या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व हे की, बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिक तत्त्वांशी नाते जोडणे. यात सूर्य हा केंद्रस्थानी आहे समग्र विश्वाचा आधारभूत घटक म्हणजे सूर्य! प्रत्येक प्राणिसमूहाच्या शक्तीचे व ऊर्जेचे केंद्र म्हणजे हाच तो सूर्य! वडिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाळाच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी, दीर्घायुष्याकरिता आणि मानसिक सामर्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची सर्वाधिक गरज असते.
शिवे ते स्तां द्यावा पृथिवी असन्तापे अभिश्रियौ।
शं ते सूर्य आ तपतु शं वातो वातु ते हृदे ।
शिवा अभि क्षरन्तु त्वापो दिव्या: पयस्वती:॥
(अथर्ववेद-८/२/१४)
अन्वयार्थ
अरे बाळा! (ते) तुझ्यासाठी (द्यावा- पृथिवी) हे द्युलोक व पृथ्वीलोक (असन्तापे) संतापरहित, मंगलमय, कल्याणकारी ठरोत. तसेच ते (अभिश्रियौ) चहुबाजूंनी तुझी शोभा व सौंदर्य वाढवणारे होवोत. (ते) तुझ्याकरिता (सूर्य:) सूर्य हा (शम्) शांतपूर्वक, योग्य त्या प्रमाणात (आ+तपे) उष्णता व प्रकाश देत राहो. (वात:) वारा हा (ते हृदे) तुझ्या हृदयाकरिता (शम्) अतिशय सुमधुर, आल्हाददायक (वातु) वाहत राहो. तसेच (पयस्वती: आप:) विविध नद्या व इतर जलस्रोतांचे पाणी हे (त्वा) तुझ्या करिता (शिवा: दिव्या: च) मंगलमय व दिव्य स्वरूपाने (अभि क्षरन्तु) चोहीकडून वाहत राहो.
विवेचन
जन्म झाल्यानंतर बाळ आणि बाळंतीण आई हे एकाच खोलीत निवास करीत असता, आता बाळाला हे जग दाखविणे गरजेचे ठरते. आतापर्यंत शिशू जन्मदात्या आईच्या मांडीवर किंवा तिच्या कुशीत अगदी आनंदाने राहत असे. पण, यापुढे गरज पडते, ती त्याला समग्र जगाच्या पालन व पोषणकर्त्या प्रकृतीमातेच्या सान्निध्यात आणण्याची! निसर्गदेवतेच्या संपर्कात आणून बाळाला समग्र विश्वाचे दर्शन घडवावे लागते. यामुळे त्या बाळाची शारीरिक व मानसिक प्रगती होण्यास प्रारंभ होईल. यासाठी हा निष्क्रमण संस्कार! ‘निस्’ उपसर्गपूर्वक ‘क्रम्’ या धातूपासून ‘निष्क्रमण’ शब्द बनतो. म्हणजेच बाहेर फिरणे किंवा चालणे. या संस्काराच्या निमित्ताने चार भिंतींच्या आत असलेला तो शिशु आता निसर्गाच्या शुद्ध वातावरणात येणार आहे. सूर्य, चंद्र, हवा, माती, पाणी, द्युलोक, अंतरिक्ष लोक यांच्या संपर्काने नवजात शिशु सर्वदृष्टीने विकसित होणार आहे. आधुनिक युगात स्वतःला सुशिक्षित व भौतिकदृष्ट्या सुविकसित समजणार्या माणसाला बहुतांश प्रमाणात विविध संस्कारांचे विस्मरण झाले आहे, त्यात निष्क्रमण हादेखील संस्कार आहे.
