रांची : झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सोने आणि लिथियमचा साठा सापडला आहे. लिथियम हा एक महत्त्वपुर्ण धातू असून इलेक्ट्रिक वाहने, लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या बॅटरीमध्ये त्याचा उपयोग केला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, कोडरमाच्या माइका पट्ट्यात लिथियमच्या शोधाच्या पुढील टप्प्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, लिथियमचा साठा किती प्रमाणात आहे हे अजून सांगता येत नाही. परंतू, हा साठा बराच मोठा असल्याचे मानले जात आहे.
येत्या काळात देशात बॅटरीवरील अवलंबित्व वाढणार असल्याने लिथियम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे लिथियमच्या शोधावर लक्ष केंद्रित केले जात आहे. कोडरमामध्ये सापडलेला हा साठा भारताला जगातील सर्वात मोठ्या लिथियम उत्पादक देशांपैकी एक बनवू शकतो.
दरम्यान, झारखंडमध्ये सोन्याचे दोन नवीन साठे सापडले आहेत. हे सोन्याचे साठे रांची जिल्ह्यातील तमाड ब्लॉकमधील बबाईकुंडी आणि सिंदौरी-घनश्यामपूर येथे सापडले आहेत. बाबीकुंडीमध्ये अंदाजे ५१० किलो सोने आणि सिंदौरीमध्ये अंदाजे ७६७ किलो सोने मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.