‘भारतीय विरागिनी’ हे अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेले आणि ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’ने प्रकाशित केलेले, भारताचा गौरवास्पद, आध्यात्मिक वारसा सांगणारे अमूल्य असे पुस्तक. पुरुष संतांच्या बरोबरीने भारतात अनेक वैरागी स्त्रिया पण संत झाल्या. परंतु, स्त्री संतांची चरित्रे फारशी लिहिली गेली नाहीत. त्यांच्या संप्रदायांनीसुद्धा त्यांच्या नोंदी ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले नाही, ही खंत अरुणाताई मांडतात. ती कमतरता भरून काढण्यात, हे पुस्तक मदत करणारे ठरेल यात शंका नाही.
हिमालयापासून सागरापर्यंत पसरलेल्या भारत भूमीच्या विरागिनींचे भावपूर्ण दर्शन ‘भारतीय विरागिनी’ या अरुणाताईंच्या पुस्तकातून होते. यात मुख्यत्वे मध्यकाळातील स्त्री संतांचा आढावा लेखिकेने घेतला आहे. त्यामध्ये इसवी सन पूर्व काळातील जैन साध्वी आणि बौद्ध स्थविरी यांची चरित्रे व गाथा आहेत. आजच्या बांगलादेशातील चंद्रावतीचे रामायण आहे. काश्मीरच्या रुपा भवानीचा ज्ञानमार्ग आहे. राजस्थानच्या मीराबाईचे चरित्र आहे. दक्षिणेतील आंदाळचे चरित्र आहे. कर्नाटकातील अक्कमहादेवी, आणि महाराष्ट्रातील मुक्ताबाई, जनाबाई, वेणाबाई यांची कार्यं आहेत. कोणी नाथपंथी आहेत, कोणी योगिनी आहेत, कोणी वैष्णव आहेत, कोणी चंद्रावतीसारखी शिवभक्त आहे, कोणी मीरेसारखी आर्तभक्त आहे, तर कोणी जनीसारखी दास्यभक्त आहे. भारतीय विरागिनींची योग्यता एखादी शास्त्रार्थ करणारी उभय भारती किंवा परमहंस रामकृष्णांची गुरू होणारी एखादी भैरवी ब्राह्मिणी किंवा हटयोगी चांगदेवांची गुरू होणारी एखादी मुक्ताबाई यांच्यामधून प्रकट होते.
या विरागिनींचे व्यक्तित्त्व, त्यांचे कौटुंबिक जीवन, सार्वजनिक जीवन आणि त्यांचे समाजव्यवस्थेतील स्थान, याचे पुस्तकातून हृदयस्पर्शी दर्शन होते. नामदेव, तुकाराम, एकनाथ आदी पुष्कळ पुरूष संत गृहस्थ जीवन जगणारे होते. कुटुंबात राहूनदेखील त्यांना संतपद प्राप्त झाले होते. सांसारिक जबाबदार्या सांभाळून त्यांनी त्यांची आध्यात्मिक साधना तर केलीच; पण नंतर सामाजिक कार्यदेखील केले. त्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळाला. शिवाय आई, वडील, बहीण, पत्नी, मुले त्यांच्या पारमार्थिक कार्यात सहभागीदेखील झाली. स्त्री संतांना मात्र क्वचितच कुटुंबातून असा आधार मिळालेला दिसतो. काश्मीरची रुपा भवानी किंवा ओडिशाची माधवी दासी यांनी कुटुंबात राहून परमार्थ केला; पण अशी उदाहरणे विरळच! अरुणाताई लिहितात की, ‘’काही जणींचा जन्म किंवा जडणघडण भक्तिप्रवण कुटुंबांत झाल्याने त्यांना पारमार्थिक जीवन सहज अनुसरता आले.जसे आंदाळला पेरीय आळवार विष्णुचित्ताने स्नेहाने सांभाळले किंवा जनाबाई विठ्ठलभक्तीत रंगलेल्या नामदेवांच्या कुटुंबातच वाढली.”
स्त्रियांनी परमार्थमार्ग अनुसरणे, ही बाब कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर सहज स्वीकारली जाईल अशी नव्हती. कुटुंबातून प्रोत्साहन नसल्याने अथवा तिथे प्रगतीला अनेक अडचणी असल्याने, बहुतेक जणींना परमार्थासाठी प्रपंच सोडावा लागला. एक स्त्री म्हणून घरदार सोडून जाणे, हे असुरक्षिततेचा स्वीकार करणे होते. जी स्त्री घरात कोणी पाहुणे आले असतील, तर माजघरातून बाहेर येत नसे, तिला उंबरठा ओलांडून घराबाहेरच्या अज्ञात जगात पाऊल ठेवणे किती अवघड असेल; याची आपण कल्पना करू शकतो. त्यासाठी तिने किती मोठे धैर्य गाठीशी बांधून घेतले असेल? आपला पारमार्थिक उद्देश साध्य होईल की नाही, याची शाश्वती नसतानाही तो साध्य झालाच, तर नेमका कधी होईल, हे माहीत नसताना, घरादारावर आणि आपल्या सुरक्षित कोशावर पाणी पाणी सोडून पूर्णपणे अनोळखी असलेल्या बाहेरच्या जगात तिने पाऊल ठेवले होते. प्रत्येकीलाच गुरूंच्या आश्रमाचा आधार होता असे नाही आणि तसा असलाच तरी तिथे इतर पुरूष साधकांची गर्दी होती.
