अरे, हे तर आमच्याकडे पण असंच आहे !

    22-Nov-2022
Total Views |
 
नित्यानंद स्वामी
 
 
 डावीकडून दिवाकर शेट्टी (कार्यक्रमाचे आयोजक), नागराज शेट्टी (माजी मंत्री), किशोर अवर्सेकर (बांधकाम व्यावसायिक), मठातील पुजारी, गणेश शेट्टी, दयानंद सावंत.
 
 
 
 
नित्यानंद स्वामी केरळातील प्रसिद्ध संत. कर्नाटकात उडपी येथे स्वामींच्या आश्रमाचे काम पूर्णत्वास येत आहे. द्वाराच्या अंतिम उभारणीच्या उद्घाटनासाठी, आमचे मित्र सीएस गणेश शेट्टी यांनी निमंत्रण दिले. बांधकाम व्यावसायिक किशोर अवर्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तिथे जाण्याचा योग आला. हा सोहळा अनुभवला. वाटले, कर्नाटक असो की आसाम भारतीयांचे भारतीयत्व , परंपरा आणि मनोभूमिका एकच आहे. त्यासंदर्भातले मनोगत या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
वर्सेकर सरांची स्वामी नित्यानंद महाराजांवर असीम श्रद्धा. या माध्यमातून चालणार्‍या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा भरघोस सहभाग असतो. त्या आश्रमासोबत एक अभियंता महाविद्यालयसुद्धा जोडले असल्याची माहिती दिली. गणेश शेट्टी ईशान्य भारताच्या विषयात ’छएथरूी भारत फेडरेशन’ सोबत जोडलेले आहेत. त्यांनी सांगितले या महाविद्यालयात ईशान्येकडील विद्यार्थ्यांची आपण शिक्षणासाठी व्यवस्था करू शकतो. या निमित्ताने प्राथमिक चर्चेसाठी कर्नाटकात जाण्याचा योग आला. महाद्वार पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजक दिवाकर शेट्टी म्हणाले, अशा प्रकारे आंतरराज्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणांतर्गत अशी व्यवस्था निर्माण केल्यास आंतरराज्यातील तरुणांच्या मैत्रत्वात वाढ होऊन एकमेकांच्या रूढी, परंपरा, चालीरीती कळत नकळत समजून घेतल्या जातील. अनेक समानतेच्या दुव्यातून देशबंधुत्वाच्या नात्याची वीण घट्ट होत जाईल. प्रसंगी उपस्थित असलेले भाजपचे माजी मंत्री (मत्स्यव्यवसाय आणि मुजराई मंत्रालय, मुजराई म्हणजे धार्मिकस्थळांचे मंत्रालय), मोहन नांबियार यांनी दिवाकर शेट्टी यांच्या विचारांना दुजोरा दिला.
 
 
महाद्वार पूजेचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर, उडपी जिल्ह्यातील मांडीमुरकै येथे गणेशजींच्या गावी जाणं झालं. घनदाट जंगल, विरळ वस्ती आणि विशेषतः नारळी, फोफळी आणि रबराच्या झाडांची विपुल प्रमाणात लागवड केलेलं गावं. स्थानिक भाषा कन्नड. गावात मोजक्या लोकांनाच हिंदी येते. तालुक्याचे कार्यालय असलेले हेब्री ठिकाण आठ ते दहा किलोमीटरवर. तेथून दिवसातून तीन-चार वेळा गावात सार्वजनिक खासगी बस येतात. तीन किलोमीटर परिघात पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा, एकूण विद्यार्थी पटसंख्या 35. येथेच चौथीपर्यंत स्वतःच शिक्षण झालेल्या शाळेत गणेशजी घेऊन गेले.
 
