पुन्हा पठाडेंच्या गळ्यात बाजार समिती सभापती पदाची माळ

    22-May-2023
Total Views |
 
Radhakishan pathade
 
 
छत्रपती संभाजीनगर : बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे राधाकिशन पठाडे यांची तर उपसभापती पदी शिंदे गटाचे मुरली चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. १४ विरुद्ध ४ अशा मतांनी हे दोघेही विजयी झाले. भाजप-शिंदे गट युतीने बाजार समितीतील १८ पैकी ११ आणि ती हमाल, मापाडी, व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेल्या संचालकांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे १४ जागा जिंकल्या.
 
सभापती पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा असल्याने आमदार हरिभाऊ बागडे यांनी १४ संचालकांना गुजरात सहलीवर पाठवत काळजी घेतली. भाजपकडून माजी सभापती राधाकिशन पठाडे, श्रीराम शेळके आणि निवडणुकीत युतीच्या पॅनलमधून लढलेले अभिजीत देशमुख इच्छूक होते. त्यामुळे बागडे कोणाच्या नावाला पंसती देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
 
माजी सभापती राधाकिशन पठाडे हे बागडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे याआधी देखील त्यांना सभापती पदावर संधी देण्यात आली होती. आता पुन्हा बागडे यांनी पठाडे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे संचलाक मंडळ निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून पठाडे यांच्यावर एकापाठोपाठ एक संकट येत होती.
 
महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ काळे यांनी पठाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. तर पठाडे यांनी देखील काळे हे व्यापारी आणि त्यांच्या नावावर गाळा असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या निवडणुकीत राजकारण चांगलेच तापले होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.