मानव समाज आपल्या स्वार्थ व संकुचित वृत्तींमध्ये इतका गुरफटून गेला आहे की त्याने निष्क्रमण संस्काराचे महत्त्व, स्वरूप आणि किंबहुना त्याचे अस्तित्वदेखील त्याने पूर्णपणे विसरले आहे. म्हणून हा संस्कार क्वचितच एखाद्या संस्कारशील कुटुंबातच आढळतो, तर काही कुटुंबामध्ये जेव्हा योग्य वाटले, तेव्हा बाळाला सहजपणे बाहेर आणले जाते. मोठ्या प्रमाणात तर बाळाला बाहेर आणण्याबाबत कोणताच विधी निषेध उरलेला नाही. कसेतरी करून बाळाला एक दिवशी बाहेर आणले जाते. पहिल्यांदाच सूर्याची प्रकाशकिरणे अंगावर घेणारा, वार्याच्या स्पर्शाने रोमांचित होणारा आणि चंद्राचे शीतल चांदणे अनुभवणारा हा बाळ वैदिक निष्क्रमण संस्काराविनाच हे सारे जग पाहणार असेल, तर त्याच्या दृष्टीने हे दुर्दैवच म्हणावे ? हा संस्कार केव्हा करावा? यासंदर्भात गोभिल गृह्यसूत्रात म्हटले आहे- जननात् य: तृतीय: ज्यौत्स्न: तस्य तृतीयायाम्.....! म्हणजेच बाळ जन्मल्यानंतर तिसर्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा संस्कार केला जावा.
म्हणजेच चंद्रमासाच्या दृष्टीने जन्माच्या दोन महिने, तीन दिवसानंतर हा संस्कार करण्यात यावा, तर पारस्कर गृह्यसूत्रात म्हटले आहे- चतुर्थे मासिनिष्क्रमणिका...!अर्थात बाळाच्या जन्माच्या चौथ्या महिन्यात हा संस्कार केला जावा. या दोन्ही वेळांचा तात्पर्य हाच की जर बाळ शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल, तर तो इतक्या महिन्यांच्या कालावधीपर्यंत धष्टपुष्ट होऊन आपल्या पुढील प्रगतीसाठी सिद्ध होतो. ही प्रगती म्हणजेच शारीरिक व मानसिक! यासाठी हा निष्क्रमण संस्कार, असे पाहिले तर हा संस्कार फारच छोटा आहे. परमेश्वर आराधनेचे तीन मंत्र, विस्तृत अग्निहोत्र, बाळाच्या मस्तकस्पर्शाचे तीन मंत्र, बाळाच्या उजव्या आणि डाव्या कानात उच्चारले जाणारे दोन मंत्र, सूर्यदर्शन व चंद्रदर्शनाचे दोन मंत्र आणि आशीर्वादपर मंत्र! इतकाच काय तो या संस्काराचा सोपस्कार! पण, या मागचा रहस्यात्मक भागदेखील तितकाच मोलाचा व महत्त्वाचा आहे.
संस्कार करावयाच्या शुभदिनी सूर्योदयानंतरसकाळी बाळाला स्नान घालून नूतन वस्त्रे धारण करावीत. बाळाला घेऊन त्याची आईने आपल्या पतीच्या उजव्या बाजूला यावे व नंतर समोर उभे राहून बाळाचे डोके उत्तर दिशेकडे करून त्यास पतीच्या हाती सुपूर्द करावे. पुन्हा पतीच्या मागून येऊन त्यांच्या डाव्या बाजूला पूर्वाभिमुख बसावे. यज्ञवेदीवर विराजमान झाल्यानंतर प्रथमतः संस्कारविधी ग्रंथात दर्शविल्याप्रमाणे तीन मंत्रांनी भगवंताची आराधना करावी. त्यानंतर संकल्पपाठ, आचमनमंत्र, इंद्रियस्पर्श, स्वस्तिवाचन, शांतिकरण प्रकरण घेऊन पूर्ण यज्ञविधी संपन्न करावा. त्यानंतर पित्याने खालील तीन मंत्राचे उच्चारण करून बाळाच्या चेहर्याकडे पाहत त्याच्या डोक्यास स्पर्श करावा-
अदात् संभवसि हृदयादधि जायसे।
आत्मा वै पुत्रनामासि स जीव शरद: शतम्॥
यासोबत इतरही दोन मंत्रांचे उच्चारण करावे. या दोन्ही मंत्रात आलेल्या ‘असौ’ या त्याच्याऐवजी त्या ठिकाणी बाळाचे नाव घ्यावे. तद्पश्चात वडिलांनी बाळाच्या उजव्या कानात ‘ओम् प्रयन्धि मघवन्नृजीषिन्द्र रायो.....!’ या मंत्राचे तर डाव्या कानात ‘इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि चित्तिं दक्षस्य सुभगत्वमस्मै ...!’ या मंत्राचे पठण करावे.
