मुंबई : राज्यभरात सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. यावरून पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत कोकाटेंवर टीका केली.
शनिवार, २६ जुलै रोजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी शनि शिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन घेत त्यांची पूजा केली. यावर रोहित पवार म्हणाले की, "तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे, असे शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते."
"स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो," असे रोहित पवार म्हणाले.