उद्योगाची उलाढाल आणि नफा वाढविण्यास मदत करणारे : राजेश पेडणेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021   
Total Views |

Rajesh pednekar_1 &n
 
 
 
कोरोना काळात जगभर एका गोष्टीचे महत्त्व सर्वांना प्रकर्षाने कळले असेल ते म्हणजे आरोग्याचे. मग ते वैयक्तिक पातळीवरचे आरोग्य असो वा सामाजिक. या साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणजे औषध. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण भारतातील जवळपास एक तृतीयांश लोकसंख्येला म्हणजे तब्बल ४६ कोटी लोकांना ३० ते ३५ किलोमीटर औषधासाठी वणवण करावी लागते, तर १६ लाख लोकांचा वेळेवर योग्य औषधे न मिळाल्याने मृत्यू होतो. हे सर्व काही एका संस्थेने केलेल्या पाहणी अहवालात निष्पन्न झाले आहे. एका तरुणाला हा पाहणी अहवाल अस्वस्थ करुन गेला. त्याने त्याच्या सहकार्‍यांसोबत एक मोहीम सुरू केली. ‘दवा भी, दुवा भी.’ लवकरच देशभरात ही मोहीम पोहोचविण्याचा या तरुणाचा मानस आहे. हा तरुण म्हणजे ‘फ्युचर कन्सल्टिंग’चे राजेश मोहन पेडणेकर.
 
 
 
राजेश यांचा जन्म ठाण्यातला. सगळं बालपण ठाण्यातच गेलं. राजेश यांचे वडील हे शासकीय सेवेत होते, तर आई या ठाण्याच्या सिव्हील इस्पितळात ‘सिस्टर इनचार्ज’ होत्या. या पेडणेकर दाम्पत्याला एकूण तीन मुले. त्यातील राजेश सर्वात मोठा. त्याचे शालेय शिक्षण ठाण्यातल्या पाचपाखाडी येथील सरस्वती इंग्लिश मीडियममध्ये झालं. त्या वर्षीच्या एसएससी बोर्डात विज्ञान विषयामध्ये तो संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आला होता. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन केळकर महाविद्यालयातून राजेश बारावी उत्तीर्ण झाला. त्या काळात मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर अशा अभ्यासक्रमाची चलती असे. राजेशने महाराष्ट्र शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याने ‘पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग’मधून बी.टेक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘आयआयटी मुंबई’ येथून केमिकल इंजिनिअरिंग विषयात संशोधन केले.
 
 
शिक्षणाची भूक इथेच शमली नाही, तर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग’ अर्थात ‘निटी’ या जगद्विख्यात संस्थेतून ‘ऑपरेशन्स मॅनेजमेंट’ या विषयात दोन वर्षांचा एमबीए हा अभ्यासक्रमदेखील राजेशने पूर्ण केला. त्यानंतर राजेशने आपल्या व्यावसायिक आयुष्याचा श्रीगणेशा केला तो ‘बबूल टूथपेस्ट’ तयार करणार्‍या ‘बलसारा’ कंपनीतून. तिथे त्याने ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून एक वर्ष काम केलं. त्यानंतर ‘ड्युलक्स पेंट्स’ तयार करणार्‍या ‘आयसीआय पेंट्स’मध्ये ‘रिजनल लॉजिस्टिक मॅनेजर’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्याने पाच वर्षे काम केले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या अनुभवाची शिदोरी पुढील आयुष्यात त्यास उपयोगी आली. पुढे त्याने ‘न्युट्रिशिया कंपनी’मध्ये ‘नॅशनल लॉजिस्टिक मॅनेजर’ म्हणून दोन वर्षे काम केले. त्यानंतर ‘गोल्डशिल्ड फार्मा कंपनी’च्या माध्यमातून काही दिवस तो लंडनमध्ये राहिला. त्या कंपनीमध्ये ‘ग्लोबल सप्लाय चेन’ या विभागात उच्चपदावर काम करण्याची त्यास संधी मिळाली.
 
