नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी काँग्रेसच्या गांधी कुटुंबावर आडनाव बळकावल्याचा आरोप करतानाच गांधी आडनाव वगळा, असा सल्ला दिला. रविवार, दि. 10 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथील भाजप मुख्यालयात एका कार्यक्रमात सरमा यांनी राहुल गांधींचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, “सगळे गांधी कसे झाले? मी बरेच दिवस संशोधन केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे कोणत्या सूत्रानुसार गांधी आहेत? भाजपला ‘भारत’ नावाची भीती वाटते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. उद्या एखाद्या डाकूने आपले नाव बदलून गांधी केले, तर तो संत होईल का?“ असा सवाल मुख्यमंत्री सरमा यांनी राहुल गांधींना केला.
“गांधीजींनी देश स्वतंत्र केला आणि तुम्ही लोकांनी गांधी, ही पदवी धारण केली. भारताचा पहिला घोटाळा एका टायटलपासून सुरू झाला. तुम्ही लोक ‘डुप्लिकेट गांधी’ आहात. टायटलप्रमाणे काँग्रेसने आपल्या देशाचे नाव बळकावले आणि ‘इंडिया’ झाले. जेव्हा मते घेण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस ‘भारत जोडो यात्रा’ काढते. निवडणुका संपल्या. तेव्हा त्यांनी त्यांचे नाव बदलून ‘इंडिया’ केले,” अशी टीका सरमा यांनी केली.