‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांमुळे तणाव; साताऱ्यात १४४ लागू!

धार्मिक स्थळावर दगडफेक; एकाचा मृत्यू, आठ जखमी!

    12-Sep-2023
Total Views |
1 dead and 3 injured after clashes erupt in Satara over social media post
 
सातारा : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हिंसाचारानंतर तिथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान तिथे इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या पोस्टही शेअर केल्या गेल्या होत्या. यानंतर खटाव तहसीलमध्ये १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री हिंसाचार उसळला.

हिंसाचारात एकाचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात सुमारे २ मृत्यूंचा उल्लेख केला आहे. अन्य आठ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसक जमावाने केवळ दगडफेकच केली नाही तर अनेक दुकाने, घरे आणि वाहनांनाही आग लावली. त्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत १०० जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

साताऱ्याच्या खटाव तहसीलमध्ये असलेल्या पुसेसावळी गावातून हिंसाचार सुरू झाला. कट्टरपंथी जमावातील एका व्यक्तीने ९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट केली होती. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली आणि आजूबाजूच्या परिसरात तणाव पसरला. पोस्ट टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

१० सप्टेंबर रोजी सुमारे १ हजार लोकांच्या जमावाने पुसेसावळी गावावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यादरम्यान दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. हिंसक जमावाने केवळ दुकाने आणि घरेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहनेही पेटवली. हिंसाचाराचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर आतापर्यंत एकूण २३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आयपीसी २९५ आणि ३४ अंतर्गत १०० हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ही लिहिल्याचा आरोप आहे. १५ ऑगस्टपासून साताऱ्यात सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थक पोस्ट शेअर केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या अहवालांमध्ये हिंसाचाराच्या वेळी हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पाकिस्तान समर्थक घोषणाबाजीचा आरोप

तणावग्रस्त भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. लोकांनी सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट टाकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान याप्रकरणी सातारा डीएसपी कार्यालयात तैनात असलेल्या कर्तव्य अधिकाऱ्याने हिंसाचारात १ मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देण्यास कर्तव्य अधिकाऱ्याने नकार दिला. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.