गेल्या काही दिवसांपासून एक नाव महाराष्ट्रात चर्चेत आहे. ते नाव म्हणजे सलीम कुत्ता! या सलीम कुत्तासोबत उबाठा गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने पार्टी केल्याची माहिती नितेश राणे यांनी दि. १५ डिंसेबर रोजी विधानसभेत मांडल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने सोमवार दि. १८ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘उबाठाचा नवीन नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता!’ अशा घोषणा यावेळी देण्यात आला. त्यामुळे सलीम कुत्ता कोण आहे? सलीम कुत्ता आणि उबाठा गट कनेक्शन? काय आहे.सलीम कुत्तासोबत संबध असलेले सुधाकर बडगुजर कोण आहेत? अशा गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
सलीम कुत्ता कोण आहे हे जाणून घेऊ? १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम शेख उर्फे सलीम कुत्ता हा एक आहे. अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शॉर्प शूटर म्हणून त्याला ओळखले जायचे. त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेनन यांच्याशी देखील त्यांचे संबध होते. सलीम हा मुळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबद येथील कल्हेडी गावातील रहिवासी होता. पण अंडरवर्ल्डशी जोडला गेल्याने त्याने मुंबईतच आपले बस्तान बसविले होते. कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात त्याला सलीम कुत्ता नावाने ओळखले जायचे. त्याच्यावर दहशतवादी स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आता जाणून घेऊ की, गेली काही दिवस सलीम कुत्ताचे नाव का चर्चेत आहे? आणि सलीम कुत्ताचे उबाठा गटाशी कनेक्शन काय आहे? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. आणि या पार्टीचे फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. त्यामुळे सलीम कुत्ता हे नाव महाराष्ट्रभर पुन्हा चर्चेत आले. याप्रकरणी नितेश राणे म्हणाले की, ‘सलीम कुत्ता’ हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊदचा साथीदार आहे. त्यांनी शिवसेनाभवनाबाहेरही स्फोट घडवला होता. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ‘कुत्ता’ पेरोलवर बाहेर आला असताना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर त्याच्यासोबत डान्सपार्टी करीत होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेल्या माणसासोबत उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी पार्टी करत असतील, तर हे कसले बाळासाहेबांचे वारसदार? या ‘कुत्ता’ला नुसता अटक करू नका, तर त्याचा राजकीय गॉडफादर कोण आहे, तो कोणाच्या संपर्कात असतो, कोणाशी त्याचा दूरध्वनीद्वारे संवाद सुरू असतो, त्याचा सीडीआर रेकॉर्ड तपासा, अशी मागणी राणे यांनी केली.
तरी सुधाकर बडगुजर कोण आहेत हे ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे? सुधाकर बडगुजर हे २००७ मध्ये सिडकोतून ते पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली असल्याचे ही सांगितले जाते. तसेच मध्यांतरी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर ही स्थानिक पातळीवरील पदाधिकारी शिंदे गटात जाण्यामागे बडगुजर यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे.तर दुसरीकडे या प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही नितेश राणे यांनी सभागृहात मांडलेला विषय अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. सलीम कुत्ता हा दाऊदचा शार्पशूटर आहे. त्याच्यासोबत पार्टी करणारा सुधाकर बडगुजर काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीसाठी भटकत होता, तो आज शेकडो कोटींचा मालक आहे. देशद्रोह्यांसोबत डान्स पार्टी करणारा बडगुजर छोटा मासा आहे. त्याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याचे कुणाशी लागेबांधे आहेत, अतिरेक्यांना पैसे पुरवण्यात यांचा हात आहे का, याच्या खोलात जायला हवे. गृहमंत्र्यांनी तातडीने तसापासे आदेश द्यावेत, अन्यथा काही पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे, असे दादा भुसे म्हणाले.
तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बॉम्बस्फोटातील आरोपी, पेरोलवर असलेला दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीचा प्रकार अतिशय गंभीर आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करीत असेल, तर त्यांच्या संवेदना मेल्या आहेत हे सिद्ध होते. सुधाकर बडगुजर याचे ‘कुत्ता’शी काय संबंध आहेत, याचा तपास केला जाईल. त्या पार्टीत कोणकोण होते, बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, हे शोधले जाईल. तसेच या प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून टाईमबॉण्ड पद्धतीने तपास केला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.मात्र याप्रकरणी सलीम कुत्ता याची १९९८ मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती, असा दावा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याला यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, रोहित वर्मा, बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी यांनी ही हत्या केली. हे छोटा राजनचे हस्तक आहेत. तरी सलीमच्या हत्येची साक्ष कोर्टात त्याच्या तीन बायकांनी दिली असल्याचे ही गोरंट्याला यांनी सांगितले. तसेच उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे.
मात्र काही मिडीया रिपोर्टनुसार, पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. 1998 मध्ये जो व्यक्ती मारला गेला होता, त्याचं नाव सलीम कुर्ला असं होतं. तो देखील मुंबई बॉम्बब्लॉस्टचा आरोपी होता. सलीम कुर्ला हा एजंट म्हणून काम करत असे. त्यानेच बॉम्बस्फोटातील आरोपीचे खोटे पासपोर्ट तयार केले होते. मात्र छोटा राजनच्या गँगने सलीम कुर्ला या एजंटला १९९८ ला ठार केले. तरी सलीम कुत्ता जिवंत आहे. सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे, अशी प्राथमिक माहिती काही वृत्तसंस्थांकडून दिली जात आहे.दरम्यान दि. १८ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उतरत याविरोधात जोरदार आंदोलन केले. ‘सलीम कुत्ता हाय हाय...’, ‘उबाठाचा नवीन नेता, सलीम कुत्ता... सलीम कुत्ता!’ अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या. मंत्री दादा भुसे, आमदार भरत गोगावले, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, श्रीनिवास वनगा यांच्यासह अनेक सदस्य यात सहभागी झाले. ‘सलीम कुत्ता’सोबत डान्स पार्टी करणाऱ्या सुधाकर बडगुजरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.पण तरीदेखील सलीम कुत्ता जिवंत आहे का? ह्याची अधिकृत पृष्टी झालेली नाही. पण जर तो जिवंत असेल, तर उबाठा गटाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.