संयुक्त राष्ट्रासह जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सुधारणांची गरज – अर्थमंत्री सितारामन

    दिनांक  13-Oct-2021 14:55:29
|
fm_1  H x W: 0

जगामध्ये अद्यापही विकासाचा असमतोल
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या आंतरराष्ट्रीय संस्थांना स्वत:मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. सध्या ज्या देशांचे महत्वाचे मुद्दे दशकांपासून प्रलंबित आहे, त्यासाठी या संस्था काहीच करताना दिसत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकतेच अमेरिकेतील बोस्टन येथे केले.
 
 
केंद्रीय अर्थमंत्री सध्या आठवड्याभराच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. तेथे त्या विविध संस्थांशी संवाद साधत आहेत. बोस्टन येथील हार्वड केनेडी स्कुल येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांमधील सुधारणेची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, सध्या जगातील सर्व देशांमध्ये परिवर्तनाची, सुधारणांची सुरुवात झाली आहे. मात्र, संयुक्त राष्ट्र, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्था गेल्या अनेक दशकांपासून आहे तशाच स्थितीत आहेत. सध्या या संस्था ज्या देशांचे प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहेत, त्याविषयी बोलताना दिसत नाहीत. व्यापार, संरक्षण, आर्थिक चौकट आणि निधीपुरवठा यामध्ये आता सुधारणा होण्याची गरज आहे. त्यामुळे जगातील सर्व देशांना पुरेसे प्रतिनिधीत्व मिळणे आणि कारभारात पारदर्शकता असणे ही काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
 
 
 
 
जगाची उत्तर – दक्षिण अशी विभागणी अद्यापही कायम आहे. आफ्रिकेतील अनेक भाग, पॅसिफीक बेटांमध्ये अद्यापही विकास पोहोचलेला नाही. अनेक देशांमध्ये तर अंतर्गत विकासाचा असमतोल आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी जागतिक संस्थांनी सुधारणा करणे अतिशय महत्वाचे असल्याचेही सितारामन यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.