तंदूर कांड ते...

    07-Mar-2023
Total Views |
Tandoor scandal case to Shraddha Walker case
 

२८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९५ मध्ये दिल्लीत तंदूरकांड उघडकीस आले होते. दिल्ली युवक काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षाने आपली पत्नी नैना साहनी हिची गोळ्या झाडून हत्या केली. तिच्या प्रेताचे तुकडे तंदूरमध्ये जाळण्याचा घृणास्पद प्रयत्नही केला. या घटनेनंतर सुनील शर्मा सारखेच अनेक नराधम जन्माला आले आणि त्यांनी आपल्या जोडीदाराला ऐनकेन प्रकारे संपविण्याचा प्रयत्नही केला. अलीकडेच श्रद्धा वालकर प्रकरण देशभर गाजले. या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला तुरुंगात असून, त्याच्यावर आरोपपत्रही निश्चित करण्यात आले आहे. या घटनेनंतरही हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे. गेल्या तीन महिन्यांत यात तब्बल १३ घटनांची भर पडली. जोडीदाराची हत्या केल्यानंतर तंदूरच्या ऐवजी हल्ली मोठा फ्रीज किंवा अन्य साधनांचा वापर होऊ लागला आहे. हत्या केल्यानंतर जोडीदाराचे तुकडे करुन ते काही दिवस साठवून ठेवायचे त्यानंतर ते इतरत्र फेकून द्यायचे. परंतु, विज्ञानाच्या दूरदृष्टीतून असे नराधम सुटत नाहीत. त्यांना जेरबंद केले जातेच. श्रद्धा वालकर प्रकरण गाजत असतानाच छत्तीसगढच्या बिलासपूर येथे त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. यामध्ये आरोपी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून पाण्याच्या टाकीमध्ये टाकून दिले.आरोपी पतीचे नाव पवन ठाकूर असे असून त्याच्या मृत पत्नीचे नाव सती साहू आहे. चारित्र्यावर संशय, धार्मिक रुढींसाठी दबाव, संपत्तीचा वाद, कौटुंबिक मतभेद, सक्ती किंवा संशय या कारणास्तव अशा घटना एकापाठोपाठ घडत आहेत. यातून हल्लीच्या मुली, महिला धडा घेण्याऐवजी पुन्हा पुन्हा तेच घडत आहे. अनेक मुली घरांतील विरोध डावलून ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारतात. कालांतराने त्यांच्यात खटके उडतात. त्यातूनच एकापाठोपाठ एक अशा घटना घडत आहेत. जोडीदारासोबत पटत नसल्याने कमी अधिक प्रमाणात मतभेद होण्याच्या घटना अन्य देशांतही घडतात. मात्र, तेथे क्रूरता हा प्रकार नसतो.भारतात मात्र जागतिक महिला दिनाच्या आठवड्यातच महिलांची क्रूर हत्या आणि अत्याचाराच्या भीषण घटना घडल्या. भारताची झेप जागतिक महासत्तेकडे जात असताना, ‘तंदूरकांड ते फ्रीजकांड’ हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद नाही.


सारे काही बिनहंगामी!


नकोशा पाहुण्यांचे आगमन झाल्यावर यजमानाचे हावभाव ज्याप्रमाणे बदलतात, तशीच अवस्था हल्ली आपली सगळ्यांची झाली आहे. घराबाहेर पडताच हल्ली कोणता ऋतू सुरू आहे, हे सांगता येणे कठीण होऊ लागले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत वकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्या आधी थंडीचा प्रकोप वाढला असताना अचानक ’ऑक्टोबर हीट’चे चटके जाणवू लागले. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा या पंधरवड्यात आपण तीनही ऋतूंचा अनुभव घेतला. निसर्गाचे बिघडलेले हे वेळापत्रक कुतूहलाचा विषय नसून तो आपल्या जीवनमानाशी अत्यंत निगडित आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे पीकपाण्याला फटका बसत आहे. भाजीपाल्याचे उत्पन्न घटले आहे. द्राक्ष आणि आंबा बागायदतदार यांचे गणित कोलमडले. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच आपल्या वैयक्तिक आरोग्यावरही बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम होत आहे. विशेष करुन मुले आणि महिलांसाठी त्याचप्रमाण ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, अशा मंडळींना या वातावरणामुळे त्रास होत आहे. दमा, नेत्रविकार त्वचेचे आजार तसेच खोकला, ताप या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्या ठिकाणी अनेक औषधोपचार करुनही आपण सुदृढ नाही, त्या ठिकाणी इतर सजीव आणि वनस्पतींची काय अवस्था होऊ शकेल, याची कल्पनाच करवत नाही. मानवाच्या बिघडलेल्या आरोग्याचा कबुतरांच्या विष्ठेशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे हल्ली कबुतरखान्यांजवळून जातानाही अनेकजण घाबरतात. पूर्वी कबुतरांना धान्य देण्यासाठी असलेली उत्सुकता हल्ली आजाराच्या भीतीमुळे नकोशी झाली आहे. एकंदरीतच निसर्गाच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा हा परिणाम आहे. आणि त्यास सर्वार्थाने मानवच जबाबदार आहे. पर्यावरण अभ्यासक नेहमीच सांगतात. निसर्गाच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करु नका. परंतु, विकासाचा रथ हाकण्यासाठी ते करावेच लागते. त्यासाठी पर्यावरणपूरक विकास हाच एकमेव मार्ग आहे. त्याची अंमलबजावणी सर्व देशांसह प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, अन्यथा म्हणतात ना ‘बेमोसम बारीश’चे सत्र सुरूच राहणार!-मदन बडगुजर

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.