शहरांमधील अग्निशमन यंत्रणा गॅसवर आणि फायर ऑडिटची गरज

    23-May-2023   
Total Views |
Need fire audit in metropolitan cities

 मुंबई असो पुणे अथवा नाशिक दिवसेंदिवस शहरांमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये प्रकर्षाने वाढ झालेली दिसते. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांपासून ते टोलेजंग इमारतींपर्यंत अग्निशमन यंत्रणांतील त्रुटी कित्येक घटनांतून समोर आल्या आहेत. तेव्हा, इमारती, कारखाने, कार्यालये या सगळ्यांचे गांभीर्याने फायर ऑडिट करुन त्यावर वेळीच उपाययोजना करणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल.

दाटीवाटीने वसलेल्या निवासी वा अनिवासी इमारती (हॉस्पिटल, हॉटेल, ऑफिस, शैक्षणिक, इत्यादी) चाळी, झोपड्या इत्यादींमध्ये अतिशय बेदरकार वृत्तीमुळे, निष्काळजीपणामुळे आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे ‘शॉर्टसर्किट’, गॅसगळतीतून आगी लागणे ही मुंबई, पुणे, नाशिक व अन्य शहरांमध्ये आता नित्याची बाब बनली आहे. तसेच, काही उद्योगधंद्यांच्या, व्यापारी इमारती वा गगनचुंबी इमारतींमध्ये जी अग्निशमन यंत्रणा लावणे नियमाने बंधनकारक असते, ती यंत्रणासुद्धा योग्यरितीने कार्यान्वित केलेली नसते. बरेचदा अशी अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात असली तरी ती योग्यप्रकारे अद्ययावत आहे का, हेसुद्धा तपासले जात नाही.

या सगळ्या घटनांमधून इमारतींना शहरात दिवसाला दोन छोट्यामोठ्या आगी सातत्याने लागतातच व त्यामुळे अग्निशमन दलाचे काम वाढले आहे. हे काम अतिशय जोखमीचे असते व अग्निशमन जवानांना ते जीवाची पर्वा न करता करावे लागते. जुन्या वा झोपडपट्टीच्या भागांत पोहोचण्यासाठी रस्ते चिंचोळे असल्याने अग्निशमन दलाला आगी लागल्यानंतर तेथे पोहोचण्यास उशीर होतो. अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी आगीच्या घटनांव्यतिरिक्त इमारती पडणे, झाडे पडणे, पूर, भूकंप इत्यादी संकटांना तोंड देऊन अडकलेल्या नागरिकांची सुटका करत असतात. त्यामुळे या समस्येवर नेमक्या काय उपाययोजना करता येतील, ते समजून घ्यायला हवे.

मिनी अग्निशमन केंद्रे

दाटीवाटीच्या वस्तीकरिता परिसरातच अग्निशमन केंद्र असेल, तर आगीवर त्वरित नियंत्रण मिळविणे सोपे जाते. लवकरच मुंबईतील मालाड उपनगरात आनंदनगर-अप्पापाडामध्ये असे मिनी अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. कारण, हा हजारो झोपड्यांनी व्यापलेला दाटीवाटीचा परिसर आहे. या भागात डोंगरावर एकमजली, दुमजली झोपड्या उभ्या आहेत. मार्चमध्ये या भागात भीषण आग लागली होती. त्यावेळी अशा दाटीवाटीच्या वस्तीत अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब लागला होता. १२ फायर इंजिन, दहा टँकर आणि अन्य यंत्रणा दाखल झाल्यानंतरही ही आग विझविण्यास भरपूर वेळ लागला होता. म्हणूनच आता साधारण चार एकर जागेतील १ हजार, ५०० ते दोन हजार चौ. मी. जागेत हे मिनी अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. सध्या मुंबईत ३५ मोठी व १९ लहान अग्निशमन केंद्रे आहेत. भविष्यात पाच मोठी व एक लहान केंद्र उभारले जाईल आणि सध्या ५४ असलेली ही संख्या भविष्यात ६०-७० पर्यंत जाईल.

