
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .आषाढी एकादशीनिमित्त, कल्याण चैरिटी ट्रस्ट, सेंच्युरी रेऑन, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेऑन हायस्कूल यांनी भव्य ज्ञान दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानदिंडी सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेतले.
बिर्ला मंदिर हे ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी कार्तिकी एकादशीला या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.आषाढी एकादशी निमित्त पहाटे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी श्री विठ्ठल-रुख्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केली. या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे प्रमुख ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले . पहाटे पाच वाजता अभिषेक, आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला.
आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या ज्ञान दिंडी कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू झाली आणि शहाड येथील विठ्ठल मंदिरात समाप्त झाली . ज्ञान दिंडीत, बिर्ला स्कूल, बिर्ला कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंग ढोलकीच्या गजरात विठ्ठलनामात तल्लीन होत सहभाग घेतला होता. हि ज्ञान दिंडी कॉलेज पासून शहाडच्या विठ्ठल मंदिरापर्यंत ज्ञानोबा- तुकाराम विठ्ठल- विठ्ठल जयघोष घुमत होता. ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेची नव्हे तर शिस्त, संस्कार, सामूहिक सहभागीची जिवंत उदाहरण ठरली.
बिर्ला मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत आरती केली. त्यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलनी, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलंगे, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव, शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण आशान आधी उपस्थित होते .
पांडुरंगाला एवढेच पांडुरंगाला साकडं घालतो या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे ,तो पडतोय, चांगलं पीक येऊ दे, बळीराजाला सुखी होऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, वारकरी ,महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दिवस येऊ दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.