खिलाफत : सैद्धांतिक आणि ऐतिहासिक आधार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2020
Total Views |

khilafat_1  H x



खिलाफत चळवळीने भारतातील मुस्लिमांचे मन किमान पाच वर्षे व्यापून टाकले होते. सैद्धांतिक आधाराशिवाय हे शक्यच नव्हते. सैद्धांतिक आधाराला कोणतीही ’एक्स्पायरी डेट’ नसल्यामुळे खिलाफत चळवळीला ऐतिहासिक पूर्वाधार असणार आणि भविष्यात तिची पुनरावृत्ती होणार, हे ओघाने आले.


कुठल्याही सच्च्या मुस्लिमासाठी इस्लामी सिद्धांत सर्वोपरी असतो. इस्लामने आखून दिलेल्या चौकटीत मनुष्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्थान नाही. कुराण, हदीस (प्रेषित मुहम्मद यांच्या उक्ती व कृत्यांचे अधिकृत अहवाल) आणि सीरा (प्रेषित-चरित्र) अथवा सुन्नाह (प्रेषितांची परंपरा किंवा मार्ग) या त्रयींवर इस्लामचा सैद्धांतिक डोलारा टिकून आहे. एखादा विचार किंवा कृती मुस्लीम व्यक्ती आणि समाजासाठी नैतिक की अनैतिक, वैध की अवैध हे कसे ठरवावे? इस्लामचा सैद्धांतिक आधार हाच कुठल्याही गोष्टीची न्याय्यता किंवा वैधता ठरवितो. न्याय, नीती, योग्यायोग्यता, पाप-पुण्य या बाबतीत मुस्लीम व्यक्ती आणि समाजाच्या समजुती इस्लामचे मजहबी ग्रंथ घडवित असतात. वैश्विक मूल्यांशी या समजुती सुसंगत असतीलच असे नाही, किंबहुना त्या विसंगत असण्याची बरीच शक्यता असते. जगभरातील मुस्लिमांचा एकच ‘उम्माह’ किंवा मजहबी समाज असल्याचे इस्लामचे म्हणणे आहे. देशोदेशींच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारी ही संकल्पना आहे. अशा संकल्पनेची परिणती देशबाह्य निष्ठा बाळगणार्‍या अखिल-इस्लामवादी (पॅन-इस्लामिक) राजकीय चळवळीत झाल्यास त्यात नवल-विशेष ते काय? खिलाफत चळवळीने भारतातील मुस्लिमांचे मन किमान पाच वर्षे व्यापून टाकले होते. सैद्धांतिक आधाराशिवाय हे शक्यच नव्हते. सैद्धांतिक आधाराला कोणतीही ’एक्स्पायरी डेट’ नसल्यामुळे खिलाफत चळवळीला ऐतिहासिक पूर्वाधार असणार आणि भविष्यात तिची पुनरावृत्ती होणार, हे ओघाने आले.




पुढे जाण्यापूर्वी, ’पॅन-इस्लामिजम’ या शब्दाविषयी थोडेसे! सन १८७७मध्ये लिहिलेल्या ’तुर्किस्को स्किज्जेन’ (’तुर्की रेखाचित्रे’ या अर्थाचे जर्मन शब्द) पुस्तकात ’मुराद एफेंडी’ या टोपणनावाने लिहिणार्‍या फ्रांज फॉन वर्नर नामक ऑस्ट्रियन लेखकाने हा शब्द सर्वप्रथम वापरला. पुढे फ्रेंच पत्रकार गेब्रिएल शार्म्स याने १८८१साली तो वापरला. या शब्दाशी मिळते-जुळते ’इत्तेहाद-ई-इस्लाम’, ’इत्तेहाद-ई-दीन’ अथवा ’उहुव वेट-ई-दीन’ हे इस्लामी शब्द तुर्कस्तानातील ऑटोमन (‘उस्मान’ या शब्दाचा अपभ्रंश; सन १२९९मध्ये राजघराण्याची स्थापना करणार्‍या उस्मान प्रथम वरून) सुलतान आणि हिंदुस्तान, मध्य आशिया आणि इंडोनेशियातील राज्यकर्त्यांमधील पत्र-व्यवहारात पुरातन काळापासून आढळून येतात. (द खिलाफत मूव्हमेंट इन इंडिया, १९१९ -१९२४ , मुहम्मद नईम कुरेशी, लंडन विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध, १९७३,पृ.६). ’पॅन-इस्लामिजम’ हा शब्द सुमारे दीडशे वर्षेच जुना असला तरी या संकल्पनेचे मूळ कुराणातील पुढील आयतीत सापडते- “... आणि तुमचा हा लोकसमुदाय (उम्मत) एकच लोकसमुदाय आहे आणि मी तुमचा पालनकर्ता आहे, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा (२३.५२ ).”


