बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा साक्षेपी आलेख ‘देवरस पर्व’

    दिनांक  08-Aug-2020 23:10:50
|


Devras Parva_1  


ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर यांनी लिहिलेले ‘रा. स्व. संघाच्या इतिहासातील देवरस पर्व’ हे सव्वा दोनशे पानांचे पुणे येथील स्नेहल प्रकाशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक बाबींकडे लक्ष वेधणारे आहे. म्हटलेच तर, त्याला ‘बाळासाहेबांचे चरित्र’ म्हणता येईल.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना त्यांच्या वयापेक्षा खूप ज्येष्ठ असलेले स्वयंसेवक जेव्हा पाया पडतात, तेव्हा मोहनजी खूप संकोचून जातात व त्यांना अडविण्याचा प्रयत्न करतात. पण, त्या ज्येष्ठांनाही आणि मोहनजींनाही ठावूक असते की, ते ‘भागवत’ या व्यक्तीच्या पाया पडत नाहीत, तर ते ज्या पदावर आहेत, त्या पदाविषयीचा परमादर प्रकट करीत असतात. कारण, त्या पदाचा महिमा फार महान आहे. ‘सरसंघचालक’ पद हे केवळ एक पदच नाही, तर एका महान परंपरेचे ते संस्थात्मक रुप आहे. ही संस्था (सरसंघचालक पद) डॉ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये ‘व्यवस्था’ म्हणूनच निर्माण केली आणि नंतर त्या पदावर बसलेल्या महानुभावांनी तिला इतके महान बनविले की, आज जगातील सुमारे ८० देशातील स्वयंसेवकांसह हिंदू बंधू तिच्यासमोर केवळ आदरानेच नतमस्तक होतात. डॉ. परांजपे यांचा अल्पकाळ लक्षात घेता मोहनजी हे सातवे सरसंघचालक. सप्तर्षीच जणू. त्या मालिकेतील एक ‘ऋषी’ किंवा ‘यती’ म्हणूनही ज्यांचा उल्लेख होतो, ते स्व. बाळासाहेब देवरस.
 

संघात व्यक्तींची चरित्रे लिहिण्याची प्रथा नाही. ना. ह. पालकर यांनी डॉ. हेडगेवार यांचे विस्तृत चरित्र लिहीपर्यंत एक छोटे सुमारे दीडशे पानांचे पुस्तकच डॉक्टरांचे चरित्र म्हणून उपलब्ध होते. नंतर त्यांनीच श्रीगुरुजींचे विस्तृत चरित्र लिहिले. बाळासाहेबांच्या जीवनावर काही पुस्तके प्रकाशित झाली असली, तरी ‘भारतीय विचार साधने’च्या वतीनेही बाळासाहेबांचे तसे चरित्र प्रसिद्ध झाल्याची माहिती मला तरी नाही. नंतरचे प्रा. राजेंद्रसिंहजी वा सुदर्शनजी यांच्या जीवनावरील पुस्तकांचीही त्यापेक्षा वेगळी स्थिती नसावी. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर यांनी लिहिलेले ‘रा. स्व. संघाच्या इतिहासातील देवरसपर्व’ हे सव्वा दोनशे पानांचे पुणे येथील स्नेहल प्रकाशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक बाबींकडे लक्ष वेधणारे आहे. म्हटलेच तर, त्याला ‘बाळासाहेबांचे चरित्र’ म्हणता येईल. पण, पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेल्या संदर्भसूचीचा विचार केला, तर त्याला त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रबंधच म्हणावा लागेल, इतका तो अभ्यासपूर्ण आहे.
 
संघात किंवा समाजातही बाळासाहेब देवरस ‘सरसंघचालक’ म्हणूनच ज्ञात आहेत. डॉ. हेडगेवारांच्या काळातील कुश पथकातील स्वयंसेवक, श्रीगुरुजींनंतर झालेले सरसंघचालक, पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत मुळात संघाचेच असलेले विचार नव्या परिभाषेत मांडणारे वक्ते, आणीबाणीच्या विरोधातील अघोषित नायक, विजयाच्या परमोच्च क्षणीही राज्यकर्त्यांना ‘विसरा व क्षमा करा’ असा यथार्थ संदेश करणारे नेते, संघकार्याचे परिवारात रुपांतर करणारे द्रष्टे, अशी बाळासाहेबांची विविधांगी ओळख सर्वांनाच आहे. पण, त्यांच्या बालपणाविषयी, १९५४ ते १९६० या सहा वर्षांच्या काळातील त्यांच्या जवळजवळ अज्ञातवासाविषयी लोकांना फारशी माहिती नाही. विशेषत: १९५४ ते १९६० या काळात त्यांचे श्रीगुरुजींशी मतभेद असल्यामुळे ते संघकार्यापासून अलिप्त होते, असाच गैरसमज अनेकांच्या मनात आहे. तो दूर करण्याचे कार्य विराग पाचपोर यांनी या पुस्तकातून केले आहे. अर्थात, ते काही या पुस्तकाचे प्रयोजन नाही. पण, या निमित्ताने ते कार्यही झाले आहे.
 