 
मुलांना चॉकलेट देत, शिक्षकांशीसुद्धा गप्पा सुरु होत्या. शाळेतल्या भिंतीवरील महापुरुषांच्या छायाचित्रांची मुलं अभिमानाने ओळख करून देत होती. कन्नड भाषेतील कर्नाटकाच्या स्वाभिमानाचे गीत गाताना, त्या गीतात देशातील इतर महापुरुषांचा उल्लेख देशबंधुत्वातील स्नेहाचा झरा पाझरवत होता. मुलांना ‘टाटा’, ‘अच्छा’, ‘बाय बाय’ करत आम्ही शेताकडे निघालो.
नदी ओलांडून जाताना मासे पकडायच्या एका बांबूच्या जाळ्याने थांबायला भाग पाडले. कारण, तसेच मिळते जुळते विणलेले बांबूचे जाळे मणिपूरमध्येसुद्धा अनेक ठिकाणी पाहण्यात आले होते. तसेच बागायतीत काम करणार्‍या शेतकर्‍यांनी घातलेली टोपी लक्ष वेधून घेत होती. सुपारीच्या झाडाच्या पानांपासून बनविलेली ताट/वाटी आपण पाहिलीय. पण झाडाच्या माथ्यावर येतात ती पान नाही, जेथे सुपारीची फळ धरतात, त्या थोडसं वरच्या बाजूच्या भागाचे अर्धगोलाकार असे जाडसर साल सुकून आपोआप खाली पडते. साधारण महिन्यातून एकदा झाडाची साल पडतात. याच पानापासून शेतकरी टोपीसुद्धा बनवतात. शेतात काम करताना कडक उन्हात डोक गार ठेवण्यास आणि पावसाळ्यात 100 टक्के डोकं भिजण्यापासून वाचविण्यास या टोपीचा खूपच उपयोग होतो. तज्ज्ञांनी याला अजून सुंदर आकार प्रकार देण्यार्‍या साच्यांची निर्मिती करण्यास पुढाकार घेतल्यास, शहरी भागातसुद्धा तरुण वर्गाला ‘फॅशन’ म्हणून भुरळ घालणारी टोपी नावारूपाला येऊ शकते.
 
 
आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा इत्यादी ईशान्य भारतातील पारंपरिक पोशाखात पण याच पानाच्या भागापासून बनविलेल्या कलात्मक टोप्या घातल्या जातात. यांचा शेतातील काम करताना नियमित वापर केला जातो. कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील मांडीमुरकै या गावातील शेतकर्‍यांनासुद्धा अशी टोपी घातलेली पाहून पुन्हा एकदा सुचलं, कन्नड असो वा कार्बी, कलात्मकतेची सुंदर सुरभी (कार्बी आसाम मधली एक जनजाती).कर्नाटकातल्या ग्रामीण भागातील घराघरात एका विशिष्ट प्रकारच्या देवांची स्थापना पिढ्यान्पिढ्या पासून करण्यात आलेली आहे. त्यांना क्षेत्रपाल/संरक्षक असे म्हणतात. जवळपास 1200 पेक्षा जास्त विविध क्षेत्रपाल आजही येथे पुजले जातात. पंजुरली, शिवराया, गुळीगा, वार्ते, मंत्रगणा, काळकुटका, कोरागाज्जा अशाप्रकारची या काही क्षेत्रपाल देवतांची नावे आहेत.
 
 
 
 
नित्यानंद स्वामी
 
 
 हेब्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट
 
 
 
 
प्रत्येक घरात वर्षातून एकदा कोला साजरा केला जातो.कोला म्हणजे उत्सव, एका विशिष्ट कालगणनेच्या कालावधीत या कोलाचे नियोजन केले जाते. भावकीतील सर्व सदस्यांना या उत्सवात येणे बंधनकारक असते. तशी पूर्वसूचना सर्वांपर्यंत वेळेत पोहोचविली जाते. उद्योगानिमित्त परदेशी स्थिरावलेली, शिक्षणानिमित्त बाहेर गावी असलेल्या घरातील सर्व मंडळींची यानिमित्त किमान वर्षातून एकदातरी या कोलानिमित्त भेटाभेटी होतात. घराची डागडुजी सजावट शेजार्‍यांनासुद्धा निमंत्रण देण्यात लगबग सुरू होते. पाणारा जनजातीच्या मंडळींचा या काळात विशेष आदर सन्मान असतो. या जनजातीचे प्रमुख सदस्य वरती उल्लेख केल्याप्रमाणे प्रस्थापित देवतांच्या म्हणजे पंजुरली, शिवराया, गुळीगा इत्यादी देवतांच्या वेशभूषेत येतात. ईशान्येकडील जनजातीसुद्धा आजही काहीशा अशा वेशात त्यांच्या त्यांच्या पारंपरिक कार्यक्रमात पूजापद्धती करताना दिसतात. चेहर्‍यावर रंगरंगोटी करून भुवया कोरलेल्या, शिरावर मुकुट घातलेला अशा रुपात घरी येतात. पूजा सुरू झाल्यावर त्यांच्या अंगात कंपनं सुरू होतात. त्याला ‘देव अंगात आला’ असे म्हणतात. कोकणात त्याला ’शिवकळा आली’ असे म्हणतात.
 
 
कन्नड घरातल्या सदस्यांपैकी उत्सवाला कोणी गैरहजर असेल, तर त्याची विचारपूस केली जाते. कोणी कंटाळा, टाळाटाळ केली असेल, तर त्याच्यावर रागावण्याचासुद्धा अधिकार त्यांना असतो. बाकीच्या घरच्या सदस्यांना विचारतात, जेथे असेल तेथून घेऊ का बोलवून? जर काही आपत्तीमुळे येणं होत नसेल, तर त्यांच्यावरील संकट दूर होण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली जाते. या वार्षिक कोलावर सर्वांची नितांत श्रद्धा असते. याच श्रद्धेच्याच आधारावर न्याय, नीती आणि संस्कारांची मूल्यं जतन करण्यासाठी, घरातील एकोपा अखंडित रहाण्यासाठी क्षेत्रपालाला सर्वजण शरण असतात. तसेच प्रत्येक घरात नागदेवतेची पूजा होते. घराच्या बाजूला, शेतात वारूळ असतेच. त्या जागेला कोणीही कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. त्या वास्तूला येताजाता नतमस्तक होऊन नमस्कार केला जातो. कासारगोड ते भटकळपर्यंत ही तुळुनाड संस्कृती कन्नड समाजात सर्वश्रुत आहे.
 
 
मेघालयातील जयंती या जिल्ह्यातसुद्धा काही विशेष देवघर पाहायला मिळतात. त्या देवघरात जाण्यापूर्वी शरीरावर परिधान केलेल्या चामड्याच्या वस्तू अगोदरबाहेर काढून ठेवाव्या लागतात. खासी आणि पनार (जयंतीया) समाज वर्षातून एकदा एकत्रित लुंगपुंग महोत्सव साजरा करतात. या सणात पूर्वजांचे स्मरण करणे हा महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक गावागावातसुद्धा हा सण साजरा केला जातो. कामानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व खासी जयंतीया या काळात आपापल्या मूळ घरी येतात. शेट्टी, पुजारी, बिल्लाव, मोगविरा, कुलाल या समाजात मातृसत्ताक पद्धती आहे. अशीच मातृसत्ताक पद्धती ईशान्येकडील राज्यातील अनेक जनजातीत आढळते. भौतिक संपत्ती महिलेच्या नावावर असते. लग्नानंतर वधूच्या घरी वर राहावयास जातो. हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तमालपत्र दालचिनी, रामपत्र इत्यादी झाडांचेसुद्धा मुबलक प्रमाण आहे. काही ठिकाणी अगरची झाडेसुद्धा पाहावयास मिळतात. दूधक्रांती तर झालीच, प्रत्येक घरी गाय असतेच.
 
 
पण आता जर पाडा (बैल) जन्माला आला, तर त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. कारण, शेतीच्या कामात त्याची फार गरज उरली नाही. हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाने निसर्गावर केलेली मात काही ठिकाणी माणुसकीला काळिमा फासत आहे. गाईची गर्भधारणा करण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर वाढायला लागला आहे, नंतर दुधाचं प्रमाण वाढायला पुन्हा अनैसर्गिक रासायनिक क्रिया. आर्थिक आवक वाढतेय, पण दुर्गम भागात पाय रोवायला गती घेत असलेल्या अशा निसर्गावर रासायनिक अतिक्रमणास रोखणे गरजेचे झाले आहे.
 
