‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’ ही नोंदणीकृत राष्ट्रीय संघटना असून याचे मुख्यालय पुणे येथे आहे. गोविंदराव कुलकर्णी हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत व संपूर्ण देशभरात १५ पेक्षा अधिक राज्यांत ही संघटना कार्यरत आहे. महासंघाच्या डॉक्टर आघाडी, वकील आघाडी, उद्योजक आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी इत्यादी विविध ३२ आघाड्या आहेत. या महासंघाच्या कार्यकारिणीचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करताना मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. जाणून घेऊया या महासंघाबद्दल...
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या माध्यमातून संघटन कार्यासह अनेक सामाजिक, सांस्कृतिक, लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. प्रत्येक शहर, जिल्हा पातळीवर विविध उपक्रम होतात. स्वा. सावरकर जयंती, परशुराम जयंतीनिमित्त व्याख्याने प्रदर्शन, स्वागत यात्रा तसेच, मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरे, हळदी-कुंकू, कुंकुमार्चन सोहळा, ग्राहक पेठा, प्रदर्शन, शेतकरी मेळावे, महिला मेळावे, युवा मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थी गौरव सोहळा इत्यादी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नुकताच दि. २५ ते २८ फेब्रुवारी दिल्ली येथे ‘ब्रह्मोद्योग-२०२३’ हे भव्य प्रदर्शन व राष्ट्रीय कार्यक्रम झाला, ज्यामध्ये २५० पेक्षा अधिक उद्योजकांनी भाग घेतला होता व स्टॉल्स लावले होते. यानिमित्त दिल्लीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावादेखील तालकटोरा मैदान येथे पार पडला. त्यामध्ये पाच हजार लोकांची उपस्थिती होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार यांनीदेखील मार्गदर्शन केले व नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गोविंदराव कुलकर्णी, विक्रम जोशी, लक्ष्मीकांत घडफळे, आयोजक श्रीकांत बाडवे, नानासाहेब चितळे, रवींद्र प्रभुदेसाई तसेच अनेक प्रथितयश उद्योजकांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई/ठाणे येथे २०१८ साली महासंघाचे खर्या अर्थाने काम सुरु झाले. ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारली. कल्याण-डोंबिवली-ठाणे-नवी मुंबई येथे काम सुरू केले. पुढे ठाणे जिल्ह्यासह मुंबई-नवी मुंबई-पालघर जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली. लगेचच पालघर येथे डॉ. विजय दातार, सदानंद पावनी, मोगरे काका, बाबाजी जोशी, तसेच अनेक जणांनी संपर्क करून पालघर येथे महासंघाच कार्य वाढवले व ते आता उत्तम प्रकारे सुरू आहे. कल्याण-डोंबिवली येथे शशांक खेर, रूपक पांडे, रजनी, रोहिणी भार्कीर्डे, जान्हवी आचार्य, अनघा मालशे, महारूद्र साठे, जितेंद्र भावे, यतीन रायकर, शलका चितळे, प्रिया साठे, अनघा खेर, स्मृती आठवले, सारंग केळकर, पुष्कर उपासनी यांच्यासह अनेक पदाधिकारी उत्तम कार्य करीत आहेत. प्रत्येक शहराचे प्रमुख आहेत. जसे, मुंबई- बाबाजी जोशी,ठाणे - शशांक खेर, कल्याण- महेश केळकर, डोंबिवली- महारूद्र साठे. देशभर महासंघाचे काम करणारे समाजबांधव आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये महासंघाचे १००० सदस्य आहेत. महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून मोहिनी पत्की, तर प्रदेश कार्याध्यक्ष निखील लातूरकर काम बघतात, तर सदानंद पावगी महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत आहेत.
कल्याण-डोंबिवली येथे नुकताच ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन करणारा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये योगिता साळवी यांनी उत्तम माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कल्याण व डोंबिवली येथे मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. मागील रविवारी पार पडलेल्या मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरास माधवराव जोशी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ’जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त वैद्य विनय वेलवणकर यांचा सन्मान करण्यात आला. गुढीपाडव्यानिमित्त दि. ११-१२ मार्च रोजी कल्याण येथे, तर दि. १८-१९ मार्च रोजी डोंबिवली येथे भव्य प्रदर्शन व ग्राहक पेठ आयोजन केले आहे. पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेत महासंघ दरवर्षीप्रमाणे सहभागी होणार आहे, तसेच दि. १२ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वंदनाताई कपिले, पोलीस उपनिरीक्षक डॉ. मेघा ओक व मानसशास्त्र विषयातील ज्योेती कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. १२ मार्च सायंकाळी ५.३० वा सर्वेश सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘कोविड’मध्ये महासंघाच्या ४० कार्यकर्त्यांनी कल्याण व डोंबिवली येथे तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली लोकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा हा उपक्रम विनामूल्य पार पडला. महाड येथील आलेल्या पुरावेळी महासंघातर्फे कल्याण-डोंबिवली, ठाणे-पालघर, मुंबई येथून १५ पेक्षा अधिक ट्रक भरुन साहित्य व शिधा पाठविण्यात आली व इतर भागांतून पाठविण्यात आली. सध्या व महासंघातर्फे कल्याण व डोंबिवली येथे युवती व महिला यांच्याकरिता आत्मरक्षा प्रशिक्षण दिले जाते, ज्याचे प्रात्यक्षिक स्वागत यात्रेत असेल.‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’तर्फे शासनस्तरावर ब्राह्मणांकरिता, अखिल विकास महामंडळाकडून पुजार्यांना मानधन इत्यादी अनेक मागण्यांकरिता पाठपुरावा सुरू असून त्याला यशदेखीलयेत आहे. महासंघ समाजासाठी सर्वतोपरी कल्याणकारी कार्य करत आहे आणि करत राहणार.
-अमरेंद्र पटवर्धन