बाळासाहेबांचे ‘सरसंघचालक’ असताना व नसतानाही बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे नेहमी जाणेयेणे असल्याने त्यांचे कुळ कारंजाचेच असावे, अशी अनेकांची समजूत असेल. पण, त्यांचे कुळही डॉ. हेडगेवारांप्रमाणेच आंध्र प्रदेशातील चेन्ननुरु नावाच्या गावचे असल्याचे विराग यांनी निदर्शनास आणून दिले आहे. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे कुळही आंध्र प्रदेशातील कंदकुर्तीचे असावे, हा योगायोगही इथे उल्लेखनीय ठरतो. अर्थात, बाळासाहेबांचा जन्म कारंजाचाच आहे, ही वस्तुस्थितीही त्यांनी सूचित केली आहेच. त्यांचा जन्म १९१५चा. भाऊराव त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. त्यांचा जन्म १९१७चा. म्हणजे डॉ. हेडगेवारांच्या निधनाच्या वेळी बाळासाहेब जेमतेम २५ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांची सरसंघचालकपदी त्यावेळी नियुक्ती न होण्याचे त्यांचे अल्पवय हे कारण असावे, असा अंदाज करायला वाव आहे.
 
बाळासाहेबांचा संघाशी संबंध १९२६-२७च्या सुमारास म्हणजे वयाच्या केवळ बाराव्या वर्षी आला. याचा एक अर्थ म्हणजे, १९२६ ते १९४० अशी १४ वर्षे ते डॉक्टरांच्या निकटच्या सहवासात होते, असा होतो व त्याच काळात त्यांनी सरसंघचालकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते, हे स्पष्ट होते. डॉक्टरांच्या मृत्यूच्या वेळी बाळासाहेबांकडे नागपूर या संघाच्या केंद्रस्थानाचे कार्यवाह म्हणून जबाबदारी होती. पण, या जबादारीतूनच त्यांनी प्रांतोप्रांती प्रचारक उपलब्ध करुन देण्याचे कार्य केले. पुढे भैय्याजी दाणी यांच्याकडे जेव्हा सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा बाळासाहेबांकडे ‘अखिल भारतीय निधी प्रमुख’ म्हणून जबाबदारी आली होती. त्यानंतर ते सहसरकार्यवाह, सरकार्यवाह आणि श्रीगुरुजींच्या निधनानंतर ‘सरसंघचालक’ बनले. त्यावेळी त्यांचे वय ५८ वर्षे होते. अर्थात, त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी असली तरी श्रीगुरुजी मात्र त्यांना सरसंघचालकच मानत असत, याचे अनेक प्रसंग विराग यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहेत व ते या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे.
 
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संघकार्याच्या म्हणजे दैनंदिन शाखा पद्धतीच्या प्रासंगिकतेवर संघात विशेषत: महाराष्ट्रात काही प्रश्न निर्माण झाले, ही वस्तुस्थिती नाकारण्याचे कारण नाही. पण, ते त्या अर्थाने मतभेद नव्हते. काही स्वयंसेवकांनी संघाच्या हिताच्या दृष्टीनेच काही सूचना केल्या असतीलही. एवढेच नव्हे, तर दैनंदिन शाखेचा पूरक पर्याय म्हणून काही स्वयंसेवी संस्थाही उभ्या केल्या असतील. पण, त्यांचे कार्य हे संघकार्याला पूरकच होते, हे विसरता येणार नाही. त्यासंदर्भात श्रीगुरुजी आपल्या वेळोवेळीच्या भाषणांमधून खुलासा करताना शाखा पद्धतीची अपरिहार्यता प्रकट करत असत. पण, हे खरे आहे की, बाळासाहेबांची त्या स्वयंसेवकांप्रती सहानुभूती होती. म्हणजे शाखा पद्धतीला त्यांचा विरोध होता असेही नाही. संघकार्य इतर क्षेत्रातही त्या त्या क्षेत्राच्या व परिस्थितीच्या गरजेनुसार विस्तारित व्हावे, ही त्यांची भूमिका होती व ती किती रास्त होती, हे पहिल्या संघबंदीच्या वेळी सिद्धही झाले. कारण, त्या बंदीला संघाव्यतिरिक्त कुणीही प्रकट विरोध केला नाही व व्यंकटरमण शास्त्रींसारखे काही अपवाद वगळले, तर संघाच्या मदतीला कुणी आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या संसदेतही यापेक्षा वेगळे घडले नाही. त्यातूनच पुढे संघाच्या मदतीतून ‘भारतीय जनसंघा’ची स्थापना झाली. पुढे ‘भारतीय मजदूर संघ’, ‘विश्व हिंदू परिषद’ या संस्थाही स्थापन झाल्या.
 
