नवरत्न अलंकृत : सुधा मूर्ती

    28-Jan-2023   
Total Views |
 
Sudha Murthy
 
सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा 2006 साली राष्ट्रपती अब्दुल कलमांच्या हस्ते ’पद्मश्री’ने गौरव केला आणि आता विद्यमान सरकारने 2023 च्या ‘पद्म’ पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली आणि सुधा मूर्ती यांच्या नावापुढे ‘पद्मभूषण’ हे अलंकरण शोभून दिसणार आहे. मुळात त्यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की, याने पुरस्काराची उंची वाढते.
 
सुधा मूर्ती... या नावातच प्रेम, आपुलकी, ममत्व आणि वात्सल्याची भावना जाणवते. त्यांच्या साहित्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून त्या किती उंचीवर आहेत, हे लक्षात येतं. यशाच्या शिखरावर असूनसुद्धा साधेपणा कसा जपायचा, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांचे गौरव करताना काढलेल्या शब्दांतच त्या किती मोठ्या आहेत याचा प्रत्यय आपल्याला येतो. वाचनाची आवड निर्माण झाल्यापासून सुधा मूर्ती यांच्या लीना सोहोनी अनुवादित प्रत्येक पुस्तकातून ती आवड अधिक वाढली. सुधा मूर्ती यांचे पुस्तक, कादंबरी याने कायमच त्यांच्याबद्दलचा आदर नेहमी अधिकाधिक वाढत होता आणि आता त्या आदरानं त्यांच्याप्रती एक आत्मियभाव आणि प्रेम निर्माण झाले आहे आणि त्याचा अधिक आनंदच आहे. सुधा मूर्ती यांच्या पुस्तकातील प्रत्येक कथा या त्यांच्यासोबत प्रत्यक्ष घडलेल्या असल्यामुळे त्या सत्य घटना आहेतच; पण त्याचे वर्णन त्यांच्या खास शैलीतील नेमक्या शब्दात आणि नेमक्या पद्धतीने केलेली मांडणी आणि मुख्य म्हणजे त्या कथा सकारात्मक विचार देणार्‍या आहेत आणि वाचताना त्या वाचकांना अधिक प्रभावित करतात. त्या मूळ कन्नड भाषेत लिहीत असल्याने त्यांच्या अनुवादित पुस्तकांतूनही तोच भाव जाणवतो. त्या कायम म्हणतात, “मी देवकी असली, तर माझ्या अनुवादिका या यशोदा आहेत. कारण, मला जे म्हणायचं असतं ते त्या अनुवादित कथेत योग्य मांडतात. म्हणून आज सगळ्या भारतीय भाषांमध्ये त्यांची सगळी पुस्तकं अनुवादित होतात.
 
त्यांच्या साहित्यातील घटना आजच्या काळातील असूनसुद्धा एक वेगळी दृष्टी त्यांच्या प्रत्येक कथेतून कायम मिळत असते. एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्या खूप छान लिहितात- “भाषा हे एक केवळ साधन आहे, पण त्या भाषेच्या आतमध्ये कथा गुंफणारी एक व्यक्ती असते. ती व्यक्तीच जास्त महत्त्वाची असते. तुम्ही एक कथाकथनकार आहात त्यामुळे तुम्ही तुमची गोष्ट सांगायला सुरुवात करा. भाषा त्याबरोबर आपोआप वळणावर येईल.” सुधा मूर्ती यांची कन्नड मातृभाषा असल्याने त्यातून केलेले सहज लेखन आणि आपलेपणा त्यांच्या विचारात आपसूक जाणवतात आणि हीच लेखनाची ताकद आहे, असं वाटतं. पुढे त्यांनी इंग्रजीतही लेखन केले. एका मोठ्या वृत्तपत्रातून स्तंभलेखनाचा मान त्यांना मिळाला आणि आज तब्बल 33 हून अधिक पुस्तकांच्या माध्यमातून त्या अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. ’वाईज अ‍ॅण्ड अदरवाईज’ पासून सुरू झालेल्या प्रवासाने आज फार मोठा यशस्वी पल्ला गाठला आहे. देशातल्या तरुणांसाठी आणि खासकरून आज तरुण मुलींसाठी त्या एक ‘रोल मॉडेल’ आहेत.
 
इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका असलेल्या सुधा मूर्ती यांचा जन्म दि. 19 ऑगस्ट, 1950 रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. सर्वसाधारण मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबातील असलेल्या सुधा मूर्ती यांना बालपणापासूनच वाचनाची आवड. त्या शालेय जीवनापासून हुशार आणि त्यांनी त्यांचा पहिला नंबर कधीही सोडला नाही. इंजिनिअरिंग शिक्षण सुवर्ण पदकासह प्राप्त केल्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणूनही कार्य केले. कालांतराने भारतातल्या सगळ्यात मोठ्या गाड्या बनवणार्‍या ‘टाटा स्टील’कंपनीत पहिल्या महिला इंजिनिअर म्हणून नोकरी करण्याचा मान त्यांना मिळाला. या संपूर्ण प्रवासात त्यांना नारायण मूर्ती यांची भक्कम साथ मिळाली.
 
