स्वातंत्र्यवीरांची काव्यसिंधु

सावरकर

    27-May-2023   
Total Views |
Vinayak Damodar Savarkar poems

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित अनेक बाबींवर चर्चा होते. परंतु, त्यांनी समाजाला दिलेली काव्याची देणही तितकीच कालातीत आहे. कोणत्याही काळात समाजप्रबोधन करणारी आहे. काळाच्या पुढचे पाहणारी आहे. म्हणून त्यांच्या १८९८ पासून ते १९२९ पर्यंत लिहिलेल्या कवितेतील काही निवडक, भावगर्भित कवितांच्या ओळींचे रसग्रहण करण्याचा केलेला हा प्रयत्न...

स्वातंत्र्यवीर सावरकर दीर्घ लिहितात, अवजड लिहितात, पण सुलभ लिहितात. त्यांची लेखणी त्यांच्या स्वप्नांशी, इच्छांशी आणि भावनांशी नेहमीच प्रामाणिक राहिली. या शतगुणी व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य पैलूंचं निखळ दर्शन त्यांच्या कवितेतून होतं. स्वातंत्र्यवीरांच्या राजकीय कारकिर्दीइतकीच त्यांची लेखणीही तेवढीच स्फोटक आहे, असे मला नेहमीच वाटते. काळवेळाची बंधनं तिने केव्हा पाळली नाहीत. त्यांच्या कित्येक कविता आत्मप्रेरित, तर कित्येक आत्मप्रेरणेसाठी लिहिल्या गेल्या आहेत. तुरूंग, साखळ्यांचे निर्बंध त्यांना जेवढे जखडून टाकतात, तेवढ्याच त्या कविता विद्रोही पण, वेदनेची निळसर पेन्सिल फिरवल्यासारख्या लिहितात.

सावरकरांच्या कवितांचे अर्थ लावावे लागत नाहीत. त्या भाष्य करणार्‍या आहेत. त्यांची कविता भावनांची, विचारांची उत्कट अभिव्यक्ती असते. त्यांनी अनेक कविता वृत्तात, छंदात लिहिल्या. तरीही ’मुक्तछंदा’चे वैशिष्ट्य त्यांनीच खुलवले. त्यांचं ’वैनायक वृत्त’ एका अर्थी यमक, शब्दांची मर्यादा भेदत ’मुक्तछंदा’च्या जवळ जातं. हे शब्द त्यांच्या मनाच्या आवेगाला चरण/पंक्तींचा बांध घालत नाहीत. शब्दांचे ओघ कातळांवरून कोसळणार्‍या जलधारेसारखे शीतल तुषार उडवत उच्छृंखल नदीसारखे वाहून नेतात पार. त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतील कवितांची चर्चा फार होते. पाठांतर करून, खरडून ठेवलेल्या या कविता दुःख भिजत घालून मग उफाळून आल्यासारख्या हृदयद्रावक आहेत. अंदमानात असताना त्यांना त्यांची बेडी लख्ख ठेवावी लागायची. त्याची आठवण म्हणून ते लिहितात,

कशी उजळावी आपण आपुलिची। रे बेडी?
हौस तुझी ही वेडी!
चरणासि सतत अच्छिेच्या। जी वेढी

इथे ‘बेडी’ हे रूपक आहे. आपणच आपल्या मनाला घालून घेतलेल्या मर्यादा आणि जखडून टाकलेल्या आपल्या भावना मांडण्याचं परिमाण. या कड्या आपणच घालून घेतो, त्यांचा जाच होत असतो, तरीही आपण त्या घासून पुसून स्वच्छ करून ठेवतो. वरून मिरवतो सुद्धा! या सोनेरी पण, कठीण आणि गरज नसलेल्या शृंखला तोडायची इच्छा आपलीही होत नाही आणि हा मानवी स्वभाव विशेष आहे. मग तुरुंगातील ही विधिनिषेधांची बेडी स्वच्छ ठेवण्यात उपहास कसला? असा रोकडा सवालही आपल्या मनात तयार होतो.