किती जणी गृहत्याग न करता, सांसारिक जीवन जगल्या असतील, ते देव जाणे. जात्यावरच्या ओव्या रचणार्या, कर्मयोग्याप्रमाणे संसारातील कामे करताना नामजप करत किती जणी संतपदाला पोहोचलेल्यासुद्धा असतील, ज्यांची योग्यता त्यांच्या जवळच्या लोकांनादेखील कळली नसेल, ती इतिहासाला काय ठाऊक असणार? स्त्रीला गौण लेखणार्या जगात, तिला अध्यात्म मार्गातील धोंड मानणार्या जगात, तिच्या चारित्र्याविषयी अन्याय मूल्यधारणा अवलंबणार्या जगात, तिला ना समाजाचे ना इतर स्त्रियांचे ना कुटुंबाचे पाठबळ होते. या विरागिनींची वाट एकलीची होती. परमार्थ मार्गातील प्रगतीसाठी करावा लागणारा आंतरिक संघर्ष आणि त्याबरोबर हा समाजामुळे थोपवला गेलेला बाहेरील संघर्ष मोठा होता. अरुणाताईंचे पुस्तक वाचताना त्या संघर्षाचे आकलन होते आणि भारतीय विरागिनींबद्दलचा आदर अधिकच दुणावतो.
समूहात राहणार्या तंत्रमार्गी योगिनी, बौद्ध स्थविरी आणि जैन साध्वींचा अपवाद वगळता या सर्व विरागिनींची वाट एकटीची होती. मात्र, असे असले तरी बहुतेकींना पुरूष संत गुरू म्हणून लाभले. पूर्णत्वाला पोहोचलेल्या त्यांच्या गुरूंनी कोणताही भेदभाव न करता, त्यांना आत्मज्ञानाचे अमृत दिले. धीराने आपली साधना करून या विरागिनीसुद्धा पूर्णत्वाला पोहोेचल्या. कैक विरागिनींनी आधी साधन म्हणून तीर्थयात्रा केल्या आणि आत्मज्ञान झाल्यानंतर प्रवचने करण्यासाठी, लोकोद्धार करण्यासाठीसुद्धा भ्रमण केले. मध्यकाळात जेव्हा प्रवासासाठी सुविधा नव्हत्या, त्यावेळी डोंगर, दर्या, नदी, नाले, जंगले आणि अवघड पायवाटा ओलांडून त्यांनी प्रवास केले. काहींनी आपापल्या दैवतांचा, उपासनेचा आणि संप्रदायाचा प्रसार केला.
त्यांनी केलेल्या अनेक रचना, काव्य, अभंग, ओव्या, वाक्, ग्रंथ हे जणू काही त्यांनी मागे ठेवलेले परमार्थ मार्गावरील पथदर्शक दिवे आहेत. त्यामध्ये चंद्रावतीचे सीतेला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले रामायण, मोल्लचे ‘तेलगू रामायण’, वेणाबाईचे ‘रसाळ सीता स्वयंवर‘ आदी ग्रंथांची सविस्तर वर्णने पुस्तकात आली आहेत. मुक्ताबाई, जनाबाई आदींच्या सुंदर रचनांपैकी ही मीरेसारखी सुंदर पदरचना करणारी माळव्याच्या चंद्रसखीची रचना -
चंबलकिनारे म्हारो गाँव, सावरे अई जई रे।
चंद्रा गंवेली म्हारो नाम, राधा रंगीली म्हारो नाम
ललिता रसीली म्हारो नाम, चंबल किनारे म्हारो गाम॥
अनेक काश्मिरी, बंगाली, तामिळ, कानडी भाषेतील रचनांचा अरुणाताईंनी मराठीत काव्यमय अनुवाद केला आहे. त्या रचनांचा मराठी अनुवाद वाचून त्यांची शिकवण अधिकच नीट समजते. जसा हा अक्क महादेवींच्या रचनेचा अनुवाद-
मी प्रेम केलंय एका देखण्या तरुणावर
तो आहे अशरीर आणि मृत्यूच्या, विनाशाच्याही पार
मी प्रेम केलंय त्या तरुणावर
जो आहे अमित आणि अपार
आयांनो, मी वेड्यासारखं प्रेम केलंय त्याच्यावर
त्या चन्नमल्लिकार्जुनावर!
