भारत – नेपाळचे संबंध ‘सुपरहिट’ होणारच : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल ‘प्रचंड’ भारत दौऱ्यावर

    01-Jun-2023
Total Views |
Pushpa Kumar Dahal Prachand on India Tour

नवी दिल्ली
: भारत आणि नेपाळचे संबंध सुपरहिट करण्यासाठी भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर भारतासोबतच्या संबंधांमध्ये सीमाप्रश्न अडथळा ठरणार नाही, असे प्रतिपादन नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल ‘प्रचंड’ यांनी गुरुवारी केले आहे.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल ‘प्रचंड’ हे भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या नऊ वर्षांत दोन्ही देशांदरम्यान अधिक चांगला संपर्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सीमा आमच्यासाठी अडथळा बनू नये, या दिशेने पावले उचलली आहेत. आम्ही भारत आणि नेपाळमध्ये असे संपर्क प्रस्थापित करू की आमच्या सीमा आमच्यामध्ये अडथळे बनणार नाहीत. सामायिक नद्यांवर पूल बांधणे, नेपाळमधून भारताला वीज निर्यात करणे यासह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे.

आज आम्ही आमची भागीदारी सुपरहिट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, बीरगंज येथे पहिले आयसीपी बनवण्यात आले. सीमेवर पहिली पेट्रोलियम पाइपलाइन, रेल्वे लाईन, ट्रान्समिशन सुरू करण्याच्या दिशेनेही काम सुरू झाले आहे. नेपाळमधून ४५० मेगावॅट वीज निर्यात करत आहे. याशिवाय भारत आणि नेपाळमधील नेबरहुड फर्स्ट धोरणावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी जलविद्युत विकास, कृषी आणि दळणवळण या विषयांवर चर्चा झाली, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल ‘प्रचंड’म्हणाले की, भारत आणि नेपाळमधील संपर्क वाढवण्यासाठी संयुक्त काम केले जात आहे. दोन्ही देशांमधील सीमावाद चर्चेतून सोडवला जाईल. भारताने नेपाळला शेतीसह सर्वच क्षेत्रात मदत केली आहे. त्यांनी भारताला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांनी यावेळी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी रेल्वेच्या कुर्था-बिजलपुरा विभागाच्या ई-योजनेचे संयुक्तपणे अनावरण केले. दोन्ही पंतप्रधानांनी बथनाहा ते नेपाळ कस्टम यार्डपर्यंत भारतीय रेल्वेच्या मालवाहू ट्रेनला संयुक्तपणे हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी संयुक्तपणे भारत आणि नेपाळमधील मोतिहारी (पूर्व चंपारण-अमलेखगंज) तेल पाइपलाइनच्या फेज-२ ची पायाभरणी केली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.