प्रोस्टेट ग्रंथी : समज-गैरसमज

    11-Sep-2023
Total Views |
Article On Prostate hypertrophy

प्रोस्टेट ग्रंथीस ‘पौरूष ग्रंथी’ असेही म्हणतात. पुरुषांमध्ये मुत्राशयाच्या खालच्या निमुळत्या भागात ही ग्रंथी आढळते. हिचे वजन साधारणतः २० ग्रॅम असते. ‘टेस्टेस्टेरॉन’ या संप्रेरकाचा या ग्रंथीवर प्रभाव असतो. वयाच्या चाळीशीनंतर अनेक पुरुषांमध्ये या ग्रंथीची वाढ होऊ लागते व मूत्राशयाशी संबंधित लक्षणे दिसू लागतात. प्रोस्टेट ग्रंथीबद्दल, त्याच्या उपचाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्रोस्टेट ग्रंथीमुळे उद्भवणारी लक्षणे, योग्य उपचार पद्धती याविषयी थोडक्यात माहिती आजच्या लेखात करून घेऊया.

प्रोस्टेट हायपरट्रॉफी : वरिष्ठ नागरिकांना हा त्रास होतो. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होतो. ‘बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी’ ही प्राणघातक जरी नसली, तरी तिची लक्षणे बरीच त्रासदायक असतात.

प्रोस्टेट हायपरट्रॉफीची लक्षणे

१) लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होणे, लघवी साफ न होणे, लघवीचा फोर्स कमी होणे, एकाच वेळेस संपूर्ण लघवी न होता, लघवीचा काही भाग मूत्राशयात साठून राहणे.

२) लघवीला सारखे-सारखे जाण्याची इच्छा होणे : मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नसल्यामुळे लघवीस सारखे-सारखे जावे लागते. रात्रीच्या वेळेस लघवीसाठी दोन ते तीन वेळा उठावे लागते व झोपमोड होते. मधुमेह नियंत्रणामध्ये नसणार्‍या पेशंटना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

‘प्रोस्टेट हायपरट्रॉफी’ची गुंतागुंत या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास गुंतागुंतीशी सामना करावा लागतो. लघवीचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळे व लघवी मूत्राशयात साठून राहिल्यामुळे ‘युरिनरी इनफेक्शन’ होते. यामुळे थंडी भरून ताप येणे, लघवीला जळजळ होणे, लघवी लालसर होणे, ओटी पोटात दुखणे इत्यादी लक्षणे आढळतात. काही पेशंटमध्ये लघवी बंद होऊन लघवी मूत्राशयात साठून राहते व ओटीपोटीच्या भागात सूज येऊ लागते. अनेक वेळा अशा पेशंटमध्ये लघवीच्या जागेतून कॅथेटर घालून लघवी बाहेर काढावी लागते.

‘प्रोस्टेट हायपरट्रॉफी’चे निदान : प्रोस्टेटची लक्षणे दिसत असल्यास, अशा रुग्णाची ’पीआर’ तपासणी केली जाते. गुदद्वारात बोट घालून ही तपासणी केली जाते. यामध्ये प्रोस्टेटची साईज वाढली असल्यास त्याचा अंदाज येतो.

सोनोग्राफी : सोनोग्राफीमध्ये ‘प्रोस्टेट हायपरट्रॉफी’चे निदान होते. प्रोस्टेटचा आकार, वजन याचा सोनोग्राफीत अंदाज येतो. सोनोग्राफी झाल्यावर पेशंटला लघवी करण्यासाठी पाठविण्यात येते व त्यानंतर पुन्हा सोनोग्राफी केली जाते. यामुळे मूत्राशयात साठून राहिलेल्या लघवीचा अंदाज येतो.

प्रोस्टेट साठी रक्ताची चाचणी : ‘प्रोस्टेट कॅन्सर’चे निदान करण्यासाठी ‘पीएसए’ (प्रोस्टेट स्पेसिफिक अ‍ॅन्टिजेन) या टेस्टचा उपयोग केला जातो. ‘प्रोस्टेट कॅन्सर’च्या रुग्णामध्ये ‘पीएसए’ वाढलेले आढळते. इतर काही आजारातदेखील ‘पीएसए’ वाढलेले आढळते. याशिवाय ‘प्रोस्टेट बायॉस्पी‘नेदेखील निदान पक्क करण्यास मदत होते.

उपचार : प्रोस्टेटचा त्रास असणार्‍या बहुसंख्य रुग्णांना ‘बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी’ (बीपीएच) असते. याची लक्षणे जरी त्रासदायक असली, तरी प्राणघातक नसतात. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्यावरील उपचार करावे.