काश्मीरच्या लल्लेश्वरीचे चरित्र, तिची काव्ये आणि तिच्यामध्ये आणि इतर विरागिनींमधील साम्यस्थळे वाचताना आपण थेट त्या काळातील काश्मीरमध्येच पोेेहोचतो-
प्रेमाने भरून येऊन निघाले मी,
रात्रंदिवस शोध घेत राहिले
माझ्याच घरी शेवटी पंडित भेटला
तो क्षण माझ्यासाठी पवित्र ठरला
किंवा हे काव्य जे साधनामार्ग उजाळते -
जो आपल्या नाभीत ओम् हे अक्षर धरतो
आणि श्वासाचे नियंत्रण करत
त्याला ब्रह्मरंध्रापर्यंत नेतो,
त्याला इतर कोणताच मंत्र नको,
केवळ हाच एक मंत्र त्याला तारून नेतो
भक्तिपंथाच्या वेदातील उगमापासून मध्यकाळातील भक्तीपर्यंतचा प्रवास अरुणाताईंनी जीवंत केला आहे. एकेका साध्वीची कथा, त्या-त्या संप्रदायाचा इतिहास, त्याचे तत्त्वज्ञान, त्यावेळची राजकीय परिस्थिती, सामाजिक धारणा, इतिहास अशा सर्वांगांनी सांगितली आहे. बौद्ध पंथ, त्यामधील भिक्षुणींचा संघ, जैन पंथ, काश्मीरचे शैवागम, महानुभाव पंथ, वीरशैव, तामिळनाडूचे अळवार आणि नयनार आदींचे तत्त्वज्ञान, त्या धारांमधून झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील उन्नती आणि त्याचे सामाजिक व्यवस्थेवर झालेले परिणाम, या सर्वांचा ऊहापोह या पुस्तकातून केला आहे.
हे पुस्तक मुख्य करून मध्यकालीन विरागिनींवर बेतलेले असले, तरी या पुस्तकाला एका बाजूला वैदिक ऋषिकांच्या काव्याची, तत्त्वज्ञानाची आणि दुसर्या बाजूला अलीकडच्या काळातील स्त्री संतांच्या कार्याची आणि साहित्याची थोडक्यात अवलोकन करणारी जोड हवी होती, असे वाटले. जसे २०व्या शतकातील विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता, किंवा पाँडिचेरीच्या श्रीमाताजी, परमहंस सिद्धारूढ स्वामींच्या शिष्या, कलावतीदेवी, सांसारिक जबाबदार्या सांभाळून आध्यात्मिक उन्नती करून घेणार्या स्वामी शिवानंदांच्या शिष्या मालती देवी बाळ वा ब्रह्मकुमारी हा अधिककरून स्त्री साधकांचा पंथ आदींचा ओझरता आढावा, तो धागा आजच्या युगात घेऊन आला असता असे वाटले.
भारतातील विरागी संत कवी स्त्रियांच्या कथा अरुणाताईंनी या पुस्तकात अभ्यासपूर्णरितीने आणि विस्ताराने मांडल्या आहेत. त्यामध्ये नेटकेपणा आहे. गरज नसलेल्या माहितीचे अवडंबर नाही आणि जे जरूरी आहे, ते मात्र विशेष काळजीपूर्वक मांडले आहे. हे पुस्तक विरागिनींच्या चरित्राचे दस्तावेजीकरण नाही. कोरडेपणाने लिहिल्या नोंदी नाहीत. त्यांच्या आयुष्यातील घटनांचा एकसुरी पाढा नाही. त्यांचे उदात्तीकरण करणार्या जीवनी नाहीत, तर संवेदनापूर्णरितीने मांडलेली हृदयस्पर्शी शब्दचित्रे आहेत. जी गार्हाणी स्त्री संतांनी लिहिली नाहीत, जी दुःखे त्यांनी मूकपणे सोसली, जी कैफियत त्या विरागिनींनी कुठे लिहिली-बोलली नाहीत, त्या गोष्टी अरुणाताई उलगडून सांगतात. ’जे न देखे रवी ते देखे कवी’ म्हणतात, तसे केवळ एका कवीलाच हे शक्य आहे. वाचकाचे बोट धरून एकेक विरागिनीच्या आयुष्यातील घटना दाखवत, त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ देत, त्यांच्या संप्रदायाची माहिती देत एक-एक पापुद्रा हळुवारपणे वेगळा करून दाखवतात. त्याचे विश्लेषण करून त्या सांगतात. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असले, तरी रसाळ आहे. त्यामध्ये संवेदनेचा ओलावा आहे आणि म्हणूनच ते मनात खोल उतरणारे आणि मनात रेंगाळणारे आहे.
पुस्तकाचे नाव : भारतीय विरागिनी
लेखिका : अरुणा ढेरे
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य
आणि संस्कृती मंडळ, मुंबईपृष्ठसंख्या : ४६४
मूल्य : २३२ रू.
दीपाली पाटवदकर
deepali.patwadkar@gmail.com