सावरकरांच्या बर्‍याच गाजलेल्या कविता अनेक आहेत, तरीही ’शत जन्म शोधताना’ ही कविता माझी विशेष लाडकी. केवढा उन्माद, उद्विग्नता, हतबलता अगदी ठासून भरल्यासारखी वाटते. ’सन्यस्तखङग’ या नाटकातली ही कविता. बुद्धकालीन नाटक आहे, बुद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्या मूलस्थानी कपिलवस्तू येथे येऊन धम्मदीक्षा देतो. साधारण त्याच काळात शक राज्यावर आक्रमण होतं, तेथील बहुतांश जनतेने संन्यास घेतलेला. तेव्हा, राजपुत्र वल्लभ आपल्या पत्नीची, सुलोचनेची परवानगी न घेता लढाईसाठी निघून जातो. हे वृत्त जेव्हा त्याच्या पत्नीला समजतं, तेव्हा तिच्या सखीला उद्देशून जे बोलते. त्या ओळी काव्य रूपात आहेत. सावरकरांनी ’वैनायक वृत्ता’त बरेच लेखन केले. मात्र, हे काव्य यमक अलंकारात लिहिले आहे.

शत जन्म शोधिताना।
शत आर्ति व्यर्थ झाल्या।
शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या॥

यात ’आर्ति’ शब्दावर ’श्लेष’ आहे. ‘आर्तता’ आणि ‘आरती’ असे दोन्ही अर्थ घेऊन कवितेचा अर्थ लावला जाऊ शकतो. ‘आर्त’ आणि ‘आरती’ या शब्दांचा परस्परसंबंध असण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीत. दोन्ही शब्दांची व्युत्पत्ती सापडल्यास ही अडलेली ओळ मोकळी होईल. पण, तसाही त्याने काहीही फरक पडत नाही. ओळीतील आर्तता आपल्याला अर्थ न कळताही भिडते. तरीही मला वाटतं सावरकर समजून घ्यायचे, तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित लिहिलेल्या कविता वाचाव्या. स्वतःशी साधलेला संवाद यातून दिसतो. त्यांचे अंतरंग त्यांच्याही नकळत उघड होते. संध्याकाळी रानात चुकलेले कोकरू जेव्हा त्यांना दिसते, तेव्हा त्यांच्या मनात येणार्‍या प्रत्येक भावनेला त्यांनी कवितेत मांडलंय. त्यानंतर पुढचा २४ तासांचा प्रवास ते सांगतात. कोकराची स्वतःशी तुलना करताना आपली आई गेल्याची आठवण तीव्रतेने होऊन ते त्या मूक कोकराशी काय संवाद साधतात, हे वाचणे म्हणजे पर्वणी. त्याला पाहिल्यानंतर त्यांच्या मनात येणारे विचार, घेतलेले निर्णय, त्याच्यासोबतच घरापर्यंतचा प्रवास ते मांडतात.

तो दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन
गोजिरी कापण्या मान। जाण रे ॥७

भविष्यातील कृष्ण जग न पाहिलेला, केवळ आईच्या सावलीत राहिलेला काही महिन्यांचा भोळा जीव अंधार दाटू लागला, तरी तिथेच घुटमळतो. तेव्हा त्याच्या जाणिवा अजून प्रौढ नाहीत, हे सांगत त्याला ते आपल्या घरी आणतात. त्याच्या मऊ कुरळ्या केसांचं कौतुक करून झाल्यावर त्याच्यासाठी दूध घेताना या विनायकातील मातृत्व जागृत होतं. हा सशस्त्र क्रांतिचे नारे देणारा, तुरुंगातून आपल्या पत्नीला साश्रू नयनांनी माघारे पाठवणारा पुरूष चक्क आई मनाचा होतो!

