बाळासाहेब स्मृतीस्थळी झालेल्या राड्यावर शिंदेंनी सुनावलं!
17-Nov-2023
Total Views | 64
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृतिदिनाच्या एक दिवस आधी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतिदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हें. ला ११वा स्मृतिदिन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केले. मुख्यमंत्री तिथून बाहेर पडल्यानंतर तिथे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूला असलेला रॅक तुटला.
या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतिदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती. दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी स्मृतिस्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते, मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला-भगिनींबद्दल अपशब्द वापरले." असं शिंदे म्हणाले.