 
 
 
नित्यानंद स्वामी
 
 कर्नाटकमधील मासे पकडण्याची टोपली
 
 
 
 
कर्नाटकातलाच एक मराठी नाईक समाज आदिवासी म्हणून गणला जातो. आर्थिकदृष्ट्या थोडा दुर्बल असलेल्या या वर्गाला राज्य सरकारने काही सुविधा दिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या, जरी शिक्षणाचा आलेख उंच नसलेल्या आदिवासी समाजात धर्मांतरणाचे प्रमाण नगण्य आहे. पण झारखंड वगैरे ठिकाणाहून शेतीतील रोजगारासाठी आलेल्या रोजंदारांच्या गळ्यात येशूचे ‘क्रॉस’ दिसायला लागले आहेत. एका सक्षम समाजाने आपल्या दुर्बल बांधवांच्या समस्यांवर जरी प्रेमाने फुंकर घातली, त्यांच्या गरजांकडे थोडं लक्ष दिलं, आपुलकीचं प्रेम दिलं, तरी आपापसातील एक स्नेहभाव टिकून समाजात दुही न होता देश एकसंध राहून विभक्तीच्या मागण्याच जन्माला येत नाहीत.
 
 
ईशान्येकडेसुद्धा बर्‍याच राज्यात मातृसत्ताक पद्धती आहे. धर्मांतरित झालेली काही मंडळी आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब विसरलेली नाहीत. मोठ्या प्रमाणात धर्मांतरण जरी झालं असलं, गत काळात विभक्तीच्या मागण्या बळावल्या असल्या, तरी आज देशबंधुत्वाच्या नात्यात ओलावा निर्माण होत आहे. हे तेव्हाच शक्य होऊ शकेल, जेव्हा केवळ उर्वरित भागातील देशवासी काही ना काही निमित्ताने म्हणजे व्यापार, पर्यटन यानिमित्ताने तेथील देशवासीयांसी संपर्कात येऊन, एकमेकांची सामाजिक संस्कृती रितीभाती समजून घेताना, त्यातील समान दुवे लक्षात आल्यावर दिवसेंदिवस आपलेपणाचा भाव वृद्धिंगत होत आहे. हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या राज्यातील समाजात कितीतरी बाबतीत समानता आढळून येते आणि हीच समानता देशबंधुत्वाची नाळ अजून घट्ट करण्याचा दुवा होऊ शकते.
 
 
वाटेत हंसराज शेट्टी यांची गणेशने ओळख करून दिली. हंसराज म्हणाले, त्यांचे वर्गमित्रसुद्धा मेघालयातील मुलांना कर्नाटकात शिक्षणासाठी घेऊन येतात. त्यांना विचारलं, ”ते तुकाराम शेट्टी का?” ते लगेच “हो” म्हणाले. गेली काही वर्षे ते कार्यरत आहेत. या माध्यमातून शिक्षण पूर्ण करून मेघालयात परत गेलेली मुलं, कर्नाटकातील नात्यांच्या स्मृतींसह, समाजातील अन्य क्षेत्रात यशस्वीपणे सक्रिय आहेत. हंसराज आणि तुकाराम यांची अनेक वर्षात भेट झाली नव्हती, योगायोगाने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सोमवारी रात्री आम्ही शेजारील शंकराच्या पुरातन मंदिरात गेलो. दर सोमवारी तेथे भजन होते. या मंदिराचा साधारण 800 वर्षांचा इतिहास स्थानिक गावकरी सांगतात. आद्य शंकराचार्यांनी या मंदिराला भेट दिली होती.
 
 
 
 
नित्यानंद स्वामी
 
 
 
 
तरुण मुलं-मुलींनी तालासुरात केलेल्या महादेव, कृष्ण आणि विठ्ठलाच्या जयघोषात भजन गाताना वातावरण अध्यात्मिकतेने भारावून गेलं होतं. या भजनातील भक्तीचं रसायन आठवडाभर ऊर्जा देणार इंधन म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. कन्नड शब्दांचा जरी अर्थ कळत नव्हता, तरी टाळ आणि डफलीच्या तालाने ‘हरी विठ्ठल’ नामाने मन मंत्रमुग्ध झाले होते.
देशातील ग्रामीण भागातील विविधतेत दिसणारी समानता पदोपदी बंधुत्वाचे नातं सांगत असते. पूर्वी कधी न भेटलेली इतर राज्यातली मंडळी योगायोगाने परिचित दुव्यातून मैत्रीच्या नात्यात गुंफली जातात. काही वेळेस सिनेमातून दिसणारीही समानता, अरे ! हे तर आमच्याकडे पण असंच आहे, असं मनावर मोरपंख फिरवून जाते.
 
- दयानंद सावंत
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.