हाफिज सईदची मुलाखत घेणाऱ्या वेद प्रताप वैदिक यांचं निधन

    14-Mar-2023
Total Views |
Ved Pratap Vaidik Death

 
नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे दि. १४ मार्च रोजी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. वैदिक हे हिंदीतील प्रसिद्ध पत्रकारांपैकी एक आहेत. प्रसिद्धीच्या झोतात आलेला दहशतवादी हाफिज सईदची त्यांनी मुलाखत घेतली होती.त्यावेळी वैदिक यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती.वैदिक हे राजकीय विश्लेषक आणि स्वतंत्र स्तंभलेखक होते. देशभरात सुरू असलेल्या समस्यांवर ते नियमितपणे आपली मते लिहीत असत.

वैदिक हे सकाळी ९.३० च्या सुमारास गुडगाव येथील त्यांच्या घरी शौचालयात गेले होते आणि तिथेच ते बेशुद्ध पडले. शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे संभाव्य कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वैदिक हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) हिंदी वृत्तसंस्था 'भाषा' चे संस्थापक-संपादक होते. ते पूर्वी टाईम्स समूहाच्या नवभारत टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक होते आणि भारतीय भाषा परिषदेचे शेवटचे अध्यक्ष होते.

२०१४ मध्ये वैदिक हाफिज सईदची मुलाखतही आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली, त्यावरून बराच वाद झाला होता.भारतात परतताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात गेल्यास तेथे त्यांचे जंगी स्वागत होणार नाही, असे म्हटले होते. या प्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला होता.

त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, 'वेद प्रताप वैदिक हे एक प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक होते ज्यांनी समकालीन विषयांवर आपल्या लेखणीतून मत व्यक्त केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही त्यांची गाढ पकड होती. त्यांच्या निधनाने हिंदी पत्रकारितेतील जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.