आपला भगवंतावर, त्याच्या कृपेवर विश्वास नसल्याने आपण या देहाच्या व संसाराच्या चिंता करीत आयुष्य घालवतो; ते आता थांबवून आपण भगवंताचे अनुसंधान कसे साधता येईल, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी नामस्मरणासारखा सोपा मार्ग नाही, असे स्वामींचे सांगणे आहे.
मनाच्या श्लोकातील 80व्या श्लोकात स्वामींनी अनुप्रास अलंकाराचा प्रयोग केला आहे, हे आपण मागील लेखात पाहिले. त्यातील ‘रा’ या अक्षराच्या लयबद्ध रचनेमुळे हा श्लोक पुन्हा पुन्हा लक्षपूर्वक वाचल्याशिवाय त्यातील अर्थ शोधता येत नाही. समर्थांसारखे बुद्धिमान संत अशा रचना सहजपणे करुन जातात. पण, त्यामुळे त्यातील गर्भितार्थ शोधताना आपली तारांबळ उडते. तो श्लोक पुन्हा देतो-
धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें।
तरा दुस्तरा त्या परा सागरातें।
सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।
करा नीकरा त्या खरा मछराते ॥80॥
या पूर्वीच्या श्लोकात स्वामी सांगतात की, भ्रमामुळे माणसाच्या जीवनात एकप्रकारे संसाराची नशा चढली आहे. ही भूल अथवा हा भ्रम यांना दूर सारण्याची प्रक्रिया कशा स्वरुपाची असते, त्यासाठी तप:साधना, योगसाधना यांचा अभ्यास कसा करावा, साधना कशी करावी, हा तत्त्वचिंतनाचा ब्रह्मज्ञानाचा प्रांत असल्याने आपल्यासारख्या सामान्यांना समजायला कठीण असतो. तशी स्वामींना कल्पना आहे, म्हणून तत्त्वज्ञानाचा भाग दूर सारुन सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत स्वामींनी संसारातून उद्धरुन जाण्याचा मार्ग दाखवला आहे. स्वामी सांगतात की, भगवान शंकर महादेवाप्रती सर्वांना आदर भक्ती आहे. लोक त्याची मनोभावे पूजा करतात. महादेवाच्या अंत:करणात सदैव वास करणारा श्रीधर आहे. त्या हरिला तुम्ही तुमच्या अंत:करणात धरुन ठेवा. त्या श्रीधराचे तुम्ही नेहमी चिंतन केले, त्याच्या अलौकिक गुणांचे चिंतन करुन त्याची भक्ती केली, तर ओलांडून जायला कठीण असलेला हा भवसागर तुम्ही सहजपणे पार करुन जाल. दुस्तर भवसागर ‘तरा’ म्हणजे ओलांडून जाल, असे स्वामी या श्लोकात सांगत आहेत. अध्यात्मात म्हणजे परमार्थ विवेचनात या संसाराला ‘सागरा’ची उपमा दिलेली असते. सागर हा अथांग असतो. त्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज करता येत नाही, अशा सागरात पडलेला जीव त्यात गटांगळ्या खात असतो. त्यात पोहून पलीकडे जाणे कठीणच म्हणजे दुस्तर भवसागरात, प्रापंचिक जीवनात अनेक घटना घडत असतात केव्हा काय होईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे प्रपंचातील जीवन अस्थिर असते. आज वैभवात, श्रीमंतीत वावरणारा माणूस दुर्दैवाचा फटका बसल्यावर त्याचे आयुष्य होत्याचे नव्हते होते. तसेच दारिद्—यात दु:ख भोगणारा एखादा अभागी जीव नशीब फळफळल्यावर ऐषारामात राहतो. अशी उदाहरणे आपण प्रचंचात पाहतो. वर सांगितलेली उदाहरणे-अपवादात्मक असली, तरी सर्वसाधारणपणे केव्हा काय घडेल, हे कोणीही खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. पैसा असूनही आणि नसूनही माणूस भीतीपोटी अस्वस्थ मनाने जीवन कंठत असतो. अथांग सागरात पडलेल्या माणसाला एखादा तरंगणारा लाकडी ओंडका आधारासाठी मिळाला, तरी त्याच्या साहाय्याने माणूस सागरात पैलतीरी गाठेल, अशी खात्री नसते. त्याच्या मार्गात मोठ्या लाटा, मगरी, वादळे हे अडथळे असायची शक्यता नाकरता येत नाही. काय घडेल, याचा भरवसा नसतो. तद्वत हा भवसागर सुरक्षितपणे पार करणे, कठीण असते. अशावेळी शाश्वत भगवंताला तो घट्ट धरून ठेवतो, त्या भक्ताचे मन, चित्त, स्थिर असल्याने तो दुस्तर भवसागर पार करेल, असा संतांचा अनुभव आहे. संतांच्या व्यावहारिक जीवनात अनेक चढउतार येतात. समाजाकडून त्यांचा छळ होतो, तरीही त्यांनी भगवंताला अंतःकरणात घट्ट धरून ठेवलेले असल्याने त्यांच्या चेहर्यातवरील समाधान ढळत नाही. त्या समाधानी अवस्थेत भवसागर पार करून ते अखंड समाधानाची मोक्षाची सायुज्जमुक्तीची प्राप्ती करून घेतात. या पुढे स्वामींनी समाधान हिरावून घेणार्यात कोणत्याही घटना आहेत, यावर भाष्य केले आहे.