यानंतर बाळाला बाहेर आणून सर्वांच्या साक्षीने सूर्याचे दर्शन घडवावे आणि खालील मंत्र म्हणावा -
तच्चक्षुर्देवहितं पुरस्ताच्छुक्रमुच्चरत।
पश्येम शरदः शतं जीवेम शरद: शतं श्रृणुयाम शरद: शतं प्रब्रवाम शरदः शतमदीना: स्याम शरदः शतं भूयश्च शरद: शतात्॥ (यजुर्वेद -३६/२४)
या मंत्रोच्चारणाबरोबरच बाळाला शुद्ध हवेत फिरवावे. बाळाच्या शरीरावर सूर्याचे प्रकाश किरण पडतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावा. शेवटी अग्निहोत्राच्या कार्यक्रमस्थळी येऊन सुमधुर फुलांच्या वर्षावाने बाळाला आशीर्वाद देण्यात यावेत. त्यानंतर रात्री आकाशात चंद्र उगवल्यानंतर बाळाला पुन्हा चंद्राच्या चांदण्यात घेऊन यावे. बाळाचे डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे घेऊन वडिलांनी बाळास आपल्या कुशीत घ्यावे व आईने त्याच्या वडिलांच्या डाव्या बाजूस उभी राहून चंद्राकडे पाहत ‘ओम् यददश्चंद्रमसि कृष्णं पृथिव्या हृदयं श्रितम.....!’हा मंत्र उच्चार करीत ओंजळीने जमिनीवर पाणी सोडावे.
या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व हे की, बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिकतत्त्वांशी नाते जोडणे. यात सूर्य हा केंद्रस्थानी आहे समग्र विश्वाचा आधारभूत घटक म्हणजे सूर्य! प्रत्येक प्राणिसमूहाच्या शक्तीचे व ऊर्जेचे केंद्र म्हणजे हाच तो सूर्य! वडिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाळाच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी, दीर्घायुष्याकरिता आणि मानसिक सामर्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची सर्वाधिक गरज असते. प्राचीन व आधुनिक चिकित्सकांनी ही गोष्ट पूर्णपणे मान्य केली आहे की, आम्हां सर्वांच्या सामर्थ्याचे बलस्थान सूर्यप्रकाश हा आहे. सूर्याच्या तेजोमय प्रकाशकिरणांसोबत असलेली ताजी हवा ही जीवनशक्ती प्रदान करणारी आहे. यामुळे पृथ्वी राहणार्या प्रत्येक जीवाला जगण्याकरिता प्राणवायू मिळतो. याउलट बंद खोल्यांमधील सूर्यप्रकाशविरहित कृत्रिम हवा ही आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.
त्याचबरोबर चंद्राचे शीतल चांदणेदेखील सबंध प्राणिसमूहाकरिता फारच उपयुक्त मानले जाते. निष्क्रमण संस्कारात नवजात शिशुला सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशात आणून हवा, पाणी, पृथ्वी व इतर नैसर्गिक तत्त्वांशी नाते जोडणे म्हणजेच या नव्या जगाशी त्याचा पहिल्यांदाच परिचय करून देणे होय. जन्मप्रदात्या आईनंतर आता बाळाला निसर्गरुप आई भेटत आहे. जणू काही हीच प्राकृतिक आई आता बाळाला शतायुषी बनविण्याकरिता आपली मूलभूत निसर्गतत्वे त्याला समर्पित करीत आहे. यादृष्टीने निष्क्रमण संस्कार अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य