मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत – न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना दणक्यात झाला. या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असून याच सामन्यात विराट कोहलीने त्याचे ५०वे शतक पुर्ण करत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याचाही रेकॉर्ड मोडला आहे. भारत – न्यूझीलंडमध्ये रंगलेला हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी स्टेडियमवर हजेरी लावली होती. यात अभिनेता रणबीर कपूरचा देखील समावेश असून तो त्याच्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.
क्रिकेटविश्वात विराट कोहली याने अल्पावधीत इतिहास रचला आहे. त्यामुळे अशा त्याच्या जीवनावरच बायोपिक करण्याचा विचार नक्कीच भविष्यात केला जाऊ शकतो. यावेळी रणबीर कपूरला किंग कोहलीच्या बायोपिकसाठी विराटची भूमिका साकारण्यासाठी कोण अभिनेता योग्य ठरेल असा सवाल करण्यात आला. या प्रश्नावर रणबीर कपूरने लगेचच उत्तर दिले की, “जर विराट कोहलीवर बायोपिक बनवला जात असेल तर कोहलीनेच त्यात स्वतःची भूमिका करावी. कारण विराट अनेक अभिनेत्यांपेक्षा चांगला दिसतो. तसंच त्याचा फिटनेसही खूप चांगला आहे”. रणबीरच्या या उत्तरानंतर खरोखरीच विराट अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकणार का अशी चर्चा रंगली आहे.
अनुष्का शर्माची पती विराट कोहलीसाठी खास पोस्ट
अनुष्का म्हणते, “देव खरोखरंच एक उत्तम कथा लेखक आहे. मी त्याची आभारी आहे कारण मला त्याने तुझे प्रेम मिळवून दिले. तू दिवसेंदिवस अधिक सामर्थ्यवान बनत आहेस. तुला हवे ते सर्व साध्य करताना पाहणे हे खरोखरं खूप सुंदर आहे. तू नेहमी स्वत:शी आणि खेळाशी प्रामाणिक असतोस. खरंच तू देवाचे मुलं आहेस.'
दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेला हा रंजक सामना पाहण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रणबीर कपूर, जॉन अब्राहम, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, सोहा अली खान, कुणाल खेमु यांनी हजेरी लावली होती. आता संपुर्ण भारताचे लक्ष १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे.