'शार्क-स्टिंग रे'च्या ३६ टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर - 'आययुसीएन'ची माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2021   
Total Views |
sting ray _1  Hमुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेकडून जगातील वन्यजीवांच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्यात येते. यासंबंधीचे नवे मूल्यांकन समोर आले आहे. त्यामध्ये ३७,४०० प्रजातींना जगातून लुप्त होण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामधील सर्वाधिक संख्या ही समुद्रात अधिवास करणार्‍या ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’ (पाकट) या मत्स्यप्रजातींची आहे.
 
 
 
शार्क-स्टिंग रे मधील साधारण ३६ टक्के प्रजाती या लुप्त होण्याचा मार्गावर असल्याचे म्हटले आहे. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’च्या ७६ प्रजाती आता ‘अति-संकटग्रस्त’, ११२ प्रजाती ‘संकटग्रस्त’ आणि १६७ प्रजाती ‘धोकाग्रस्त’ पातळीवर नोंदविण्यात आल्या आहेत. ‘स्टिंग रे’ कुळातील एक प्रजात जगातून नामशेष झाल्याची शक्यता ‘आययुसीएन’ने वर्तवली आहे. इंडोनेशियातील जावा किनारपट्टी क्षेत्रात आढळणारी ‘जावा स्टिंग रे’ या प्रजातीचा समावेश ‘आययुसीएन’ने संभाव्य विलुप्त प्रजातींच्या यादीत केला आहे. या प्रजातीचा समावेश २००६ साली ‘अति-संकटग्रस्त’ प्रजातींच्या यादीत केला होता. इंडोनेशिया देशाला प्रदेशनिष्ठ असलेल्या या प्रजातीचे १९व्या शतकाच्या अखेरनंतर दर्शन घडलेले नाही. ‘स्टिंग रे’ प्रजातींविषयी कमी माहिती असल्याने, त्यांच्या अभ्यासावर हवे तसे लक्ष न दिल्याने आणि मासेमारी-मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाच्या अभावामुळे या प्रजाती ‘शार्क’ प्रजातींपेक्षाही संकटात सापडल्या आहेत.
 

समुद्रात प्रवाळ क्षेत्रात राहणार्‍या आणि अतिसामान्यपणे दिसणार्‍या ‘शार्क’ प्रजातीही आता धोक्यात सापडू लागल्या आहेत. ‘कॅरिबियन रीफ शार्क’, ‘लेमन शार्क’ आणि ‘अटलांटिक नर्स शार्क’ या सर्वसामान्यपणे दिसणार्‍या प्रजाती आता धोकाग्रस्त म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’च्या १,२००पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रजाती आपल्या जागतिक महासागरात वास्तव्यास आहेत. हे वैविध्यपूर्ण जीव डायनासोरच्या काळापासून साधारण ४०० दशलक्ष वर्षांहूनही अधिक काळ समुद्रात वास्तव्य करत आहेत. ‘शार्क’ आणि ‘स्टिंग रे’ समुद्रातील अन्नसाखळीबरोबरच जगभरातील लाखो लोकांची उपजीविका, अन्न आणि पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत.

 
 

@@AUTHORINFO_V1@@