राजेशाही राज्याभिषेकाचा थाट अन् ब्रिटनचा रिकामा माठ! (भाग-१)

    19-May-2023
Total Views |
charles

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा आलिशान राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्याचा अंदाजे १०० दशलक्ष पाऊंडांचा खर्च आर्थिकदृष्ट्या गटांगळ्या खाणार्‍या ब्रिटनला करावा लागला. याविरोधात आणि ‘राजेशाही नकोच’ म्हणून ‘नॉट माय किंग’ अभियानही ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यानिमित्ताने ब्रिटनचा माठ रिकामा असताना केलेला राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा थाट, राजेशाहीचा इतिहास आणि ब्रिटनचे राजकारण यांचा आढावा घेणारा या लेखाचा पहिला भाग.

काय वाटेल ते झाले तरी जगात पाच राजे राहणारच! चार पत्त्यातले आणि पाचवा ब्रिटनचा, हे विधान खूप महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांचे आपल्या राजावर प्रेम असते, राजवंशाबद्दल त्यांच्या मनात आदराची, निष्ठेची भावना असते, हे जसे सर्वमान्य आहे, तसेच ब्रिटिशांचे देशप्रेमही असेच प्रसिद्ध. ब्रिटनमधील अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करून ऑस्ट्रेलियात पाठविले जायचे. असे सांगतात की, गुन्हेगारांनी भरलेले जहाज जेव्हा ऑस्ट्रेलियासाठी नांगर उचलायचे तेव्हा हे अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडायचे. ब्रिटिश राजवटीचा इतिहास हा एकापेक्षा अधिक ग्रंथांचा विषय आहे. ब्रिटिश राजवटीला आकार दहाव्या शतकात मिळाला आणि हे श्रेय स्कॉटलंडला जाते, असे एक मत आहे.

१०६६ मध्ये नॅार्मन लढवय्यांनी इंग्लंड जिंकले. नंतर वेल्स आले आणि त्यानंतर अँग्लो-नॅार्मन यांचा अंमल या भूभागावर सुरू झाला. ब्रिटिश राजेशाहीला एका अलिखित घटनेनुसार मान्यता आणि घराणेशाहीला रीतसर मान्यता मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला. पुढे राजा आणि राजाबरोबर राजाचे कुटुंबीय यांच्याकडेही यथावकाश काही अधिकार आणि कर्तव्ये सोपविण्यात आली. त्यांना अधिकृत, औपचारिक, राजनैतिक आणि प्रातिनिधिक अधिकार व कर्तव्येही सोपविण्यात आली. राजाला पंतप्रधान नेमण्याचा अधिकार मिळाला. आज पंतप्रधान लोकशाही पद्धतीने निवडला जात असला तरी त्याची औपचारिक नेमणूक राजा करतो. तेव्हा, राजेशाही परंपरा आणि आधुनिकता यांचे संतुलित पालन होत असते. राजेशाहीवर परिणाम करणार्‍या कायद्यांबाबत मतप्रदर्शन करण्याचा अधिकार राजाला असतो. राजा सैन्यदलांचा प्रमुख असतो. भलेही युद्ध पुकारण्याचा आणि तह करण्याचा प्रत्यक्ष अधिकार पंतप्रधान आणि संसदेला असला तरी. प्रथा, परंपरा आणि प्रत्यक्ष अधिकार यांचा संगम ब्रिटिश राजेशाहीत पाहायला मिळतो.

‘युनिक सॉफ्ट पॅावर अ‍ॅण्ड डिप्लोमॅटिक अ‍ॅसेट’ या शब्दात ब्रिटिश राजेशाहीचे वर्णन केले जाते. या ब्रिटिश राजेशाहीने ब्रिटिश हितसंबंध आणि मूल्ये यांची जपणूक केली, पर्यटनाला प्रोत्साहन दिले आणि धर्मादाय उद्दिष्टांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या निमित्ताने एक महत्त्वाचा तपशील मात्र नोंदवायलाच हवा. तो असा की, हे सर्व ब्रिटिशांपुरतेच मर्यादित होते. इतर राजेशाहीत हे या प्रमाणात घडल्याची फारशी उदाहरणे सापडत नाहीत, हेही ध्यानात घेतले पाहिजे. ब्रिटनमध्ये आजवर ३८ सम्राट होऊन गेले. एडवर्ड पाचवे यांचा १५व्या शतकात खून झाला होता, तर आठव्या एडवर्ड यांनी एका अमेरिकन विधवेशी-वॅलिस सिम्पसनशी-प्रेमाखातर लग्न करण्याचे ठरविले आणि त्यांनी सम्राटपदावर पाणी सोडले. ‘सम्राट असलात म्हणून काय झाले, काही रीतीनियम तुम्हालाही लागू असतील, अशी रूढीवादी ब्रिटिशांची भूमिका होती, तर ‘मी प्रेमापुढे सम्राटपदाचा त्याग करण्यासही तयार आहे,’ ही आठव्या एडवर्डची भूमिका होती. दोघेही ब्रिटिशच!

