नवी दिल्ली : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशस्वी मोहिमांनंतर आता भारताने समुद्रयान ही मोहिम हाती घेतलीय. भारतीय शास्त्रज्ञांनी सलग दोन अवकाश मोहिमा पार पाडल्यानंतर आता समुद्रातील रहस्ये उलगडण्याचा निश्चय केलाय. या मोहिमेद्वारे समुद्राच्या पोटात शिरुन धातू आणि खनिजांचा शोध घेतला जाईल.
समुद्रयान ही भारताची मानवी मोहीम असून या मोहिमेमध्ये समुद्राच्या पोटात 6000 मीटर खोलवर ‘मत्स्य’ 6000 ही पाणबुडी पाठवण्यात येईल. या पाणबुडीद्वारे तिथे असलेल्या कोबाल्ट, मँगनीज आणि निकेल सारख्या खनिजांचा शोध घेण्यात येईल.
गेल्या दोन वर्षांपासून ‘मत्स्य’ 6000 ही स्वदेशी पाणबुडी तयार करण्याचं काम सुरु होतं. समुद्रयान हे पुर्णपणे एक स्वदेशी मिशन असून हे तयार करण्यासाठी टायटॅनियम मिश्र धातुचा वापर करण्यात आलाय. यात तीन व्यक्तींना 12 तासांपर्यंत समुद्राच्या आत 6 हजार मीटरपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आहे. ‘मत्स्य’ 6000 खोल समुद्राच्या शोधासाठी ऑटोनॉमस कोरिंग सिस्टम (ACS), ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल (AUV) आणि डीप सी मायनिंग सिस्टम (DSM) सारख्या पाण्याखालील विविध उपकरणांनी सुसज्ज असेल,
या पाणबुडीची पहिली चाचणी 2024 च्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात घेतली जाईल. जून 2023 मध्ये टायटॅनिकचा शोध घेण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा स्फोट झाला. त्यामुळे आता ‘मत्स्य’ 6000 या पाणबुडीची शास्त्रज्ञांद्वारे काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे. ‘मत्स्य’ 6000 मधील 6000 हा क्रमांक पाणबुडीची पाण्याखाली 6000 मीटरवर जाण्याची क्षमता दर्शवतो.
नॅशनल इन्सिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) द्वारे ‘मत्स्य’ 6000 या पाणबुडीची निर्मिती केली जात आहे. 'समुद्रयान' तीन व्यक्तींना समुद्रात घेऊन जाईल आणि तिथे असलेल्या निकेल, कोबाल्ट आणि मॅंगनीज सारख्या मौल्यवान खनिजांचा शोध घेईल.