15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन, हा आपण ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने त्यांच्याबद्दलचे जनजाती, दीकू आणि भोगोमान, एका स्वर्णिम युगाचे पूर्वावलोकन हे संकलित लेखन प्रकाशित करत आहोत.
दि. 15 नोव्हेंबर हा थोर जनजाती क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. (1875मधील हा त्यांचा प्रकट दिवस). आपल्याकडे नेहमी थोर युगपुरुषांबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त तारीख-वारांवरुन वादविवाद होताना आपण बघतो. बिरसा मुंडांबद्दलही तसे वाद झाले असले, तरी सर्वमान्य आणि केंद्र सरकार अधिकृत असलेला दि. 15 नोव्हेंबर हा दिवस. आज त्यांचे नाव हिंदुस्थानात सुपरिचित असल्याचे आपण जाणतो.देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या क्रांतियज्ञात अनेक जनजाती क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्त्री-पुरुष अशा सर्व स्तरांतील क्रांतिवीरांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपल्या केंद्र सरकारने दि. 15 नोव्हेंबरचा दिवस ‘राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ म्हणून समग्र भारतात साजरा करण्यास सांगितले आहे. सदर ‘जनजाती गौरव दिना’च्या निमित्ताने सर्व जनजाती हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्तानेच आपणही येथे त्यांना नमन करत बिरसा मुंडा यांची आठवण काढत त्यांची थोडी माहिती सर्वांपुढे सादर करु.
भोगोमान एक लोकोत्तर पुरुष...
या भगवान बिरसा मुंडांनी जनजातीय समाजासमवेतच समस्त हिंदुस्थानाचाही चेहरामोहरा बदलून टाकत मोलाची कामगिरी केली आहे. त्यांचा जो काळ होता, तो 1875चा पारतंत्र्याचा होता. तेव्हा बिरसा नावाच्या एका युवकाचे नाव झारखंडातील छोटा नागपूरच्या जंगल खोर्याच्या परिसरातील गावागावात सगळ्यांच्या तोंडी घेतले जात होते. ते सगळे म्हणत की, उलिहातू येथे जन्मलेल्या या बिरसामध्ये चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे. भोंदू लोकंही चमत्कार दाखवतात, अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारी जनता त्यांना कालांतराने झिडकारत त्यांना मानत नाहीत, लगेचच त्यांचे बिंग उघडे पडते. पण बिरसा जे चमत्कार दाखवत असे त्यात लोकांना तथ्य आढळायचे. ‘च’ म्हणजे निश्चित, ‘मत’ म्हणजे अनुभवसिद्ध मन आणि ‘कार’ म्हणजे कार्यसिद्ध अवस्था, या तीन उपशब्दांना एकत्र करुन ‘चमत्कार’ शब्द बनला आहे असा उल्लेख ‘चमत्कार’ या शब्दाबद्दल पूर्वापार रुढ आहे. खर्या योग्याप्रमाणे आचरण करणारी ही व्यक्ती विज्ञानाशी प्रामाणिकपणा सिद्ध करुन दाखवत होती आणि म्हणूनच ती व्यक्ती भोंदू असूच शकत नाही, असे ठाम मत सर्वांचे होत असे. असा हा दिव्य पुरुष वनवासी समाजातील सगळ्यांचे आजार पळवून लावत लोकांना आरोग्यसंपन्न होण्याचे धडे देत असे. लोकांना धन-धान्याने समृद्ध करण्यासाठी शिकवत असे. माझ्या रुपात लोककल्याणार्थ भगवंतानेच तुमच्यात मला पाठवलं आहे असे सार्यांना सांगताना तो लोकांचा आपल्यावरील विश्वास संपादन करुन घेत असे. यासारखेच तो हेदेखील लोकांना पटवून देत असे की, मला जे कार्य देवाने सोपवले आहे, त्यात ब्रिटिशांसारख्या विदेशी आक्रमणकर्त्यांपासून आणि आपल्याच देशात असलेल्या दुष्ट जमीनदार व राजेराजवाड्यांच्या त्रासापासून, त्यांच्या गुलामगिरीतून आपल्या बांधवांना मुक्त करुन सुखी करायचे आहे.