 
 
औषधी क्षेत्र हे खूप वेगळं आणि आव्हानात्मक आहे. औषध हा घटक अत्यंत नाजूक आणि तितकाच वेळ पाळणारा आहे. हे ज्या विभागातून काम चालते त्याच विभागात उच्च पदावर काम करण्याची संधी राजेशला मिळत गेली. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्याने कामे केलेली आहेत. ‘निकोलस पिरामल’, ‘निटको टाईल्स’, ‘नोव्हार्टिस’ सारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमधला राजेश पेडणेकरांचा अनुभव वाखाणण्यासारखा आहे. ‘सिप्ला’ या औषधी कंपनीत ‘लॉजिस्टिक अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन’ विभागाचे ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते. एका औषधी कंपनीमध्ये कार्यरत असताना त्यांनी ७० टक्के खर्चाची कपात केली, तर दुसर्‍या एका औषधी कंपनीमध्ये १२ टक्के खर्चात कपात केली आणि आठ टक्के विक्रीत वाढ झाली, तेदेखील एका वर्षात. सिंगापूरमधील ‘टेरापिन’ या संस्थेने आशिया-पॅसिफिक खंडातील ‘लॉजिस्टिक’ आणि ‘सप्लाय चेन’ या क्षेत्रातील प्रभावित करणार्‍या उत्कृष्ट ५० व्यक्तींमध्ये राजेश पेडणेकरांचा समावेश केला होता, प्रत्येक भारतीयासाठी, विशेषत: मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
 
 
 
२०१४ मध्ये राजेश आणि त्यांच्या काही मित्रांनी एकत्र येऊन ‘फ्युचर कन्सल्टिंग’ नावाची कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून एखाद्या उत्पादक कंपनीची साठवण क्षमता, वहन क्षमता लक्षात घेऊन नेमकं त्यांनी कोणत्या गोष्टींमध्ये कपात करावी. कोणत्या घटकांवर भर द्यावा, याचा पूर्ण अभ्यास करुन अहवाल सादर केला जातो. या अभ्यासामुळे संबंधित कंपनीस आपल्या संधी कळतात आणि त्या संधीचे सोने करुन सदर कंपन्या नफ्यात चालतात. अशाच एका कंपनीला अशा प्रकारे अभ्यासपूर्ण अहवाल देऊन राजेश पेडणेकरच्या कंपनीने संबंधित कंपनीची उलाढाल ८७ कोटी रुपयांवरुन १२० कोटी रुपयांपर्यंत नेली तेदेखील अवघ्या एका वर्षांत. ‘एफएमसीजी’, ‘फूड इंडस्ट्री’, औषधी कंपन्या, आरोग्य क्षेत्रातील कंपन्या, सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील कंपन्यांना त्यांची कंपनी नियमित सेवा देतात.
 
 
 
लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना खरंतर या सगळ्या बाबींची अत्यंत गरज आहे. विशेषत: कोरोना पश्चात कोणत्या बाबींमध्ये कपात करावी आणि कोणत्या घटकांकडे अधिक लक्ष देऊन आपला नफा वाढवावा, याचे मार्गदर्शन आम्ही करू शकतो. किंबहुना लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातील संस्थांसाठी हा आमचा मदतीचा हात असेल, अशा स्वरुपाचे राजेश पेडणेकर एकप्रकारे लघु-मध्यम उद्योजकांना आवाहन करत आहेत. ‘दवा भी, दुवा भी’ या सुरुवातीला उल्लेख केलेल्या मोहिमेस भारतात सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे राजेशचे भविष्यकालीन उद्दिष्ट आहे.
 
 
कोरोनामुळे एकूणच जगातील कंपन्या डबघाईस आलेल्या आहेत. प्रत्येक कंपनी खर्चात कपात करुन नफा मिळवू इच्छिते. मोठ्या कंपन्या यासाठी एमबीए झालेल्या तरुणांना नियुक्त करू शकतात. मात्र, लघु-मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्योगांना हे शक्य नाही, त्यांच्यासाठी राजेश पेडणेकरसारखे तज्ज्ञच खरा पर्याय ठरु शकतात.
 
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : 98202 16568, [email protected])
@@AUTHORINFO_V1@@