माणसाचे समाधान हिरावून त्याला दुःख, काळजी करायला लावणारे म्हणजे त्यांचे पोट, त्याची भूक, माणसाची प्रपंचातील धडपड ही त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी चाललेली असते. सकाळी जेवले, तरी संध्याकाळी पुन्हा भूक लागते. माणसाचे पोट कधी भरत नाही. या पोटाला उद्देशून समर्थांनी या श्लोकात ‘दुर्भर’ म्हणजे ‘भरत नाही’ असा शब्द वापरला आहे. पोटाला अन्न मिळाले नाही तर त्याची भूक अल्पकाळ शमते. माणसाच्या ठिकाणी इतरही भूक असते. त्यांचे शमन होणाचा प्रश्न आहेच. त्या इतर वासनांची तृप्ती होत नाही. तूर्त त्याचा विचार बाजूला ठेवला, तरी पोटासाठी माणसाला वणवण भटकावे लागते. कष्ट करावे लागतात. त्यामुळे कितीही मिळाले, तरी ते माणसाला कमी पडते. यासाठी स्वामी सांगतात की, पोटापुरते मिळाले की, या पोटाला जर विसरायला शिका. थोडक्यात, आपली हाव कमी करायला शिका. असे केले तरच तुम्हाला भगवंताच्या नामाचा, त्याच्या अनुसंधानाचा अभ्यास करता येईल. समर्थ पुढे सांगतात की, पोटाची काळजी विसरल्याने तुम्हाला भगवंताचे ध्यान सहजपणे करता येईल, असे समजू नका. त्यासाठी अंत:करणात अगोदरच येऊन बसलेल्या क्रोध, मत्सराचा नि:पात करावा लागेल. द्वेष हा अत्यंत घातकी आहे. मला न मिळालेली वस्तू दुसर्याोला मिळाली, तर मन त्याचा द्वेष, मत्सर करू लागते. मत्सर मनात विष पसरवतो. एकदा मत्सर मनात शिरला की, त्याला बाहेर काढणे कठीण जाते. अभिमान, गर्व, ताठा यातून मत्सर निर्माण होतो. मत्सराने पुढे तिरस्काराची भावना निर्माण होते. तिरस्काराचे पर्यवसान पुढे क्रोधात होते आणि मग या विकारांनी मन नासून जाते. अशा नासक्या मनात भगवंताचे ध्यान कसे राहील? याचे सविस्तर विवेचन समर्थांनी दासबोधात केले आहे. (पाहा: ओवी क्र. 1.1.23 व 24) स्वामींनी या 80व्या श्लोकात थोडक्यात असे सांगितले आहे की, महादेवाने हरीला त्याच्या अंत:करणात स्थान दिले आहे. त्याला तुम्ही आपल्या हृदयात धरून ठेवा, तरच हा भवसागर तुम्ही पार करून जाल. तुम्हाला पोटाची काळजी आहे, पण पोट भरल्यावर त्याला जरा विसरायला अभ्यास करा आणि दुष्ट मत्सराचा पूर्णपणे नि:पात करा, तर तुम्हाला आत्मोद्धार साधेल.
आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी रामाविषयी, भगवंताविषयी पवित्र भावना कशी जपता येईल, यावर भर दिला आहे. त्यासाठी रामावर, रामनामावर विश्वास ठेवण्यास स्वामींनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. राम हा कैवल्यदाता, मोक्ष प्राप्त करून देणारा आहे. तेव्हा त्याची भक्ती त्यासाठीच करायची असते. परंतु, आपला भगवंतावर, त्याच्या कृपेवर विश्वास नसल्याने आपण या देहाच्या व संसाराच्या चिंता करीत आयुष्य घालवतो, ते आता थांबवून आपण भगवंताचे अनुसंधान कसे साधता येईल, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी नामस्मरणासारखा सोपा मार्ग नाही, असे स्वामींचे सांगणे आहे. भगवंताविषयी अत्यंत आदराची भावना ठेवल्यास आपला अहंकार, गर्व, ताठा व तत्जन्य विकार मावळून माणसाला समाधानी जीवन जगता येते. शाश्वत, समाधानी जीवनासाठी अनेक प्रकारच्या साधनांचा उहापोह केला असला, तरी नाम हे सर्वांचे सार आहे, असे समर्थांचा अभिप्राय आहे. येथून पुढे 81व्या श्लोकापासून स्वामींनी नामसाधनेवर भर दिला आहे. त्याचे विवेचन पुढील लेखांतून होईल.