बघता बघता बिरसांची ख्याती सर्वदूर पसरु लागली अन् जनजातीय लोक त्याच्या मार्गदर्शनाखाली जनजातींचे व देशाचे भलं करण्यासाठी झटू लागले. ‘भगवान’ या शब्दाचा अर्थ लोकोत्तर पुरुष असाही सांगितला जातो. सगळे बिरसाला भगवान समजू लागले. बिरसाचा उल्लेख एकेरी न करता त्यांच्या भाषेत ‘भोगोमान’ म्हणजे आपल्या भाषेत भगवान बिरसा मुंडा असा बहुमानाने करु लागले. झारखंडी भाषेतला हा ‘बिर्सा भोगोमान’ म्हणजे ‘बिरसा भगवान.’ आजही बिरसा मुंडा ‘भगवान’ म्हणून पुजले जातात. बिरसा मुंडा यांना भगवान ही उपाधी प्रदान करण्यात आली आणि ते ‘धरती के आबा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. जनजातीमध्ये देव म्हणून त्यांची पूजा होऊ लागली. बिरसा मुंडा यांनी जनजाती समाजातील 12 अनुयायांना दीक्षा देऊ केली व ते 12 जण समाजातील अन्य लोकांचे गुरू बनले. वनवासी समाजात नवचेतना वाढवण्याचे कार्य बिरसा मुंडांनी यशस्वीपणे केले.
केवळ मुंडा समाजच नाही...
या बिरसांचा जन्म जनजाती परिवारातल्या मुंडा या एका जनजाती समूहातला. बिरसांना पूजनीय मानणार्या लोकांमध्ये संथाल आणि उराँव या समाजातील लोकांचाही समावेश होता. हे सारेच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वैतागले होते. आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीची घडी विस्कटलेली त्यांना आढळू लागली होती. आपल्या उदरनिर्वाहाची त्यांना चिंता वाटू लागली होती. आपला धर्म व संस्कृती संकटात येताना बघत त्यांना वेदना होत होत्या. लोकांना सावरण्यात, रक्षण देण्यात, त्यांच्या बाजूने संघर्ष करण्यास बिरसांना किती व कोणकोणत्या स्थितीत व कोणकोणत्या प्रकारच्या संकटांशी सामना करावा लागला होता? ‘दीकू’ म्हणून ज्यांना ओळखले जात होते, असे विदेशातून आलेले ते कोण होते? त्यांनी जनतेला ओलिस ठेवून आपल्या बांधवांना गुलामगिरीत कसे ढकलून छळले होते? ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत जनजाती जमातीचा कसा अनन्वित छळ केला जात होता? जनजाती समाजाची घडी कशी विस्कटू लागली होती? या व अशा असंख्य प्रश्नांचा बिरसा मुंडांनी सखोल अभ्यास केला होता. त्यावरील उपाययोजनांबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करत सगळ्यांबरोबर विचारविनिमय करत त्यांना आधार देत बिरसा मुंडांनी जनजागृती केली होती! स्वतःचा व स्वतःच्या घरादाराचा विचार न करता स्वेच्छेने, समर्पित वृत्तीने जनजाती व हिंदुस्थानी समाजाला बिरसा मुंडांनी कसे वाहून घेतले होते, या सगळ्यावर आपण सगळ्यांनी विचारमंथन जरुर केले पाहिजे.
बिरसा मुंडांचा काळ आणि आजचा काळ यात असलेला फरक आपण समजून घेतला पाहिजे. स्वर्णिम युग घडताना बिरसाने केलेला अभ्यास.त्या काळात जनजाती रितीरिवाज आणि त्या काळातल्या कर्मठ ब्राह्मणांची आचारविचार पद्धती यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जनजाती समाजांतर्गत विशेष भेद नव्हते. जातीपातीवर आधारित समाजातील असतात, तसे फरक जनजाती समाजातील बहुतेकांत नव्हते. एका कबील्यात राहणारे सगळे जनजाती लोक हे एका कुटुंबातील घटकांसारखे एकतेने, खेळीमेळीत राहत असत. अशा प्रकारचा एकोपा असल्याचे जरी इतरांना जाणवत असले, तरी त्यांच्यात आर्थिक व सामाजिक फरक नव्हताच, असे नव्हे. 19व्या शतकातही त्यांच्यात विविधता होती. त्यांच्यातील विविध कार्यपद्धतीतला जनजाती समाज देशातील विविध भागांत असला, तरीपण तो एकमेकांशी घट्ट बांधलेला होता.