ब्रिटनची राणी-एलिझाबेथ

सध्या चिरविश्रांती घेत असलेली ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिचा जन्म दि. २१ एप्रिल, १९२६चा. तिचा मृत्यू दि. ८ सप्टेंबर, २०२२चा. म्हणजे ९६ वर्षांचे दीर्घ आयुष्य तिच्या वाट्याला आले होते. ब्रिटनच्या राणीचा ७० वर्षांचा दीर्घ राज्यकाळ ‘प्लॅटिनम ज्युबिली’ म्हणून जून २०२२ मध्ये साजरा करण्यात आला. हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा समारंभ होता. दि. २ जून ते ५ जून, २०२२ या काळात हा ब्रिटिश राजघराण्यातला पहिला ज्युबिली समारंभ होता. मुख्यत: ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, पापुआ न्यूगिनी, मलेशिया, पाकिस्तान आणि ब्रिटन यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केले. चीन, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल अमेरिका यांनी शुभेच्छा पाठविल्या. खास टपाल तिकिटे, नाणी प्रसारित करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. राणीची कारकिर्द दि. ६ फेब्रुवारी, १९५२ सुरू झाली होती. ती दि. ८ सप्टेंबर, २०२२ ला संपली. म्हणजे एकूण ७० वर्षे २१४ दिवस होतात. राणीचा कार्यकाळ ब्रिटिश सम्राटांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा कार्यकाळ मानला जातो. एलिझाबेथ यांचा पती प्रिन्स फिलिप हा तसा ‘ड्यूक ऑफ एडिंबरो!’ जन्म दि. १० जून, १९२१ आणि मृत्यू दि. ९ एप्रिल, २०२१. म्हणजे शतक दोन महिन्यांनी हुकले होते.

‘बीबीसी’चा दुटप्पीपणा?

इंग्लंडमध्ये गेल्या आठवड्याच्या अखेरीस राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची लगबग सुरू होती. बहुतांश जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागलेले होते. याच काळात प्रसारमाध्यमांशी संबंधित अशी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. ज्या घटनेकडे कुणाचेच फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ म्हणजे ‘बीबीसी’ ही प्रसारमाध्यमांशी संबंधित एक जगप्रसिद्ध वृत्तसंस्था. ती माध्यम स्वातंत्र्याच्या नावाने सतत डंका पिटित असते. ‘आम्ही कुणालाही भीत नाही,’ असा तिचा नारा. कदाचित म्हणूनच तिची भीती वाटत नाही, असे घटक फारसे सापडत नसावेत. या ‘बीबीसी’च्या रथाची चाके जमिनीला कधीच टेकली नसावीत, असा सर्व वृत्तसृष्टीचाही समज होता. पण, माध्यम स्वातंत्र्याची ध्वजा सतत मिरवणार्‍या या वृत्तसंस्थेने ब्रिटिश राजघराण्यापुढे मात्र गुडघे टेकले. ब्रिटनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्या होणार्‍या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाची सेन्सॉरशिप करण्याचा अधिकार ‘बीबीसी’ने राजघराण्याला देऊन टाकला.

राज्यारोहण समारंभातील कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या आणि कोणते प्रसंग अथवा कोणत्या घटना प्रक्षेपित करायच्या नाहीत, हे ठरवण्याचे अधिकार ‘बीबीसी’ने निमूटपणे राजघराण्याच्या प्रतिनिधींच्या हाती सोपविले. ‘रॅायल फॅमिली हॅज पॅावर टू सेन्सॅार बीबीसी कोरोनेशन कव्हरेज’, असे आठ कॉलमी हेडिंग देऊन काही प्रसार माध्यमांनी ‘बीबीसी’ला वेदनादायी चिमटा काढला आणि ‘बीबीसी’च्या रथाची चाके जमिनीला टेकली. यासोबत प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहण समारंभाच्या प्रक्षेपणाची जबाबदारी असणार्‍या क्लेरी पॉपेलवेल या ‘बीबीसी’च्या संपादकीय अधिकारी महिलेला ब्रिटिश राजघराण्याने ‘द व्हिक्टोरियन ऑर्डर’ या किताबाने सन्मानित केले, हा केवळ योगायोग समजावा, हेच शहाणपणाचे ठरेल. जी व्यक्ती ब्रिटिश राजघराण्याची विशेष सेवा बजावेल, तिलाच हा किताब प्रदान केला जातो, हाही योगायोगच समजावा, हे चांगले. प्रिन्स चार्ल्स यांच्या राज्यारोहणाचा मुख्य कार्यक्रम अर्थातच बकिंगहॅम पॅलेसमध्ये होणार होता. वेस्टमिन्स्टर अबे आणि रॉयल चर्च इथे ‘प्रेयर सर्व्हिसेस’ संपन्न झाल्या. यातील निवडक प्रसंगांचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण अर्थातच ‘बीबीसी’ने केले. पण, त्या प्रक्षेपणाची निवड करण्याचे अधिकार मात्र ‘बीबीसी’च्या प्रशासनाने राजघराण्यातील प्रतिनिधींना प्रदान केले होते. काही जळकुकडे ‘बीबीसी’च्या या भूमिकेला ‘दुटप्पी’ म्हणून नावे ठेवत असतील, तर तिकडे आपण दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल.