एका मुलाखतीत त्यांनी खूप छान किस्से सांगितले, त्यात त्या म्हणतात, “आपली कंपनी काढण्याचा निर्णय नारायण मूर्ती यांनी घेतला, त्यावेळी जमवलेले दहा हजार रुपये त्यांनी ‘इन्फोसिस’च्या निर्मितीसाठी दिले. ते देताना त्यांनी नारायण मूर्ती यांना सांगितले की, पुढली तीन वर्षं घराची पूर्ण काळजी आणि खर्च मी बघेल, तुम्ही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.” नारायण मूर्ती यांनी सुरुवातीला आपल्या घरीच ‘इन्फोसिस’चे ऑफिस बनवले असताना सुधा मूर्ती यांनी ‘वालचंद ग्रुप’मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. एकाचवेळी जेवण बनवणारी, घर सांभाळणारी त्यासोबत एक ‘क्लार्क’ आणि ‘इन्फोसिस’ची प्रोग्रामर अशा सगळ्या जबाबदार्‍या सांभाळताना त्यांनी नारायण मूर्ती यांना ‘इन्फोसिस’च्या उभारणीत पूर्ण सहकार्य केले. आज ‘इन्फोसिस’ यशाच्या शिखरावर असूनसुद्धा त्याचे श्रेय घेण्याचा कधीही त्यांनी प्रयत्न केला नाही. आजच्या घडीला सुधा मूर्ती भारतातील सगळ्यात श्रीमंत स्त्रियांपैकी एक आहेत. आज ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या माध्यमातून समाजात बदल घडविण्याचे महत्कार्य त्यांनी केले आहे. नुकतीच त्यांनी या कार्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. यासोबतच ‘गेट्स फाऊंडेशन’च्या सार्वजनिक ‘आरोग्य सेवा’ उपक्रमात ही आपला सहभाग नोंदविला आहे. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली, ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये भाग घेतला आहे. कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला आणि हार्वर्ड विद्यापीठात ‘द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ची स्थापना केली आहे.
 
इतका प्रचंड पैसा असतानासुद्धा अगदी साधं आयुष्य जगण्यात सुधा मूर्ती यांना आत्मिक समाधान मिळतं, असं त्या कायम सांगतात. ’साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी’ याचे चालते-बोलते मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती. त्यांच्या ‘तीन हजार टाके’ या पुस्तकात ‘तीन ओंजळ पाणी’ या कथेत काशीचे खूप सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. त्या कथेत त्या लिहितात की, “काशीला दशाश्वमेध घाटावर गंगेला तीन ओंजळ अर्घ्य देताना पहिल्या ओंजळीत आजी आजोबांच्या नावाने अर्घ्य, दुसर्‍या ओंजळीत या भारतभूमीत जन्माला आले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, देशाचा नागरिक असल्याचा अभिमान बाळगत त्यासाठी समर्पित केलेले दुसरे अर्घ्य आणि तिसरे अर्घ्य अतिशय महत्त्वाचे त्यांच्या आजोबांनी सांगितलेले त्यांना आठवते की, सगळ्यात आवडत्या गोष्टीचा त्याग, म्हणजे सर्वात प्रिय गोष्ट आहे ती सोडायची.” तो अनुभव त्यांच्याच शब्दात लिहायला आवडेल. त्या लिहितात, “मी कुठल्या गोष्टींचा त्याग करू? मी विचारात पडले. हे जीवन, विविधरंग, आकार, निसर्ग, संगीत, कलाकृती, वाचन आणि खरेदी हे सर्वच अत्यंत प्रिय होते. साडी खरेदी ही माझी अतिशय आवडती गोष्ट होती. निसर्गाशी मिळत्या-जुळत्या रंगाच्या साड्या आवडायच्या. ठरलं तर मग. मला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मी सोडली पाहिजे, असं या काशी शहराचे म्हणणं आहे, तर आज इथे, या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं आजपासून मी सर्व प्रकारच्या खरेदीवर पाणी सोडत आहे. अन्न, औषधपाणी, प्रवास, पुस्तकं व संगीत याचा अपवाद वगळता मी इथून पुढे कोणत्याही प्रकारची खरेदी करणार नाही. मी आजपासून हा नेम करत असून, माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत या गोष्टीचे पालन करेन,” असं म्हणून त्यांनी तिसरी ओंजळ गंगेच्या प्रवाहात सोडली.
इतकी सहजता त्यांना कुठून आली असेल, याचा प्रत्यय त्यांचे प्रत्येक पुस्तक वाचताना येतो. कारण, आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या संपर्कात येणारी, त्यांना भेटणारी माणसं त्यांच्यासाठी आपली होती आणि त्या पुढे म्हणतात, “शेवटच्या ओंजळभर पाण्याने माझे आयुष्य बदलून टाकलं आहे.” टाटा सोडताना जेआरडी टाटा यांनी सुधा मूर्तींना काही उपदेशाचे बोल सांगितले होते. ज्यावर सुधा मूर्ती आजही यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
 