बघ येथे तुझियासाठी। आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी। कां बरें ॥१४
तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली
माझीही माता नेली। यमकरें ॥१५

तो दूध पीत नाही म्हटल्यावर झाल्यावर आपल्या मनातील आई गेल्याची सल ते त्या जिवापाशी उघड करतात आणि मग त्यांच्या शब्दांना जे धुमारे फुटतात, त्यात विश्वाचे तत्वज्ञान सामावले आहे, असा भास होतो. माया कशी आपल्याला जोखडासारखी बांधून ठेवते हे सांगत ते पुढे म्हणतात,

मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्वरचि सारा
ममताही करिते मारा। वरति रे॥१
स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले
त्रिभुवनी सुख न त्यां कसलें। की खरे॥२१

केवळ आई नाही, तर पारतंत्र्याची चाहूल त्या पिल्लाची अशी दशा करते. ते पाहून केलेली पुढची पंक्ती तत्कालीन राजकीय स्थितीस चपखल लागू होते. दुसर्‍या दिवशी ते पिल्लाला आईपाशी घेऊन जातात, तेव्हा त्या मायकोकराचं मिलन कसं सांगतात पहा,

हंबरडे ऐकू आले। आनंदसिंधु उसळले
स्तनि शरासारखें घुसलें। किति त्वरें ॥२५

आईचं प्रेम मिळवण्याचा त्याला माहिती असलेला मार्ग म्हणजे तिच्या आचळांतून स्रवणारं, क्षुधेची तृप्ती करणारं ते दूध. त्याच्यासाठी बाणाच्या वेगात ते आईला भिडतं. प्रेम म्हणजे काय? पूर्णत्वासाठी केलेला अट्टाहास. आपल्या स्वार्थासाठी निरभ्र मनाने आपल्यावर प्रेम करणार्‍या जीवाचा शोषून घेतलेला जीवनरस. प्रेम स्वभावसुलभ आहे. ते घेणार्‍या इतकाच देणाराही आनंदाने अगदी थिजून जातो. आपल्या शरीरावर आपलं बाळ अवलंबून आहे. हे पाहून न जाणो किती सुखी होते ती आई.
सावरकर कवितेने जागृतीसोबतच समाजप्रबोधनाचेही कार्य केले. १९०२ साली पुण्यात ’हिंदू युनियन क्लब’च्या ’हेमंत व्याख्यान’मालेनिमित्त लिहिलेलं बक्षिसपात्र काव्य म्हणजे ’बालविधवा’. हिंदू समाजातील बालविधवांची स्थिती अधोरेखित करणारी ही आर्या.
स्वस्त्रीच्या निधनोत्तर जरि होति न विधुर अशुभदर्शन ते।
तरि विधवांवरि दुश्चिन्हांचे कां व्यर्थ ये सुदर्शन तें?
आस्मत्समाज वर्ते कौर्य जरि ना तथापि अन्याये।
विधवांशी अतिक्या की कीव तयांची परस्थ अन्यां ये॥

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री फारशी शिकत नव्हती की, कचेर्‍यांत जाऊन नोकरी करीत नव्हती. तेव्हा स्त्रीकडे पाहणारा तिची ओळख तिच्या पतीच्या नावाने करी. त्यात काय नवल? पण, हीच ओळख जेव्हा न कळत्या वयात पुसली जाते, स्त्रीत्वाची पुरती जाणीवही न झालेल्या वयात जेव्हा तिच्या शरीरावर आलवण येतं, कुंकू-स्त्रीधनाची सर्व आभूषणं पुसली जातात, तेव्हा तिच्या दुर्मुखलेल्या चेहर्‍याच्या प्रभेआड आलेलं हे वैधव्याचं सुदर्शन त्यांनी म्हंटलंय. ‘रूपक’ अलंकाराचा वापर यामध्ये केलेला दिसतो. पत्नी स्वर्गवासी झालेल्या पुरुषाकडे नजर गेली, तर समाज हळहळतो. मात्र, विधवा स्त्रीकडे नजर जाणं म्हणजे अशुभदर्शन! हा समाज दृष्टिकोनातला विरोधाभास ते अधोरेखित करतात. तिला क्लेश होऊ नयेत म्हणून तिच्या सासर-माहेरची माणसं तिची इतकी काळजी घेतात. परंतु, तिच्यावर होणारा अन्याय मात्र, त्यांना दिसत नाही. इतर माणसांनी त्यांची कीव करावी, असे दिवस त्यांच्यावर येतात. हे सांगताना ते कुठेही समाज व्यवस्थेवर, रुढी परंपरांवर ताशेरे ओढत नाहीत, तर जे स्पष्ट दिसणारं चित्र आहे, ते अधिक प्रकाशात आणून उलगडून दाखवतात. सौम्य शब्दात केलेला हा विद्रोह किती सुंदर आहे!

