कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांची खासदार डॉ. शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प गतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यामुळे नवी मुंबई आणि कल्याण येथील नागरिकांचा नवीन वर्षातील प्रवास अधिक सुखकर होणार असून वाहतुकीचे सर्व अडथळे दूर होणार आहेत. तर या नवीन प्रकल्पांमुळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तर ऐरोली आणि काटई येथील बोगद्याच्या पुर्णत्वानंतर नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील ४५ मिनिटांचे अवघ्या ५ ते १० मिनिटांवर येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी \मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प गतीने करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिळफाटा उड्डाणपुलाचे प्रगतीपथावर असलेले काम लवकरच बहुतांशी पूर्ण होणार असून त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत यातील तीन मार्गिका प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. तर येथील ऐरोली काटई उन्नत मार्गाची डाव्या बाजूची मार्गिका फेब्रुवारी अखेरीस सेवेत येणार आहे.
या दोन पर्यायांमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर शिळफाटा महापे या पाईपलाईन रस्त्यावर उपलब्ध जागेत रस्त्याचे रूंदीकरण केले जाणार असून येथेही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे. ज्यावेळी येथील उड्डाणपुलाचे काम सुरू होईल, तेव्हाही कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे, असेही यावेळी खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.