अग्निशमनाला बळकटी आणणार

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात जर्मन बनावटीच्या ६४ मीटर उंचीच्या दोन वाहन शिड्या (टर्नटेबल लॅडर) नुकत्याच दाखल झाल्या आहेत. रहिवाशांना सुरक्षित जागी पोहोचविण्यासाठी एकावेळी १६ नागरिकांची सुटका करता येईल. मुंबई पालिकेचे अग्निशमन दल हे अत्याधुनिक यंत्रणांनी व तंत्रज्ञानाने तुलनेने सुसज्ज आहे. त्यात डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली, रोबो, ९० मी.उंचीपर्यंतचे टर्नटेबल म्हणजेच हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर हॅजमेट, अतिशीघ्र प्रतिसाद वाहने, श्वसन मास्क, ड्रोनच्या चाचण्या होणार, आणखी दोन रोबो आणि २२ क्विक रिस्पॉन्स व्हेईकल दाखल होणार आहेत.

आपत्तींशी लढा देण्याचे प्रशिक्षण

इमारत कोसळणे, पूर, आग, भूकंप इत्यादी विविध प्रकारच्या आपत्ती येतात, त्यावेळी घाबरून न जाता आपत्तीतून मार्ग काढणे आवश्यक ठरते. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार, १८ ते ४० वयोगटातील नागरिकांसाठी ’आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा एक हजार नागरिकांना विशेष प्रशिक्षण कार्यक्रम महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत राहणार आहे. ये-जा करण्यासाठी १५० रु. भत्ता असेल. तसेच, चहा व भोजनाची व्यवस्था राहणार आहे.

आता ‘फायर वुमन’ची झेप

मुंबईमध्ये अग्निशमन दलात ९१० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या दलात महिलांनीही आपला ठसा उमटावयाला सुरुवात केली आहे. भायखळा अग्निशमन दलातील स्वाती सातपुते या ‘फायर वुमन’ ठरल्या आहेत. २०१२ मध्ये तीन महिलांना साहाय्यक केंद्र अधिकारी पदावर भरती करण्यात आले होते. यापैकी सुनीता खोत व एस. व्ही. भोर या दोघींना दि. ११ ऑगस्टला केंद्र अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाची आगीबद्दल महत्त्वाची निरीक्षणे

मुंबईमध्ये जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत आगीच्या तब्बल ७४६ घटनांची नोंद आहे. शॉर्टसर्किट व निष्काळजीमुळे तसेच धुम्रपान करताना लागलेल्या आगीच्या घटना या सर्वाधिक आहेत. जुन्या झालेल्या आणि सदोष वायरिंगमुळे या वर्षात सर्वाधिक आगीच्या (७४६ पैकी ३९० हून अधिक) घटना घडल्या आहेत.
या बाबी लक्षात घेता, नवीन अग्निसुरक्षा विधेयकात इलेक्ट्रिक तारांच्या गुणवत्तेवरही भर द्यायला हवा. आगीच्या अपघातांचे मुख्य कारण निकृष्ट दर्जाच्या विजेच्या तारा आणि केबल्सचा वापर हे असून प्रस्तावित कायद्यात कोणताही दंडक नसल्याबद्दल माजी अग्निशमन अधिकारी पी. एम. रहांगदळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
बरेचदा अग्निशमन उपकरणे ही वापराविनी अशीच पडून असतात. अनेक इमारतींमध्ये आग प्रतिबंधित करणारी उपकरणेसुद्धा देखभाल-दुरूस्तीशिवाय पडून राहिलेली आहेत. याबद्दल गेल्या दोन-तीन महिन्यांत शेकडो इमारतींना मुंबईत नोटिसा बजावल्या आहेत. त्याअंतर्गत ६४ इमारती व ३५८ हॉटेल्स अग्निशमन दलाने तपासली. त्यात मुंबईतील १८ इमारती व २६ हॉटेल्समध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. तसेच ‘सीआरएस व्हिजिलन्स’ खात्याने एलटीटी स्थानकावर ११०० किग्रॅम ज्वलनशील बेकायदेशीर पदार्थ पकडले. त्यावर योग्य ती ‘अ‍ॅक्शन’ घेतली.

