नवी दिल्ली : ‘विश्वमित्र’ भारतावर आज संपूर्ण जगाचा विश्वास असून प्रत्येक देश भारतासोबत आपली मैत्री दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. भारताचे हे यश ‘वेद ते विवेकानंद’ यांच्या संस्कारातून प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केले.
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या जुन्या वास्तूमधील लोकसभेमध्ये आपले अखेरचे संबोधन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वर्षांचा प्रवास यावरील चर्चेस संबोधित केले. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी आपापली मते मांडली.
प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याचा आजचा क्षण आहे. या ऐतिहासिक आपण आपण सर्वजण निरोप देत आहोत. देशातील विविध सरकारांनी देशाचा गौरव आणि सन्मान वाढवण्याचे काम केले आहे असून जगभरात भारताचा गौरव वाढला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जी२० शिखर परिषदेमध्ये भारताचे सामर्थ्य संपूर्ण जगाने मान्य केले आहे. अर्थात, अद्यापही भारताविषयी अनेकांचा मनात संशय कायम आहे. तोच संशय जी२० शिखर परिषदेच्या जाहिरनाम्याविषयी बाहेर आला होता. मात्र, सर्वसहमतीने भारताने नवी दिल्ली जाहिरनामा जारी केला, परिणामी भारताने आज ‘विश्वमित्र’ हे स्थान मिळविले असून संपूर्ण जग भारतासोबत दृढ मैत्री प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहे. भारताने हे यश आपल्या वेद ते विवेकानंद यांच्या संस्कारातून साध्य केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संसदेच्या जुन्या वास्तूमधील अखेरचा दिवस हा भावनिक क्षण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारताच्या नवनिर्माणास या वास्तूने आकार दिला आहे. संपूर्ण भारताचे, भारतीय समाजाचे, महिलांचे, दलितांचे आणि वंचितांचे प्रतिनिधीत्व या संसदेने केले आहे. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जवळपास साडेसात हजारांहून अधिक लोकप्रतिनिधी आणि त्यातील ६०० महिला खासदारांनी देशाच्या विकासात योगदान दिले आहे. प. नेहरू, लालबहादूर शास्त्री ते अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग अशा पंतप्रधानांनी देशाला आकार दिला. त्याचप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया, चंद्रशेखर आणि लालकृष्ण आडवाणी या नेत्यांनी संसदीय परंपरांना समृद्ध केले आहे. लोकसभा अध्यक्ष, संसदेतील अधिकारी – कर्मचारी, सुरक्षारक्षक, पत्रकार आदी प्रत्येक घटकाने संसदेच्या या वास्तूद्वारे भारतीय लोकशाहीस समृद्ध केले असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
विद्यमान संसदेची इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांनी घेतला हे खरे आहे. मात्र, या वास्तूच्या उभारणीत देशवासीयांनी कष्ट, घाम आणि पैसा गुंतवला हे आपण कधीही विसरू नये. जुनी वास्तू येणाऱ्या पिढ्यांनाही नेहमीच प्रेरणा देत राहील. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाष्य केले. ते म्हणाले की, आज संपूर्ण देश चांद्रयान-3 च्या यशाने भारावून गेला आहे. यामध्ये आधुनिकता, विज्ञान, तंत्रज्ञान, आपले शास्त्रज्ञ आणि 140 कोटी देशवासीयांच्या दृढनिश्चयाच्या शक्तीशी भारताच्या सामर्थ्याचे एक नवीन रूप जोडले गेले आहे. तो देश आणि जगावर नवा प्रभाव निर्माण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
चहा विकणारा पोहोचला संसदेत
खासदार म्हणून पहिल्यांदाच या वास्तूत आल्यावर प्रवेशद्वारावर डोके टेकवून आपण प्रवेश केला होता. तो क्षण आपल्यासाठी भावनांनी भरलेला होता. कारण, भारतीय लोकशाहीच्या ताकदीमुळेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा अतिशय गरिब कुटुंबातील एक मुलगा संसदेत पोहोचला, अशी भावूक टिप्पणी पंतप्रधानांनी केली.
संसदेच्या वास्तूने कॅश फॉर व्होटही बघितले
संसदेच्या वास्तूने स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक धोरण बघितले, बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यास पाठिंबाही दिला. आणिबाणीच्या रूपात लोकशाहीची गळचेपी बघितली, तर त्यानंतर भारतीय लोकशाहीची ताकदही बघितली. नरसिंह रावांनी बसविलेली अर्थघडी बघितली, त्याचप्रमाणे वाजपेयींच्या काळात सर्वशिक्षा अभियान, आदिवासी आणि ईशान्य भारत मंत्रालयाची स्थापनाही बघितली. त्याचप्रमाणे डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात कॅश फॉर व्होट कांडही बघितल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा कालावधी अल्प असला तरीदेखील हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसदेस कामकाजास प्रारंभ होणार आहे, श्रीगणेशाला 'विघ्नहर्ता' असेही म्हणतात. त्यामुळे आता देशाच्या विकासात कोणताही अडथळा येणार नसून सर्व स्वप्न आणि संकल्प कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होणार आहेत. त्यामुळे रडगाणे गाण्यास भरपूर वेळ असून खासदारांनी उत्साहात या अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.