बिरसांचे विचार...
वयात येताच आपले घरदार सोडून बिरसा मुंडांनी अनेक ठिकाणी फिरुन जनजाती बंधू-भगिनींना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्याचा सखोल अभ्यास केला. बिरसा मुंडांनी आयुर्वेदाचाही अभ्यास केला व त्यांनी वैद्यकी केली, लोकांची सेवा-शुश्रूषा केली. जे काही शालेय शिक्षण घेतले होते, त्या मिशनर्यांच्या शिक्षणातील चांगला तेवढाच भाग आत्मसात करुन त्याचा फायदा बिरसा मुंडांनी उठवला आणि आपल्या जनजातीच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. त्याकाळीदेखील जनजाती समाजाचे चरितार्थ भागवण्याचे वेगवेगळे मार्ग होते. जनजाती समाजाचा अभ्यास करताना त्याने कशा प्रकारच्या समाजाचा विचार केला असेल, तेदेखील बघू.
जनजातींची झूम शेती
आधीच्या काळी जनजाती समाजातील बहुतांशी कुटुंबं उदरनिर्वाहासाठी शेती करत. जनजाती समाजातील शेतकरी हे ‘फिरती शेती’ करत. या शेतीच्या पद्धतीनुसार जंगलाचा काही भाग ते झाडे तोडून व जाळून साफ करत आणि त्या जमिनीवर मिश्र पीक पद्धतीने किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेत. दोन अथवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कस घटून उत्पादन घटले की, हे शेतकरी ती जागा सोडून दुसर्या जागी शेतीसाठी स्थलांतर करत. हा जनजातीतला एक वर्ग भटक्या माणसांप्रमाणे होता. त्या शेतकर्यांमधले काहीजण भाताची शेती करत. शेतकर्यांच्या कथा-व्यथा बिरसा मुंडांनी जाणून घेऊन त्यांना आपलेसे केले.
शिकार, प्राणिप्रेम बिरसाईयत व संग्रह...
साठवणूक करणारा आणि शिकारीवर उदरनिर्वाह करणार्या जनजातींमध्ये जाऊन बिरसा मुंडांनी तोही अभ्यास केला. टोळीने केलेली शिकार आपापसात वाटून ते घेत असत. शिकारीच्या निमित्ताने जागोजागच्या वनांमध्ये ते विविध फळं, झाडाच्या खाण्यायोग्य खोडांची साल व मुळं खाऊन जी टिकाऊ असतील, त्या साठवून ठेवत. वनौषधी आणि वनोपजाचा त्या लोकांचा अभ्यास असे, ते तो गोळा करत विकत. शिकारीवर मिळवलेल्या प्राणिपक्ष्यांची चामडी, कातडी, शिंग यांचा व्यापार करुन उदरनिर्वाह केला जाई. पूर्णतः जंगलावर व शिकारीवर अवलंबून असणारे जनजाती जेव्हा शिकार करायचे तेव्हा त्यांचे शिकारीचे काही नीतिनियम होते. आजकालसारखे कातड्यासाठी प्राण्यांची मुद्दाम हत्या ते करत नसत. मृगाजिन व वाघाचे कातडे यांच्यासारख्या जनावरांचे कातडे ते उपयोगात आणत. बिरसा तर त्यांना वारंवार सांगत असे की, जनावरांची हत्या करु नका. त्यांना मारुन शिजवून खाऊ नका. आपल्यात माळ घालणे म्हणजे देहावर तुळशीपत्र ठेवून देह देवाप्रति अर्पण करणे. अर्पण केल्यावर आपली सत्ता संपते अन् देवाची सुरू होते, दुसर्या अर्थाने माळ घालणे म्हणजे सदाचाराकडे जाणे. तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर ज्या पद्धतीने आचरण करावे लागते तसेच ‘बिरसाईयत’चे आहे.
