ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला काँग्रेसची दांडी! नेमकं कारण काय?

    05-Jul-2025   
Total Views |


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ठाकरे बंधू एकत्र येणाचा सोहळा अखेर संपन्न झाला. या मेळ्याव्यात २० वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर पक्षकार्यकर्त्यांसह नेतेही भावूक झाले होते. दोन्ही ठाकरेंसाठी मंचावर केवळ दोनच खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर कुठल्याही मान्यवरांना मंचावर स्थान नव्हते. याच कारणास्तव शरद पवारांनी आपल्या नियोजित दौऱ्यांचे कारण देत या सोहळ्याला उपस्थित राहण्यास नकार दिला की काय, अशी शंका उपस्थित होते. महाराष्ट्रासाठी किंवा मराठीसाठी एकत्र या, असे आवाहन वारंवार दोन्ही ठाकरेंच्या पक्षाकडून केले जात होते. मात्र, राज ठाकरे वगळले तर उद्धव ठाकरेंच्या भाषणात मराठीच्या मुद्द्यांचा फारसा उल्लेख दिसून आला नाही.

या सोहळ्याचे नाव आवाज मराठीचा, असे बिगर राजकीय हवे, असा अट्टाहास राज ठाकरेंचा होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंकडून सर्वच राजकीय पक्षांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार अनेक प्रक्षातील बड्या नेत्यांनी हजेरीही लावली. मात्र, काँग्रेस पक्षातील एकही जण या कार्यक्रमाला फिरकलं नाही. कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा असं या सोहळ्याला नाव देण्यात आलं. पण तरीसुद्धा काँग्रेसचा एकही नेता या सोहळ्याला उपस्थित का राहिला नाही? ठाकरे बंधूंचं एकत्र येणं काँग्रेसला मान्य नाही का? आणि काँग्रेसने या मेळाव्याला उपस्थित न राहण्यामागे नेमकी कारणं काय? या सगळ्याबद्दल थोडक्यात समजून घेऊया.

त्रिभाषा धोरणातील हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार होते. मात्र, त्याआधीच राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीसंदर्भातील निर्णय मागे घेतला आणि आंदोलनातील हवाच निघून गेली होती. त्यामुळे मनसे आणि उबाठा गटाकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात हा मेळावा पार पडला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार हा ऐतिहासिक क्षण पहाण्यासाठी वरळी डोम सभागृहात गर्दी अगदी ओसंडून वाहत होती. मात्र, एवढ्या तुडूंब भरलेल्या सभागृहात काँग्रेस पक्षाचं कुणी दिसतंय का? याकडेच सर्वांच्या नजरा लागून होत्या. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. पण, काँग्रेसचा एकही मोठा चेहरा व्यासपीठावर दिसला नाही. त्यामुळे साहाजिकच सर्वांच्या भूवया उंचावल्या.

काँग्रेसच्या अनुपस्थितीची अनेक कारणंही दिली जाताहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने काँग्रेस पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी या मेळाव्याला दांडी मारली, असं एक कारण सांगण्यात येतंय. दुसरीकडे, मनसे आणि उबाठा गटाला कार्यक्रमाचं निमंत्रणच दिलं नसल्याचंही बोललं जातंय. मात्र, सध्यातरी काँग्रेसच्या अनुपस्थितीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

खरंतर, मनसे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचं जगजाहीर आहे. राज ठाकरे कायमच ज्यांचा विरोध करतात किंवा ज्यांच्यावर टीका टिपण्णी करतात असा वर्ग काँग्रेसचा कोअर मतदार. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या सभेला जाऊन काँग्रेस आपल्या मतदाराला दुखवू इच्छित नाही. मालाड, धारावी, मुंबादेवी अशा अनेक मतदारसंघांमध्ये उत्तर भारतीय आणि अल्पसंख्यांक हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. मुंबईतील अनेक मुस्लीमबहूल भागांतून काँग्रेसचे आमदार निवडून आलेत.

मुंबई महापालिकेतील काँग्रेसचं बलाबल बघायचं झाल्यास २००७ मध्ये काँग्रेसचे ७५ नगसेवक निवडून आले होते. तर २०१२ मध्ये ५२ निवडून आलेत. २०१७ मध्ये हा आकडा ३१ नगरसेवकांपर्यंत खाली आला. काँग्रेस पक्षाचा मुंबईतील हा घसरता आकडा लक्षात घेता यंदाच्या निवडणूकीत पक्षाचा चांगलाच कस लागणार हे निश्चित. काँग्रेस पक्षाची मुंबईतील आणि एकंदरीत राज्यातील ढासळलेली अवस्था पाहता त्यांना अधिकची तडजोड करणं परवडणारं नाही.

राज ठाकरेंची प्रखर हिंदूत्ववादाच्या भूमिकेत आणि काँग्रेसच्या भूमिकेत जमीन आस्मानाचा फरक. शिवाय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष. त्यात बिहार राज्यातील निवडणूका तोंडावर आहेत. यासह गुजरात आणि इतर राज्यातीलही निवडणूका येणाऱ्या काळात होऊ घातल्यात. अशा परिस्थितीत एकट्या मुंबई महापालिकेसाठी इतर राज्यात बसणारा फटका काँग्रेसला परवडणारा नाही. त्यामुळेच कदाचित ठाकरे बंधूंच्या या मनोमिलन सोहळ्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणं काँग्रेसने पसंत केलं असावं.

२०१९ मध्ये सत्तेच्या लोभापायी शिवसेनेशी यूती करण्यासाठी गांधी परिवाराचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं. परंतू, आता मनसेच्या बाबतीतही तडजोड करणं काँग्रेसला अशक्य दिसतंय. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी हिंदूत्वाची भूमिका बदलली. पण राज ठाकरे आपल्या प्रखर हिंदूत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेणार नाहीत.

दुसरी गोष्ट अशी की, लोकसभा आणि विधानसभेत उद्धव ठाकरेंना आलेल्या यशात काँग्रेसच्या मतदारांचा मोलाचा वाटा आहे. विधानसभेला उद्धव ठाकरेंचे मुंबईत १० आमदार निवडून आलेत. त्यातही काँग्रेसचा मोठा वाटा होता. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याने ही मतं त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ मराठी मतांच्या भरवशावर राहून उद्धव ठाकरे पालिका जिंकू शकणार नाहीत. त्यातही २०१७ च्या तुलनेत उबाठा गटाकडे सध्या अर्धेही नगरसेवक शिल्लक नाहीत. जे आहेत त्यातल्याही अनेकांची स्थिती तळ्यात मळ्यात आहेत.

खरंतर, स्थानिक निवडणूका जिंकण्यासाठी केवळ राष्ट्रीय चेहरा डोळ्यासमोर ठेवून चालत नाही. त्यासाठी स्थानिक चेहराच लागतो. उबाठा गटाचे अर्धेअधिक नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे गेलेत. त्यामुळे आता ठाकरेंकडे स्थानिक चेहराच नसल्याने त्यांचे किती नगरसेवक निवडून येतील? हादेखील मोठा प्रश्न आहे. याऊलट आतापर्यंत अनेक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता निवडलाय. शिवाय एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेत. त्यामुळे साहाजिकच मुंबईतील मतदार विकासाला मतदान करतील, असा विश्वास महायुतीला आहे.

बिहार विधानसभा निवडणूक, गुजरात विधानसभा निवडणूक हा मुद्दा झालाच. मात्र, परभाषिकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस मनसेसोबत जाण्याची चूक करणार नाही. याउलट मनसे नको तरच आघाडी करू, अशी अटही ठाकरेंना घालू शकते. मित्रपक्षांना सोबत घेतल्यामुळेच काँग्रेसची वाताहात झाली, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे काही दिवसांपूर्वीचेच विधान लक्षात घेता काँग्रेस एकला चलो रे च्या भूमिकेत स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे ज्या पक्षाच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकले त्यांना नाराज करणार की सोबत घेणार हे येणाऱ्या काळातच समजेल.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....