वैद्यकीय उपचार : डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘प्रोझोसिन’ ही गोळी घ्यावी. ‘युरिनरी इन्फेक्शन’ असल्यास त्याचेदेखील उपचार करावे.
शस्त्रक्रिया लक्षणे जास्त त्रासदायक व जुनी असतील, तर शस्त्रक्रिया हा उपाय योग्य ठरू शकतो. गेल्या तीन दशकांत ‘युरोलॉजी’ ही ‘सुपरस्पेशॅलिटी’ उदयास आली व प्रोस्टेट शस्त्रेक्रियेत अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाऊ लागला. पूर्वी ओटीपोटाच्या येथून प्रोस्टेटपर्यंत पोहोचले जायचे. या पद्धतीने रक्तस्राव जास्त होण्याचा धोका असायचा. हल्ली ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा रोबोटिक पद्धतीने केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यावर प्रोस्टेट ग्रंथी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली जाते व ‘बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी’चे निदान पक्के केले जाते.

प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर : प्रोस्टेट ग्रंथीची लक्षणे असणार्‍या अगदी थोड्या प्रमाणातील पेशंटमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सरची शक्यता असते. वरिष्ठ नागरिकांमध्ये खासकरून ७० वर्षे ओलांडलेल्या नागरिकांमध्ये ही शक्यता जास्त असते. ‘प्रोस्टेट कॅन्सर’चे निदान करण्यासाठी ‘पीएसए टेस्ट’, सोनोग्राफी, पोटाचा सिटीस्कॅन, पेट स्कॅन यांचा उपयोग केला जातो. ‘प्रोस्टेट स्कॅन’चे निदान झाल्यास तो इतर अवयवात पसरला आहे का, यासाठीदेखील तपास केला जातो.

‘प्रोस्टेट कॅन्सर’चा उपचार : ’प्रोस्टेट कॅन्सर’चे निदान झाल्यास हादरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावरील उपचार करावे. जरूर पडल्यास सेकंड ओपिनियन घेऊन पुढील उपचाराचा निर्णय घ्यावा. या शस्त्रक्रियेचा खर्च, ‘किमो थेरपी’, ‘रेडिओ थेरपी’, इतर औषधे या सगळ्यांच्या खर्चाचा अंदाज घ्यावा. आरोग्य विमा पुरेशा प्रमाणात असल्यास खासगी हॉस्पिटल किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करावी, अन्यथा सरकारी हॉस्पिटलचा आधार घ्यावा. ‘आयुष्यमान भारत योजना’, ‘महात्मा फुले आरोग्य योजना’ यांचीदेखील माहिती घ्यावी. ‘प्रोस्टेट कॅन्सर’चे लवकर निदान व उपचार झाल्यास पेशंटला जीवदान मिळू शकते व तो सामान्य जीवन जगू शकतो. आजार बळावलेला असल्यास तो शरीराच्या दुसर्‍या भागात पसरू शकतो. अनेक प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांना प्रथम ‘किमोथेरपी’ व ‘रेडिओथेरपीचा’ सल्ला दिला जातो. ट्यूमरचा आकार थोडा छोटा झाल्यावर शस्त्रक्रिया केली जाते. काही रुग्णांना ‘ऑर्किडेकटोमी’ करून शरीरातील दोन्ही वृषण काढून टाकले जातात.

‘प्रोस्टेट हायपरट्रोफी’ची लक्षणे आढळून आल्यास पेशंट हादरून जातो. उपचारात विविधता असल्यामुळे पेशंटने आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चाचण्या व उपचार करावे. ‘प्रोस्टेट’ची लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वरिष्ठ नागरिकांनी आपल्या नियमित वार्षिक तपासणीत ‘पीएसए’ आणि ‘सोनोग्राफी’चा समावेश करावा.

‘प्रोस्टेट कॅन्सर’ आणि आयुर्वेदिक उपचार : प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाल्यावर अनेक जण इतर पॅथीमध्ये उपचार शोधतात. हे करत असताना आपल्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला टाळू नये. ‘प्रोस्टेट हायपरट्रॉफि’ची लक्षणे प्राथमिक स्वरुपात असताना पंचकर्म व काही आयुर्वेदिक औषधे उपयोगी पडू शकतात. ही औषधे देखील तज्ज्ञआर्युवेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

प्रतिबंधात्मक उपाय : प्रोस्टेट हा ग्रंथीचा आजार आहे. त्याला प्रतिबंधात्मक उपाय काय असणार, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. मिथ्या आहार आणि मिथ्या विहार हे कुठल्याही आजारासाठी कारणीभूत ठरतात. जीवनपद्धती जर आदर्श असेल, तर सहसा कुठलाही आजार होण्याची शक्यता कमी असते. सकाळी लवकर उठणे, व्यायाम, योगा, ध्यान धारणा, ब्रह्मविद्या, विपश्यना यांचा नियमित अभ्यास करणे, धुम्रपान व मद्यपान टाळणे. आहार समतोल असावा, आहाराच्या वेळा नियमित असाव्यात. तरूण वयापासून या सवयी असल्यास म्हातारपण सुसह्य होऊ शकते.

प्रोस्टेट हायपरट्रॉफी’च्या लक्षणाने घाबरून न जाता, त्यावरील योग्य निदान व उपचार याची निवड करणे महत्त्वाचे आहे.

डॉ. मिलिंद शेजवळ
९८९२९३२८०३

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.