त्यांनी लावणीही लिहिलीय! ’गणिकेचा छंद’ ही लावणी लिहिताना ते स्त्रीपुरुषाची सौंदर्याशक्ती विशद करतात. ही लावणी १९०० साली नाशिक येथे असताना एका तमासगीर फडास लिहून दिली होती. एका स्त्रीचा आपल्या पतीशी सुरू असलेला हा संवाद आहे. गणिकेकडे जाण्यापासून पतीला परावृत्त करणारी स्त्री गणिकेला चंचल लक्ष्मीची उपमा देते. विशेष म्हणजे या लावणीत स्त्री-पुरूष संवाद आहे.

स्त्री: नव्हे ती लक्ष्मीहुनि चंचला
पति : मम पद घेअनि हळूच चुरते मृदुहस्ते कोमला,
कशी ती ठकविल सुंदरि मला

पुरुषाची बुद्धी मात्र याबाबतीत अगदी सरळमार्गी. आपले लाड करणारी स्त्री म्हणजे आपल्याइतकीच शुद्ध मनाची असल्यासारखे त्यास वाटते. अगदी आजच्या जगातही अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची कारणे म्हणजे विवाहबाह्य संबंध. हे संबंध ज्या काळी समाजमान्य होते, त्याकाळी आपल्या पतीला समजावण्यापासून ते अर्थविषयक मार्गदर्शन करत, ‘परस्त्रीचा नाद कसा असू नये’ हे ती अशिक्षित सहचारिणी समजावण्याच्या सुरात सांगते. राजकीय क्रांतीसोबतच समाजप्रबोधन हे याच अभिजात कलांचं सामाजिक उत्तरदायित्व आहे, हे या लावणीतून स्पष्ट होतं.

मात्र त्यांचं लग्न झाल्यानंतर, प्रथम मिलनानंतर प्राप्त झालेलं पितृत्वाचं सुख. ते लिहितात,
परंतु अमुचें अभिनव यौवन, त्यात पितृत्वाचा।
प्रथम समागम, गमुनी लज्जा - विनय मन साचा॥

पितृत्वाचा पहिला पुरावा सांगणारा प्रभाकराचा जन्म. सावरकर तुरुंगात असताना जेव्हा चार वर्षाचं ते बाळ जातं, तेव्हा त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिहिलेली ही कविता तशी गाजली. मला अधोरेखित करावीशी वाटते, ती या कवितेच्या उत्तरार्धातील ओळ-

परि जै वारे क्रुद्ध वर्षती मेघ-शिला-धारा
सुरक्षित न हे गमे गृह सख्या तुझिया आधारा।

निसर्गातील आपदांचा उल्लेख करताना चतुराईने सावरकर तत्कालीन सामाजिक स्थिती निरागस बालकांसाठी किती चुकीची आहे, यावर बोट ठेवतात. सुरक्षेच्या दृष्टीने, आधाराच्या दृष्टीने प्रभाकराचे या जगात नसणेच कसे योग्य, असे मानून ते स्वतःची समजूत घालताहेत असे वाटते. प्रभाकर आणि त्याच्या आईच्या नसण्याचे त्यांचे दुःख वेळोवेळी विविध कवितांतून दिसून आले आहे. मात्र, ही कविता खास प्रभाकरच्या स्मृतीतच लिहिलेली आहे.

कालसापेक्ष विचार, सुश्राव्य वाणी आणि क्रांतिकारी वाचा लाभलेल्या या ध्येयधुरंधर कविश्रेष्ठाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.