कल्याण : पावसाने उघडीप घेतल्याने कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम येत्या 3 दिवसांत युद्ध पातळीवर केले जाईल अशी माहिती कडोंमपा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या खड्डे भरण्याच्या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देत कामाच्या दर्जाची त्यांनी पाहणी केली. कल्याण डोंबिवलीत खड्डे भरण्याचे काम आधीही सुरूच होते. मात्र पावसाने उघडीप दिल्याने रविवार रात्रीपासून डांबर टाकून हे खड्डे भरण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसांत कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते हे खड्डेमुक्त होतील. शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याने गणपती बाप्पाचे आगमन सुकरपणे होईल असा विश्वास या पाहणीनंतर आयुक्त डॉ. दांगडे यांनी व्यक्त केला. या पाहणीवेळी कडोंमपाचे शहर अभियंता अर्जुन अहिरे, जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, बांधकाम विभागाचे अभियंता जगदीश कोरे, उप अभियंता शाम सोनवणे आदी अधिकारी उपस्थित होते.
विभागीय उपायुक्तांसह इतर उपायुक्तांनीही फिल्डवर येऊन काम करण्याचे निर्देश
कल्याण आणि डोंबिवली विभागासाठी नेमलेल्या उपायुक्तांसह शिक्षण विभाग, मालमत्ता आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही फिल्डवर उतरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे डॉ. दांगडे यांनी सांगितले. फिल्डवर गेल्यावर आपल्याला समस्या समजतात आणि त्यांचे निराकरण ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. यासाठी आपण सर्वच उपायुक्तांना फिल्डवर उतरून काम करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.
आवश्यक असतील तिकडेच सुरक्षा रक्षक ठेवणार
मुख्यालयात बसणाऱ्या उपायुक्तांना विनाकारण सुरक्षा रक्षक तैनात केल्याच्या तक्रारीवरही आयुक्तांनी यावेळी भाष्य केले. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचा आढावा घेऊन ज्याठिकाणी आवश्यक असतील तिकडेच सुरक्षा रक्षक ठेवण्याची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन डॉ. दांगडे यांनी यावेळी दिले. दरम्यान महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दुर्गाडी येथील गणेश घाटाची पाहणी केली. व उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.