चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम सुगुमारन यांचे सोमवारी (२ जून २०२५) वयाच्या ४७व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मधा यानाई कूट्टम' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांनी रसिकांच्या आणि समीक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम सुगुमारन हे मदुराई येथून चेन्नईकडे बसने परत येत असताना त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. आजूबाजूच्या प्रवाशांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.
विक्रम सुगुमारन यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ दिग्दर्शक बालू महेंद्र यांच्याकडे सहाय्यक म्हणून १९९ते २००० दरम्यान केली होती. त्यांनी वेट्रिमारन यांच्या 'आडुकलम' (२०११) या चित्रपटासाठी सहलेखक म्हणून काम केलं होतं.
२०१३ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला 'मधा यानाई कूट्टम' हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. या चित्रपटात काथीर (Suzhal: The Vortex फेम) आणि ओविया यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
२०२३ मध्ये आलेल्या 'रावण कोट्टम' या त्यांच्या शेवटच्या चित्रपटात शंतनु भाग्यराज यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
अलीकडेच ते 'थेरुम पोरुम' नावाच्या नव्या प्रकल्पावर काम करत होते. याच स्क्रिप्टसाठी ते मदुराईला गेले होते आणि परत येताना त्यांना त्रास झाला.
वैयक्तिक आयुष्य आणि संघर्ष
विक्रम सुगुमारन यांच्यामागे पत्नी आणि मुले असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटसृष्टीतील काही लोकांकडून आपल्याला फसवण्यात आल्याचा उल्लेख केला होता. मात्र, कोणाचेही नाव न घेता त्यांनी सांगितले की, ठोस पुरावे नसल्यामुळे आपण मौन पाळतो.
'रावण कोट्टम'मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या शंतनु भाग्यराज यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर श्रद्धांजली वाहताना लिहिलं,
"प्रिय भाऊ, तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक क्षण लक्षात राहील. खूप लवकर गेलास. #RIPVikramSugumaran"
विक्रम सुगुमारन यांच्या अकस्मात निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वास्तववादी सामाजिक कथानकांची खास शैली असलेला हा संवेदनशील दिग्दर्शक आपल्या काळात निघून गेला.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.