हा तो बिरसा मुंडांचा नवीन धर्म. ‘बिरसाईयत’ ही बिरसा मुंडांनी विकसित केलेली जीवनपद्धत आहे. त्यांच्यावर अनेक वादविवाद होत असत. नंतर नंतर तर ती लोप पावत चाललेली आढळते. त्यातील काही शिकवण ही तर आजदेखील जनजाती आणि शहरी माणसांनी आचरणात आणावी, अशी आहे. मांस, मदिरा, तंबाखू, बिडीकाडी यापासून चार हात दूर राहण्यास बिरसांनी सगळ्यांना उपदेश दिला आहे. या ‘बिरसाईयत’मध्ये तो हेच शिकवत असे. ज्या जंगली श्वापदांपासून आपल्याला धोका असायचा, अशांची मग त्यांना स्वसंरक्षणार्थ शिकार करावी लागे. अशा जनावरांना नष्ट करुन झाल्यावर त्यांची केसाळ कातडी ते काढून घेत. त्यावेळच्या जनजातींमध्ये अनेक ज्ञानी होते. शिकारीनंतर ते कातडे कालांतराने कुजून जात असे. अशा कातड्यांवर हे जनजातीतले तज्ज्ञ नैसर्गिक गोष्टींच्या सहाय्याने प्रक्रिया करत. अशी कातडी कमावणारी माणसं त्यांच्यात पूर्वापार उपलब्ध होती. रेशीम उद्योगातही ते कार्यरत होते. या सगळ्यांचा गैरफायदा हे व्यापारी लोक घेत आणि त्यांची फसवणूक करत. महुआसारख्या झाडाची फुले व त्यापासून बनवले जाणारे मद्य याचाही आस्वाद घेत विकून ते कमाई करत.
आपण जे पिकवत कमवत असू ते दुसर्यास देऊन आपल्याला जे हवे ते त्या बदल्यात घेतले जाई. मालाची देवाणघेवाण करून व्यापार करणे, हा त्या जनजातींपैकी अनेकांचा उदरनिर्वाहाचा मार्ग होता. पाळीव जनावर, गाईगुरं, शेळ्यामेंढ्या यांच्यावर अनेकजण गुजराण करत. एका ठिकाणचे चराऊ गवत संपले की ते दुसरीकडे जात, अशी मजल-दरमजल करत त्यांना जावे लागे. धनिक व्यापारी व सावकार अशावेळी त्यांना अडचणीत आणून त्याचा गैरफायदा घेत. त्यांना चारापाण्यासाठी, ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक संकट, दुष्काळ अशात जनजातींवर अनेकदा संकटे येत असत. याशिवाय काहीजण मोलमजूरी करत, काहीजण रस्ते, पूल आणि अन्य कामांवर जात. काही दुसर्याच्या शेतात शेतमजूर म्हणून कामगार बनत. असं असलं तरी अनेक जनजाती स्वाभिमानी बाण्याने जगत. परक्याच्या शेतात राबण्यात त्यांना कमीपणा वाटे. काही कट्टर लोक आपण जंगलपुत्र असल्याचा अभिमान बाळगत फक्त जंगलसंपदेवर मिळणार्या संपत्तीच्या उपजीविकेवर गुजराण करत. अन्य प्रकारे उपजीविका करणे हा त्यांना आपला अपमान वाटे.
दीकू...
वर म्हटल्याप्रमाणे जनजातींना पोटापाण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टींची गरज पडत असे. आपल्या मर्यादित कमाईमुळे त्यांना काही अत्यावश्यक गोष्टी, सेवा घेणे क्रमप्राप्त ठरत असे. कौटुंबिक गरजांसाठी त्यांना पैशांची गरज भासेल. आपल्या मौल्यवान वनोपजाच्या बदल्यात गरजेच्या गोष्टी ते घेत. अनेकदा हा व्यवहार तोट्यात पडे. व्यापारीवर्गाने विक्रीसाठी आणलेला माल अवाच्यासवा किंमतीला ठेवत असत. सावकाराकडून कर्ज मिळे, पण त्याचा व्याजदर न परवडणारा असे व त्यात ही जनता अडकून पडे. तसेच मर्यादित जीवनशैलीमुळे त्यांचा अपेक्षित विकास होत नसे. असे झाले की मग त्यांना व्यापारी व सावकारांच्या पाया पडायला लागे. ते दुष्ट या जनजातींचा गैरफायदा घेत असत. अनेक जण त्यात कर्जबाजारी होत अक्षरश: भिकेला लागायचे. सावकार आणि व्यापार्यांच्या साथीने हे विदेशी राज्यकर्ते त्याचा फायदा उठवत. त्या दुष्टांचे साटेलोटे असे.