हुजूरपक्षाला धोबीपछाड

याच या काळात ब्रिटनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाला (कर्न्झव्हेटिव्ह पार्टी) मजूरपक्षाने (लेबर) धोबीपछाड दिली. मजूर पक्षाने ७१ नगरपालिका जिंकल्या. हुजूर पक्षाला फक्त ३३ नगरपालिकाच जिंकता आल्या. मजूर पक्षाचे २ हजार, ६७४ उमेदवार विजयी झाले. याउलट हुजूर पक्षाचे २ हजार, २९६ उमेदवार विजयी झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून राष्ट्रीय निवडणुकांचा कल दिसतो किंवा कसे हे जो तो आपल्या सोयीनुसार ठरवत असतो. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाने या निवडणुकांच्या निकालांचा विचार करण्याचे ठरविले, हा नित्याच्या अभ्यासाचा भाग होता/आहे, असे आपणही मानावे हेच बरे.

जॉन्सन, ट्रस आणि सुनक

भरपूर संख्येत खासदारांसह निवडून आलेल्या बोरिस जॅान्सन यांना हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला तो त्यांच्या अपात्रतेमुळे, भ्रष्टाचारामुळे आणि खुशालचेंडूपणामुळे. शेवटी जॅान्सन यांच्या ५० सहकार्‍यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊ केले, यात तीन मंत्रीही होते. ‘राजीनामा द्या’, हीच या सर्वांची मागणी होती. त्यामुळे या निगरगट्ट नेत्याला पायउतार व्हावेच लागले. टंचाई आणि महागाई यांनी या काळात ब्रिटनला ग्रासले होते. जनता त्रस्त आणि संतप्त झाली होती. जॉन्सन यांच्यानंतर एलिझाबेथ ट्रस या पंतप्रधान पदावर आरूढ झाल्या. पण, दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे त्यांनाही हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्या केवळ ४४ दिवसच पंतप्रधानपदावर होत्या. चुकीच्या आर्थिक धोरणांचे होणारे राजकीय परिणाम किती भयंकर असू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून ट्रस यांची अत्यल्पकालीन राजवट अढळपदी असेल. रेवडीवाटपामुळे विकसित देशांचीही कशी दैना होत असते, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. जनतेचा संताप, निराशा, अपेक्षाभंग, हालअपेष्टा वाढतच जात चालल्या होत्या. या पृष्ठभूमीवर ऋषी सुनक हे हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान झाले. पण, त्यांच्या हातीही काही जादूची कांडी नव्हती. तरीही ते आपल्या परीने ब्रिटनचे अर्थकारण रुळावर यावे, यासाठी कसोशीने प्रयत्न करीत होते/आहेत.

ब्रिटनमध्ये नवीन राज्याचे राज्यारोहण कोणत्या परिस्थितीत होत होते, हे लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल. सुनक हे जॉन्सन यांच्यासारखे बेफिकीर, बेजबाबदार, बालबुद्धीचे नाहीत नाहीत किंवा एलिझाबेथ ट्रस यांच्यासारखे र्‍हस्व दृष्टीचेही नाहीत, ही त्यांची जमेची बाजू असली तरी त्यांच्यासमोर आव्हानांचा अजस्त्र डोंगर आहे. सुनक यांना पक्षांतर्गत विरोधकांशीही सामना करावा लागत असताना स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाच्या मोठ्या पराभवामुळे पक्षांतर्गत विरोधकांचे बळ मात्र वाढणार आहे. ब्रिटनच्या आजच्या स्थितीला सुनक जबाबदार नसतीलही, नव्हे ते नाहीतच, पण वारसा हक्काबरोबर आलेली जबाबदारी ते नाकारू शकत नाहीत. बिघडलेली अर्थकारणाची घडी, जोडीला कोरोनाच्या उथळ हाताळणीमुळे ढेपाळलेले आरोग्य क्षेत्र, ऊर्जा आणि जीवनावश्यक वस्तूंचे कडाडलेलेले दर आ वासून सुनक यांच्यासमोर उभे असताना सरकारी उत्पन्नाच्या स्रोतांनी मात्र कूस बदललेली दिसत नाही. (क्रमश:)

वसंत गणेश काणे 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.