मुंबई, कराडमध्ये एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झालेली गुप्त भेट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीने राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळत असून, जयंत पाटील यांच्या नव्या राजकीय वाटचालीची कुजबुज सुरू झाली आहे.
शनिवार, दि. ५ जुलै रोजी कराड येथे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज यांच्या विवाहसोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उदयसिंह पाटील-उंडाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, शरद पवारांसोबत सातारा दौऱ्यांमध्ये नेहमी दिसणारे जयंत पाटील यावेळी स्वतंत्रपणे लग्नस्थळी दाखल झाले, त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर अजित पवार व्हीआयपी कक्षात चहापानासाठी थांबले. यावेळी जयंत पाटील तिथे आले आणि अजित पवारांनी त्यांना जवळ बोलावत गप्पा सुरू केल्या. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा रंगली. यावेळी त्यांनी एकत्र चहा आणि अल्पोपहार घेतला. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात राहिला असला, तरी ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय शह-कटशह सर्वश्रुत होते. मात्र, या भेटीने नव्या समीकरणांना जन्म दिला आहे. महायुतीत एक मंत्रिपद अद्याप रिक्त असल्याने जयंत पाटील राजकीय कूस बदलतील की काय, अशी चर्चा या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.
पडद्यामागील गणित काय?
जयंत पाटील यांनी यापूर्वी शरद पवारांसोबत सातारा दौऱ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र, यावेळी त्यांनी स्वतंत्रपणे उपस्थिती लावली आणि अजित पवारांशी दीर्घ चर्चा केली. या भेटीमुळे जयंत पाटील यांच्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी नवीन रणनीती आखली जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कराडच्या या लग्नमंडपाने राजकीय मैफलीसाठी नवा मंच उपलब्ध करून दिला आहे, हे मात्र नक्की!
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.