विचित्र स्थितीत मुखीयाँ...
वसाहतवादी शासनप्रणालीने जनजातीवर परिणाम होऊ लागला होता. ब्रिटिशपूर्व काळात जनजाती नेत्यांच्या प्रधानाच्या अधिपत्याखाली सगळे वागत. इतरांपेक्षा यांच्या हाती आर्थिक वजन होते, सुनियंत्रण होते. अनेक भागातजनजातीचे स्वतःचे पोलीस दल असे. तेच जमीनजुमला, घरगुती, सार्वजनिक भांडणतंटे सोडवत. ब्रिटिश येईपर्यंत सगळे सुखात चालले होते. त्यानंतर प्रधानांच्या आधिकारात बदल होऊ लागले, अनेकांचे अधिकार काढण्यात आले. आपले कायदे व नियम न वापरता ब्रिटिशांचे सक्तीचे झाले. हा एक मोठा आघात तेव्हा होता. जनजातींच्या म्होरक्याने ब्रिटिश अधिकार्यांना नजराणा देणे भाग पडू लागले. जनजातींच्या मंडळात ब्रिटिशांचा एक प्रतिनिधी ठेवणे सक्तीचे केले जाऊ लागले. पूर्वीप्रमाणे आता जनजातींच्या हातात काही राहिले नाही. जनजातींची सामाजिक ताकद नाहीशी होऊन ते सारे ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत आले. जनजाती मुखियांनाही सर्वसामान्य वागणूक मिळू लागली, त्यांनाही परंपरागत कामांना जुंपण्यात आले.
ब्रिटिशांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांनी शेतसारा वसूल करायला चालू केले. सामुदायिक शेती व फिरती शेती बंद पडली. हा देखील एक धक्काच होता. इंग्रजांना घसघशीत, ठोस आणि नियमित मिळेल असा पैसा हवा होता. जनजाती समाजातील अनेकांकडे हातात दिसेल, असा पैसा नव्हता तरी पण ते सुखी-समाधानी होते. पण इंग्रजांना कोणी किती पैसे द्यायचे हे ठरवायला चालू झाले. त्यासाठी इंग्रजांनी सर्वप्रथम कोणाची कुठली व किती जमीन असेल, हे ठरवायला चालू केले. जमिनीची मोजणी केली व ती आखण्यात आली. जमीन मालक कोण असेल व त्याने इंग्रज सरकारला किती पैसे द्यायचे आणि ती जमीन कोण कसेल, त्याने किती पैसे मालकाला व सरकारला द्यायचे हे ठरवून टाकले. याने जनजाती समाजाची कंबरच मोडली.
वन कायद्याचा प्रभाव...
ज्या ‘जन-जंगल-जमीन’चे मालक शतकानुशतके जनजाती बांधव होते, त्यांची मालकी हिसकावून घेतली जाऊ लागली. ब्रिटिशांनी सगळ्या जंगलांवरही आपली मालकी पक्की करुन टाकली. काही जंगले आरक्षित म्हणून जाहीर केली. या आरक्षित जंगलांमध्ये असलेली झाडं इमारती लाकडांसाठी वापरण्यासाठीची होती. ती झाडे फक्त इंग्रजांच्या निवासी लाकडांसाठी ठरवली गेली. अनेक जंगलातील भागात मुक्त संचार करायला परवानगी जनजातींना नाकारण्यात आली. अनेक जंगलातील शेतजमिनीत फिरती शेती करायला परवानगी बंद करण्यात आली. त्या जंगलातून लाकूडफाट्यासमवेतच फळे, फुले, वनस्पती, गोळा करण्यास मनाई घालण्यात आली. जनजातींच्या शिकारीवरही बंदी घालण्यात आली. या सगळ्याचा मुख्यत्वेकरून परिणाम झाला तो फिरती शेती करणार्यांवर. त्यांना पोटापाण्यासाठी नोकरी करणे भाग पडले. मालकच आता नोकर बनून हलाखीचे जीवन जगू लागला. आपला भाग सोडून कुठे कुठे नोकर्या शोधायला फिरायची वेळ आली.
