भारतीय अर्थव्यवस्थेवर दृढ विश्वास

    30-May-2023
Total Views |
Editorial on Indian Economy Growth

अमेरिकेसह युरोप खंडात मंदीचे संकट तीव्र झालेले असताना, भारतीय शेअर बाजार सकारात्मक नोंदी करत आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मे महिन्यात एक हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात असतानाच, विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या या गुंतवणुकीकडे भारताच्या वाढीचे प्रतीक म्हणून पाहायला हवे.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मे महिन्याच्या केवळ सात सत्रांमध्ये यंदाच्या वर्षांतील त्यांची सर्वांत मोठी खरेदी केली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय समभागांमध्ये निव्वळ विक्रेते राहिले आहेत. बुधवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांची सलग दहावी खरेदी १ हजार, ८३३ कोटी रुपयांपेक्षा अधिक केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी जवळपास ७९० कोटींच्या समभागांची विक्री केली. त्यामुळेच जागतिक पातळीवर अनिश्चितता कायम असतानाही, भारतीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. विदेशी गुंतवणूकदार एप्रिल महिन्यापासून सातत्याने समभागांची खरेदी करत आहेत. मे महिन्यात त्यांनी एकंदर ११,४३६.८४ कोटी रुपये बाजारात ओतले आहेत,

तर एप्रिल आणि मे महिन्यात त्यांनी अनुक्रमे ५,७११.८० आणि १,९९७.७० कोटी रुपये इतकी गुंतवणूक केली होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये निर्देशांक विक्रमी उच्चांकावर असताना यात विदेशी गुंतवणूकदारांनी आक्रमकपणे भारतीय समभागांची विक्री करण्यावर भर दिला होता. ‘अमेरिकी फेडरल’ने व्याज दरात वाढ केल्याने, अमेरिका तसेच अन्य विकसित बाजारपेठांमध्ये रोखे उत्पन्नात वाढ झाली होती. रोख्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याने भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतील पैसा अमेरिकी रोख्यांमध्ये गुंतवला जातो. त्यामुळेच गेल्यावर्षी गुंतवणूकदारांनी भारतातून आपली गुंतवणूक काढून घेतलेली दिसून आली होती.

तथापि, आज अमेरिकी अर्थव्यवस्था अनिश्चिततेत आहे. अमेरिकेची कर्ज मर्यादा अखेरच्या क्षणी वाढवण्यावर तेथील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्यात एकमत झाल्याने वित्तीय संकट पुढे ढकलले गेले. मात्र, त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित मार्ग शोधत आहेत. बाजारपेठेमधील तरलतेचा असलेला अभाव आर्थिक संकट तीव्र करत आहे. सकारात्मक आर्थिक आकडेवारी आणि समभागांचे वाजवी मूल्यमापन यामुळे भारतीय भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचे पुनरुत्थान झाले आहे. परिणामी, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मे महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक ही गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वांत मोठी गुंतवणूक ठरली आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी समभागांमध्ये ३६ हजार, २३९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली होती. अमेरिकेतील ‘जीक्यूजी’ समूहाने ‘अदानी’ समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे मार्चमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह सकारात्मक राहिला होता. त्याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात रोखे बाजारात १ हजार, ४३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यंदाच्या वर्षी ती २२ हजार, ७३७ कोटी रुपये इतकी झाली आहे. जागतिक स्तरावर मंदी असताना भारतीय अर्थव्यवस्थेने केलेली समाधानकारक कामगिरी तसेच ‘रिझर्व्ह बँके’ने व्याजदर वाढीला दिलेला विराम यामुळे देशांतर्गत चलनवाढ नियंत्रणात आली आहे. मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत भारतीय कंपन्यांनी केलेल्या दमदार आर्थिक कामगिरीमुळे संपूर्ण जगात भारतीय बाजारपेठेबद्दल विश्वास दृढ होताना दिसून येतो.

त्यामुळेच विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली दिसून येते. विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या खरेदीमुळे निर्देशांकात वाढ नोंद होत आहे. जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि ब्राझील यांसारख्या सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या बाजारपेठांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. अमेरिकेसारख्या तसेच युरोपमधील बाजारपेठा सध्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. तेथील निर्देशांक सातत्याने घसरणीची नोंद करत आहेत. युरोपातील बहुसंख्य देशात मंदीचे वातावरण दिसून येते आहे. अमेरिकेतही वाढीचा दर अपेक्षेपेक्षा फार कमी नोंद झाला आहे. तेथील अर्थव्यवस्था केवळ १.१ टक्के इतकाच आहे. युरोपातील देशांतही फारसे वेगळे चित्र नाही. जर्मनी अर्थव्यवस्थेने सलग दुसर्‍या तिमाहीत वाढीचा दर कमी झालेला पाहिला आहे. त्यामुळेच तेथे मंदी आल्याचे मानले जाते.

तेथील महागाईही गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.२ टक्के इतकी वाढली आहे. चलनवाढ, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केलेली व्याज दरवाढ तेथील अर्थव्यवस्थांसाठी अडथळे निर्माण करणारी ठरली आहे. चलनवाढ काही अंशी कमी झालेली असली, तरी त्यामुळे बाजारात तरलतेचा अभाव निर्माण झालेला आहे. कर्जे महागली आहेत, व्यवसायवाढीच्या संधी कमी झाल्या आहेत. म्हणूनच बेरोजगारीचा प्रश्न तीव्र होताना दिसून येत आहे. विकसित आणि प्रगत देशांच्या तुलनेत भारत तुलनात्मक चांगलीच कामगिरी करत असून, तिचा वाढीचा दर तब्बल साडेसहा ते सात टक्के इतका आहे. जगात सर्वाधिक वेग भारतीय अर्थव्यवस्थेने नोंदवला आहे. भारतातील वैयक्तिक पातळीवर क्रयशक्तीत झालेली वाढ उत्पादन प्रक्रियेला बळ देणारी ठरली आहे. तसेच, भांडवली खर्चही भारतात सर्वोच्च पातळीवर आहे.

गृहनिर्माण क्षेत्रातील तेजी, कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताळेबंदाचे बळकटीकरण, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला होत असलेला कर्जपुरवठा आणि पतपुरवठा करण्यासाठी तयार असलेल्या चांगल्या भांडवलदार कंपन्या अशा अनेक सकारात्मक बाबी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून, तिची वाढ करत आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात ही वाढ अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय सार्वजनिक ‘डिजिटल’ मंचांची उपलब्धता आणि ‘प्रधानमंत्री गती शक्ती’सारखी राष्ट्रीय दळणवळण योजना, उत्पादनांना चालना देण्यासाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना यांसारख्या पथदर्शी योजनांमुळे आर्थिक वाढीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास वित्त मंत्रालयाने व्यक्त केलेलाच आहे. त्याचेच प्रतिबिंब विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून दिसून येते आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.