मुंबई अग्निशमन दलाला मानांकन

अशी मिळाली चार मानांकने - दर्जेदार व्यवस्थापन प्रणालीकरिता ‘आयएसओ’ ९००१ : २०१५; पर्यावरण व्यवस्थापनासाठी ‘आयएसओ’ ४५००१ : २०१५; आरोग्य आणि सुरक्षितता व्यवस्थापनासाठी ‘आयएसओ’ ४५००१ : २०१८; माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीसाठी ‘आयएसओ’ / आयसी कमिटी २७००१ : २०१३.
१९व्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ १०-१२ लाख होती. आज ती १४-१५ पटींनी वाढली आहे. त्यामुळे शहरात सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे.
अग्निशमन दलाच्या सेवेतील १३ अधिकारी व जवानाना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके व राज्यपालांच्या हस्ते अधिकार्‍यांचा सन्मान झाला आहे.

महामुंबईतील २०२३ मधील काही आगीच्या घटना

२६ जानेवारी - लोखंडवाला परिसरातील एका २८ मजली इमारतीला विद्युतपुरवठा करणार्‍या वाहिन्यांच्या डक्टमध्ये आग लागली. विद्युतवाहिन्या जळल्यामुळे इमारतीत सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन दलाने ती आग वेळेवर विझविली. एकूण दहा जणांना (त्यात काही ज्येष्ठ वयाचे होते) कोकिलाबेन रुग्णालयात न्यावे लागले. कोणालाही मोठी इजा झाली नाही. फायर अग्निशमन दलाकडून आग कशी लागली, याचा तपास सुरू आहे.

१४ मार्च - ओशिवरा व मालाड पूर्व येथे आगी लागल्या. ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये लेव्हल तीन फायर लागल्यावर अग्निशमन दलाने दहा फायर इंजिने व सहा जंबो वॉटर टँकर आणून ती विझविली. कोणीही जखमी झाले नाही. दुसर्‍या ठिकाणी - मालाड पूर्वेच्याआप्पापाडा-कुरारच्या लेव्हल तीन आग घटनेमध्ये दहा हजार चौ.मी. जागेतील २५० झोपड्यांना आग लागली. १२ फायर इंजिने व आठ जंबो वॉटर टँकर घटनास्थळी आणले होते. आगीत सुमारे १५०० माणसे अडकली होती. काही माणसे डेब्रिजखाली सापडली. आग विझवत असताना १५-२० गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली होती. एका काळा ठिक्कर पडलेल्या माणसाला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर केंद्रावर न्यावे लागले. त्याला दुर्दैवाने मृत्यू आला.

९ एप्रिल - टेमघर पाड्याच्या भिवंडीच्या १२ माळ्याच्या हायराईज बी विंगला (४८ फ्लॅट व २०० माणसे राहत असलेली) मोठी आग लागली. तेव्हा कमीतकमी २२ माणसांची सुटका करण्यात आली. नवव्या माळ्यावरील इलेक्ट्रिकच्या डकला आग लागली. जाग्यावर दोन फायर इंजिने नेली होती.

१६ मे - खार पश्चिम खारदांडा कोळीवाडा परिसरातील वायूगळतीमुळे सकाळी आग लागली. या आगीत सहाजण जयस्वाल घरातील ४० ते ५० टक्के भाजले गेले आहेत. यात दोन बालके आहेत. त्यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात व कस्तुरबामध्ये दाखल केले आहे. दोन जणांना व इतरांना पण ऐरोलीच्या ‘नॅशनल बर्न केंद्रा’वर उपचार सुरू आहेत. सहा जखमींपैकी सखुबाई जयस्वाल (६५) ८७ टक्के भाजल्या गेल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खारच्या गोविंद पाटील मार्गावरील हरिश्चंद्र बेकरीजवळ ही दुर्घटना घडली. रात्रभर वायूगळती झाल्यामुळे शेगडी पेटवल्यावर सकाळी आग भडकली असावी. अर्ध्या तासात आग नियंत्रणात आणली गेली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.