खरे तर ‘विवेकानंद केंद्र’ वा तत्सम संस्था म्हणजे काही संघ नाही. कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मारक उभे राहावे, हे काही संघाचे अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. पण, ‘संघ हे हिंदू समाजाचे संघटित असे रुप आहे,’ असे म्हटल्यानंतर त्याला पूरक जी जी कामे असतील, त्यात संघाचा सहभाग असणे किंवा संघाला त्यांच्याबद्दल सहानुभूती असणे, हे ओघानेच येते. त्यांचा समाजाला लाभच होतो. ही बाळासाहेबांची जशी भूमिका होती, तशीच गुरुजींचीही भूमिका होती. त्यामुळे गुरुजी व बाळासाहेब यांच्यात मतभेद होते, असेही म्हणता येणार नाही. शिवाय १९५४ ते १९६० या काळात बाळासाहेब कोणत्या पदावर नसले तरी ते संघापासून दूर गेले असेही म्हणता येणार नाही. कारण, या काळात कोणत्याही पदाविना संघकार्यात ते सक्रियच होते. या काळात त्यांनी आपले लक्ष प्रचारक प्रणाली मजबूत करण्यावर केंद्रित केले होते. त्यानंतर लगेच ते शाखा पद्धतीत सक्रिय झाले. नागपूरचे प्रांत प्रचारक या नात्याने त्यांचे पुनरागमन झाले व पुढे १९६५ मध्ये भैय्याजी दाणी यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारीही आली. हा सगळा इतिहास विराग यांनी तपशीलवार सादर केला आहे.
 
बरेच वेळा लोकांना दोन सरसंघचालकांची तुलना करण्याची सुरसुरी येते आणि ते तुलनात्मक मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतात. पण, निसर्ग नियमानुसार दोन माणसात जशी तंतोतंत समानता असू शकत नाही, तशी ती दोन सरसंघचालकांमध्येही शक्य नाही, हे सहसा लक्षात घेतले जात नाही. शेवटी प्रत्येकाच्या कारकिर्दीतील परिस्थितीतही फरक असणे अपरिहार्य आहे. शिवाय आपला समाज किंवा देश मृत नाहीत, ते जीवंत आहेत. त्यांची प्रगतीच्या दिशेने क्षणोक्षणी वाटचाल सुरु आहे. त्यात काळानुसार विभिन्न समस्या निर्माण होणे, त्यावर उपाय शोधले जाणेही अपरिहार्यच आहे. त्यामुळे दोन सरसंघचालकांमध्ये तुलना करणे व्यर्थच नव्हे, तर हास्यास्पदही आहे. त्यातून काही लोक तुलना करण्याचा प्रयत्न करतात एवढेच! पण, त्यामुळे त्यांच्यात सर्वश्रेष्ठतेविषयी स्पर्धा लावणे हा त्यांच्यावरील अन्यायच ठरतो. त्या प्रकाराच्या आहारी न जाता, विराग यांनी प्रत्येक सरसंघचालकांच्या योगदानाकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
 
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असल्याने त्यांच्या पार्श्वभूमीमध्ये, रुचीमध्ये, अग्रक्रमामध्ये फरक असणेही अपरिहार्यच आहे. श्रीगुरुजींचा कल अध्यात्माकडे असल्याने त्यांची वापराची भाषा व बाळासाहेबांचा कल सामाजिक व राजकीय स्थितीचे निरीक्षण करण्याकडे असल्याने त्यांची वापराची भाषा वेगवेगळी असणे ओघानेच आहे. त्यांच्या ‘एम्फसिस’मध्ये फरक असू शकतो, पण तो जणू काय सैद्धांतिक फरक असल्याचे भासविणे म्हणजे ती चूकच आहे. नंतरचे सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते, तर सुदर्शनजींची विज्ञान व तंत्रज्ञानाशी जवळीक होती. पण, ही काही विचारभिन्नता मानता येणार नाही. शेवटी संघकार्य हेच त्यांचे जीवितकार्य होते, हे विसरता येणार नाही. या दृष्टीनेच विराग यांनी सरसंघचालकांच्या योगदानाचे यथार्थ मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीगुरुजी ‘न हिंदु पतितो भवेत’ असे म्हणतील, तर बाळासाहेब अस्पृश्यता ‘लॉक, स्टॉक अ‍ॅण्ड बॅरल’ गेली पाहिजे, असे म्हणतील एवढेच! विराग यांचे वय लक्षात घेता, त्यांनी हे धारिष्ट्य केले, ही बाब कौतुकास्पदच म्हणावी लागेल.

- ल. त्र्यं. जोशी

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.