमिका साकारणार्या कलाकाराच्या पायाला, दुखापत झाली होती. तरीही ज्या चपळतेने तो रंगमंचाच्या अवकाशात वावरत होता, ते पाहण्याजोगेच होते.
अभिराम भडकमकर यांच्या लेखणीचे कौतुक यासाठी की, ‘संयुक्त मानापमाना’वर चित्रपट येत आहे. परंतु, ते मानापमान साकार झाले कसे, याची गोष्ट तुम्ही रंगमंचाच्या 20 बाय 24 च्या आयताकृती चौकोनामध्ये ज्यावेळी सांगत असता, त्यावेळी खरंच अंगावर काटा येतो. एकही क्षण तुम्ही पापणी लवण्याची संधी प्रेक्षकांना दिली नाही. चित्रपटगृहामध्ये पॉपकॉर्न, शीतपेये प्रेक्षागृहात घेऊन जात, चित्रपट पाहण्याची मुभा देखील असते. पण नाटक पाहताना काहीही हातात नसते. असतो तो केवळ सात्विक अभिनय. हा अभिनय पाहताना, वेगळीच अनुभूती प्रेक्षकांना अभिराम भडकमकर यांच्या लेखणीने दिली हेच खरे.
दिग्दर्शक ऋषिकेश जोशी याचे कौतुक यासाठी करेन की, यापूर्वी त्याचे नांदी मी पाहिले होते. नांदीमध्ये बदलत जाणारे विषय होते. पण इथे, एकाच घटनेभोवती फिरणारी गोष्ट सांगायची होती आणि ती ताकदीने सांगितलीही. त्यामुळे ऋषिकेश याचा मित्र म्हणून अभिमान आहेच, पण आज दिग्दर्शक म्हणून तू, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहेस. हे दोघे जितक्या सफाईदारपणे रंगभूमीवर नटांना हाताळतात, तितक्याच सफाईदारपणे तु सर्व सूत्र हाताळलीस. म्हणजे रंगमंचावर दोन भाग केले होते; एका बाजूला नटवर्य केशवराव यांची खोली, दुसर्या बाजूला बालगंधर्वांची खोली. तिथेच नटवर्यांची आणि बालगंधर्वांची मेकअप रुम आणि मागच्या बाजूला पुणेकरांचा वावर. खरंच त्या रंगमंचाचा पुरेपूर वापर कसा करावा, हे दिग्दर्शक म्हणून मी तुझ्याकडून नक्कीच शिकलो. त्यामुळे मी अशी विनंती करेन की, ‘गोष्ट संयुक्त मानापमाना’ची हे संगीत नाटक सगळ्यांनीच पाहिले पाहिजे. कारण, ही गोष्ट नसून तो चालता-बोलता अनुभव आहे, जो लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी रसिकांसमोर ठेवला आहे. चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून मला मोह होत होता की, भविष्यात मी संगीत नाटकावर एखादा चित्रपट केला तर, केशवराव आणि बालगंधर्व यांची भूमिका ज्या कलाकारांनी साकारली त्यांनाच मी माझ्या चित्रपटात घेईन. त्यामुळे नटवर्य केशवराव भोसले आणि बालगंधर्व तुम्ही आमच्यासमोर पुन्हा एकदा जिवंत केले, त्यासाठी धन्यवाद!
आता लवकरच कोल्हापूरात जेव्हा नटवर्य केशवराव भोसले नाट्यगृह सुरु होईल, तेव्हा तिथेही या नाटकाचा प्रयोग करावा ही विनंती आहे. जेव्हा हा प्रयोग तिथे लागेल, तेव्हा मी खास पुण्याहून कोल्हापूरला जाऊन या नाटकाचा हा प्रयोग पाहणार हे नक्की. धन्यवाद!
(शब्दांकन : रसिका शिंदे-पॉल)