जेआरडी टाटांच्या शब्दाला जागत सुधा मूर्तींनी 1997 मध्ये ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि या माध्यमातून अनेक रुग्णालय, शाळा, अनाथश्रम बांधले. प्रत्येक शाळेत ग्रंथालय असलं पाहिजे, या आपल्या स्वप्नाला त्यांनी आकार द्यायला सुरुवात केली. त्यातून आजवर 50 हजारांहून अधिक ग्रंथालयांची स्थापना त्यांनी केली आहे. दहा हजारांपेक्षा जास्त स्वच्छतागृह त्यांनी उभी केली आहेत. देशाच्या कुठल्याही भागात भूकंप, त्सुनामी आली की आजही मदतीसाठी त्या कायम धावून जातात. सुधा मूर्ती यांची आणखीन एक ओळख म्हणजे त्यांचं अफाट वाचन आणि त्यांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके आहेत. कौटुंबिक, प्रेम, काल्पनिक, तसेच सामाजिक विषय अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा 2006 साली राष्ट्रपती अब्दुल कलमांच्या हस्ते ’पद्मश्री’ने गौरव केला आणि आता विद्यमान सरकारने 2023 च्या ‘पद्म’ पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली आणि सुधा मूर्ती यांच्या नावापुढे ‘पद्मभूषण’ हे अलंकरण शोभून दिसणार आहे. मुळात त्यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे की, याने पुरस्काराची उंची वाढते. अशांना पुरस्कार दिला, तर तो त्या सन्मानाचा सन्मान होतो. काही व्यक्तींचं कर्तृत्व आणि उंची दिलेल्या सन्मानाने उजळून निघतात. पण, काही असे असतात की, ज्यांची उंची गाठणं पुरस्कारालाही शक्य होत नाही. पुरस्कार दिल्याने अथवा न दिल्याने त्यांच्या स्थानात आणि कर्तृत्वात कोणताच फरक पडत नाही. त्यांचं स्थान त्या ध्रुव तार्‍यासारखं स्थिर, अढळ असतं आणि हाच विचार सुधा मूर्ती यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्यावर नकळत मनात आला.
 
आजवर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला असून अभियंता, शिक्षिका, लेखिका, समाजसेविका, उद्योजिका, सॉफ्टवेअर इंजिनिअर, क्लार्क, ट्रस्टी, गृहिणी, आई अशा नवरत्नांनी अलंकृत असलेल्या आणि प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देत जगातील सर्व मातृशक्तीसाठी आदर्श निर्माण करणारी ही स्वयंसिद्धा आम्हाला आयुष्यात जे सत्य आहे, सुंदर आहे त्याचा आजन्म ध्यास मिळण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनी सदैव कटिबद्ध ठेवावे, यासाठी ‘पद्मभूषण’ सुधा मूर्ती आपणांस प्रणाम आणि मनापासून अभिनंदन. आपले कर्तृत्व आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायी राहावे आणि आपण करत असलेले कार्य सतत वर्धिष्णू राहावे हीच सदिच्छा आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सर्वेश फडणवीस

युवा लेखक सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक, सुरुवातीला 'नागपूर तरुण भारत' येथे दोन वर्ष स्तंभ लेखन. दै. 'सोलापूर तरुण भारत'मध्ये 'गाभारा' ही मंदिरावर आधारित लेखमाला प्रकाशित. महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरी या वृत्तपत्रांसाठी विविध विषयांवर लेखन. इंदूरहून निघणाऱ्या 'मराठी गौरव' या पाक्षिकासाठी लेखन. 'प्रज्ञालोक' या त्रैमासिकात लेखन तसेच 'प्रज्ञालोक अभ्यासक मंडळात संपादकीय मंडळात सक्रिय'. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या 'कालजयी सावरकर' या नावाने प्रकाशित सावरकर विशेषांकात 'सावरकर आणि युद्धशास्त्र' या विषयावर लेखन. अनेक दिवाळी अंकांसाठीही लेखन. 'साप्ताहिक विवेक'मध्ये गेली दोन वर्षे झाले 'पद्मगौरव' स्तंभ सुरू. आकाशवाणी व इतरही माध्यमातून सतत लेखन.