‘टेस्ला’चे भारतातील पाऊल!

    दिनांक  13-Jan-2021 22:03:32   
|

tesl;a _1  H x

एक असा व्यक्ती, ज्याने भविष्य वर्तमानात साकारण्याची हिंमत केली आणि खरोखरी ते सत्यातही उतरवले, असा असामान्य माणूस आता जगभरात पाय रोवण्याची सुरुवात भारतापासून करतोय, हे सर्वस्वी अभिमानास्पद आहे.
 
 
एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंतापैकी एक उद्योजक ठरले. गेल्या आठवड्यात ‘टेस्ला’ या त्यांच्या कंपनीचे शेअर ४.८ टक्क्यांनी वधारले होते. ‘टेस्ला’ची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर म्हणजेच १३.८० लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती झाल्यानंतर आणखी काय हवं, असा प्रश्न सार्‍यांना पडत असेल. पण, मस्क यांच्या अपेक्षा इथे पूर्ण झालेल्या नाहीत.
 
 
जोपर्यंत ‘मंगळ’वारी शक्य होत नाहीत, तोपर्यंत मस्क शांत बसणार नाहीत. कधीकाळी इलेक्ट्रिक कारचे स्वप्न पाहणारे मस्क आज हेच स्वप्न सत्यात उतरवत आहेत. मंगळ ग्रहावर स्वतःचे शहर वसवून पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत हे मात्र नक्की.‘टेस्ला इंडिया मोटार्स अ‍ॅण्ड एनर्जी प्रा. लि.’ या नावाने ही कंपनी बंगळुरूतून आता भारतात कारभार करेल. जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी आता भारतात पाऊल ठेवत असताना, ऑटोमोबाईल क्षेत्रालाही उभारी देणार्‍या घटना काही वर्षांत घडणार आहेत. या बदलाकडे जग कसे पाहणार, हादेखील एक मोठा प्रश्न आहे.
 
 
काही दिवसांपूूर्वीच ‘टेस्ला’ भारतात दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भारतात येत असताना ‘टेस्ला’ आता ‘टाटा मोटार्स’शी करार करण्याची शक्यता आहे. भारतीय उद्योगजगतातील भरवशाचे नाव असलेल्या ‘टाटा मोटार्स’ला याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. ‘टाटा’ची सध्या काही मोटार उत्पादने ही बाजारात आहेत. त्याला मिळणारी ‘टेस्ला’ची जोड नवी कमाल दाखवू शकेल का, हे येणारा काळच ठरवणार आहे. मुळात म्हणजे, सर्वात मोठी युवा लोकसंख्या असणारा आपला देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलन मस्क यांची काही वर्षांपूर्वी झालेली भेट याच गोष्टी ‘टेस्ला’च्या भारतातील प्रवेशाची चाहूल देत होत्या. त्यानिमित्ताने आता ‘टेस्ला’चे भारतातील पाऊल नव्या संधी उपलब्ध करून देऊ शकते.
 
इथवर पोहोचताना मस्क आणि ‘टेस्ला’चा प्रवास तितकासा सोपा नव्हता, भविष्यातही तो नसेल. त्यामुळे ‘टेस्ला’ला आणखी चढ-उतार सुरूच राहतील, हेही तितकेच खरे. ‘टेस्ला’ची टीम सध्या भारतात प्रवेश करण्यासाठी संशोधन करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मस्क यांच्या टीमचे स्वागत केले. अमेरिकेत इथवर पोहोचत असताना मस्क यांच्या ध्येय-धोरणांवर टीका झाली. इलेक्ट्रिक कार असो वा परग्रहावर वस्ती वसविण्याचे स्वप्न असो, या सगळ्या कल्पनांची खिल्ली उडविण्यात आली. मात्र, वेळोवेळी मस्क यांनी सर्व प्रयत्न हाणून पाडले.
 
 
जगाला झुकविण्याची क्षमता असणार्‍या मस्क यांनी या काळातही स्वतःची जिद्द कायम ठेवली आणि अनेकांना आपल्या कृतीतून उत्तर दिले, आजही देत आहेत. ‘टेस्ला’ आणि ‘स्पेस एक्स’ या त्यांच्या दोन कंपन्या एकाअर्थी भविष्यच जगत आहेत. इतरांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या संकल्पना मांडून अनेकांना चकीत करत आहेत. भारतात पाऊल ठेवण्यामागे मस्क यांच्या कंपनीचाही उद्देश तोच आहे. अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर १०० टक्के आयात शुल्क लावण्यात येत आहे. हीच अडचण ओळखून ‘टेस्ला’ने भारतात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला असावा, अशीही शक्यता आहे. ‘टेस्ला’ पुढील वर्षात भारतात येईल, अशी माहिती मस्क यांनी स्वतःच दिली होती.
 
‘मला मरण आलं तर तेही मंगळावर का येऊ नये’, असा प्रश्न ते इतरांना मुलाखतीवेळी विचारतात. जगाकडे पाहण्याचा त्यांचा द़ृष्टिकोनच वेगळा आहे. नजर पोहोचेल तिथपर्यंतचे जग पाहणारे काही जण असतात, तर काही जण जग पाहण्याचाच नवा द़ृष्टिकोन घेऊन येतात. मस्क याच प्रकारात मोडत असावेत. ते पर्यावरणाबद्दल संवेदनशील आहेत. हरित ऊर्जेबद्दल आग्रही आहेत, नव्या बदलांना सहज स्वीकारणारे आहेत. ट्राफिक, इंधननिर्मिती, पारंपरिक ऊर्जास्रोत आदी समस्यांवरही त्यांनी तोडगा काढण्याची तयारी दर्शवली आहे. मस्क यांच्या नव्या व्हिजनचा फायदा आता भारतीय कसा करून घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.