ब्रिटिशांनी मिळवले स्वस्तात स्वस्त मजूर
जेव्हा इंग्रजांनीच जंगलांवर निर्बंध घातले तेव्हा मात्र इंग्रजांपुढे एक प्रश्न उपस्थित झाला होता अन् त्याने तेच अडचणीत आले होते. तो प्रश्न होता तेव्हा लोहमार्गांसाठी लागणारे लाकूड, रुळाखाली आडवे घालण्यासाठी वापरले जाणारे लाकूड (स्लीपर). हे लाकूडतोडे जनजातीय असायचे आणि जंगलातून ते लाकूड इच्छितस्थळी नेण्यासाठी लागणारा मजूरवर्गही जनजातीच होता. तेवढ्यासाठीच फक्त म्हणून मग इंग्रजांनी आपल्या स्वार्थासाठी जंगलात जनजातींना छोटे-छोटे तुकडे शेतीसाठी देऊ केले. ते देताना जनजातींना अट घातली गेली होती की, गावात राहणार्यांनी वन विभागासाठी पडतील, तशी सांगितली जातील, तशी कामं करावी लागतील आणि जंगलातील ठरवून दिलेल्या भागाची देखरेखही त्यांनी करायची. याचा उपयोग करुन घेत अनेक ठिकाणी स्वस्त अन् मस्त मनुष्यबळ जनजातींद्वारे इंग्रजांनी मिळवले.
वन कायदा...
जनजाती समूहाला काम मिळवण्यासाठी व मोलमजुरीसाठी दूरदूरवर जाऊन नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करावे लागत होते. अशा जनजाती समाजाची परिस्थिती तर सगळ्यात जास्त बिकट होती. नंतर नंतर चहाचे मळे देशात वाढत गेले, खाणींच्या व्यवसायाने जोम धरला होता. जनजातीय बांधवांना चहाच्या मळ्यांत आणि खाणींमध्ये पटापट नोकर्या मिळू लागल्या. या नोकर्या त्यांना ठेकेदारांमार्फतच लागायच्या. ठेकेदार त्यांना जे वेतन मिळवून देई, त्यातले स्वल्पच जनजातींच्या हाती पडत असे. एवढेच नव्हे, तर या कर्मचार्यांना रजा वगैरे मिळत नसे आणि त्यांना आपापल्या गावी घरी जाऊ दिले जात नसे.
अशा अंदोलनांचे नेतृत्व...
व्यापारी आणि महाजन यांच्या जुलमांना वैतागून जनजाती बांधवांनी अनेक आंदोलने चालू केली. आंदोलन करून त्या जुलूम करणार्यांना अद्दल घडवून आपला निषेध व्यक्त करण्यात भगवान बिरसा मुंडांनी पुढाकार घेत या असंतोषाला तोंड फोडले. बाकीचे थोर जनजाती नेतेही त्यांच्या जोडीला येतच होते.
आपण वर जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, बिरसा मुंडांनी विविध क्षेत्रातील जनजाती समाज समजून घेत त्यांना साथीला घेत हिंदुस्थानात क्रांती घडवत आणली. आपल्या पणजोबांनी अनभवलेले वैभव आपली पिढी पुन्हा आणू शकते आणि तसेच स्वर्णिम युग पुन्हा येऊ शकते, याची बिरसा मुंडांना खात्री होती. परंतु, नियतीने तसे ठरवले नव्हते. विशीतल्या या युवकाला देवाकडून बोलावणे आले. आता त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत हिंदुस्थानाचा विकास करण्याचे पुढचे कार्य आपल्याला चालू ठेवायचे आहे. भगवान बिरसा मुंडांना केलेले तेच आपले नमन असेल.
जय हो बिर्सा भोगोमान...
ता. क. : काही आठवड्यांपूर्वी याच भगवानांचा पुतळा गुजरातमधील एका प्रसिद्ध ठिकाणी पाडण्यात आला आणि भोगोमानचा अपमान करण्यात आला. यावरुन मला तरी असे वाटते की, अजूनही बिरसाविरोधी लोक कार्यरत आहेत. हे आपल्याला अपमानास्पद नाही वाटत का? या अशा गोष्टी रोखण्यासाठी आपण काही करत आहोत की नाही? जनजाती समाज ज्यांना भगवान मानत अशा भगवानाचा भगवान व जनजाती समाजाचा आद्य भगवान ‘सिंग बोंगा’ तो हे सारे बघत असेलच ना?
(जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, खेलकूद आयाम, पुणे.)
-श्रीपाद पेंडसे