खिलाफतीचा प्रारंभिक इतिहास


कुराणातील २.३०,४.५९, ६.१६५,३५.३९ आणि ३८.२६ या आयतींमध्ये ’खलिफा’ (शब्दशः अर्थ: वारसदार; अनेकवचन - खुलाफा) हा शब्द प्रतिनिधी, आज्ञाधिकारी, नायब, उत्तराधिकारी या अर्थांनी वापरण्यात आला आहे. प्रेषित मुहम्मद (५७०-६३२) हेच आद्य मुस्लीम राज्यकर्ते होते. सन ६१०मध्ये त्यांना प्रेषितत्व मिळाले असले तरी मदिनेतील त्यांचा राज्यकारभार ६२२ साली सुरू झाला. म्हणजे दहा वर्षांसाठी मुहम्मद हेच प्रेषित, राज्यकर्ते, सेनापती, विधिज्ञ आणि न्यायाधीश होते. त्यांचा उत्तराधिकारी कोण, याचे निर्देश ना कुराणात होते ना स्वतः मुहम्मदांनी ते दिले. मुहम्मद हे अंतिम प्रेषित असल्याची इस्लामची मूलभूत श्रद्धा आहे (कुराण ३३.४०). त्यामुळे त्यांचे ’प्रेषित’ हे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. परंतु, त्यांचे ’राज्यकर्ता’ हे स्थान अन्य मुस्लीम अवश्य घेऊ शकतात. तसा निर्वाळा कुराणानेच पुढीलप्रमाणे दिला आहे- “हे श्रद्धावंतांनो! आज्ञापालन करा अल्लाहचे, आज्ञापालन करा पैगंबरांचे आणि त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी असतील... (४.५९).” राज्यकर्त्यांप्रती निष्ठा बाळगण्याचे अनेक आदेश हदीसमध्येही सापडतात. उदा. जो कोणी भूतलावरील अल्लाहच्या शासकाचा अवमान करतो, अल्लाह त्याचा अवमान करेल (तिर्मिजी, अल-हदीथ, मिश्कात-उल-मसाबीह, खंड २, इस्लामिक बुक सर्व्हिस, दिल्ली, पृ. ५६०). राज्यकर्ता मुस्लिमेतर असल्यास तो मुहम्मदांचे राज्यकर्त्याचे स्थान घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.



प्रेषित मुहम्मदांचे राजकीय उत्तराधिकारी अर्थात पहिले खलिफा अबू बकर यांना ’खलिफातुल रसूल अल-अल्लाह’ अर्थात ’अल्लाहच्या प्रेषिताचे उत्तराधिकारी’ अशी पदवी होती. अबू बकर (६३२-६३४), उमर (६३४-६४४), उस्मान (उथमान, ६४४-६५६) आणि अली (६५६-६६१) या इस्लामच्या पहिल्या चार खलिफांना निदान सुन्नी मुस्लीम तरी ’खलिफा रशिदुन’ म्हणजे ’सन्मार्गदर्शित खलिफा’ समजतात. हे चारही खलिफा मुहम्मदांच्या ‘कुरेश’ कबिल्याचे सदस्य होते. त्यांच्या राज्यकाळात इस्लामी सैन्याने ससानीद (पर्शियन) साम्राज्याचा पराभव केला. अरबस्तानच्या शेजारी असलेल्या बायझंटाईन साम्राज्याचा अर्धा लचका तोडून ते मोडकळीस आणले. इस्लामी सैन्याने एकीकडे दक्षिण आणि मध्य आशियात, तर दुसरीकडे उत्तर आफ्रिकेतून युरोपच्या आयबेरियन द्वीपकल्पात प्रवेश केला. पहिल्या चार खलिफांचा राज्यकाळ (६३२-६६१) म्हणूनच इस्लामचा सुवर्णकाळ समजला जातो. चारपैकी तीन खलिफांची हत्या व्हावी, हा या सुवर्णकाळातील एक मोठाच विरोधाभास आहे. अली यांच्यानंतर खिलाफत तिसरे खलिफा उस्मान यांच्या उमय्या घराण्याकडे गेली. नव्वद वर्षांनंतर सन ७५० मध्ये अब्बासी घराण्याने उमय्यांचा पराभव करून बगदादला आपल्या खिलाफतीची स्थापना केली. अब्बासींना मुस्लीम जगतातील अनेक राजघराण्यांना अधूनमधून सत्तेतील वाटा द्यावा लागला. सन १५१७ मध्ये ऑटोमन तुर्की घराण्याने इजिप्तवर विजय मिळवल्यावर अब्बासी खिलाफतीचा अस्त झाला. ऑटोमन तुर्की खिलाफत सन १५१७ ते १९२४ अशा प्रदीर्घ कालखंडात चालली. ऑटोमन साम्राज्य हे काही सामान्य साम्राज्य नव्हते. सन १४५३ मध्ये ऑटोमन सुलतान मुहम्मदने ख्रिस्ती साम्राज्याची राजधानी असलेल्या कॉन्स्टॅन्टिनोपोल (वर्तमान तुर्कस्तानचे इस्तंबुल शहर) वर विजय मिळविला. त्यानंतर ख्रिस्ती युरोपविरुद्ध इस्लामची ध्वजा तब्बल पाच शतके फडकवत ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य ऑटोमन साम्राज्याने केले.



‘खिलाफत’ नावाचे थोतांड

‘उम्माह’ किंवा वैश्विक इस्लामी बंधुभावाची कितीही वल्गना इस्लाम करत असला तरी प्रत्यक्ष इतिहास काय सांगतो? इस्लामच्या सुरुवातीपासून आजवर प्रत्येक मुस्लीम फिरका (संप्रदाय) स्वतःलाच काय तो सच्चा मुस्लीम समजून अन्य सर्व मुस्लिमांना ‘काफिर’ ठरवून एकमेकाचे रक्त सांडत आला आहे. समोर मुस्लिमेतर काफिर असेल, तरच मुस्लिमांना अखिल-इस्लामी बंधुभावाची आठवण होते. प्रेषितांना जाऊन दोन दशके होताच, शिया मुस्लिमांनी अलींच्या अगोदर कोणत्याही खलिफाला मान्यता देण्यास नकार दिला. स्वतःला ‘खवारिज’ म्हणणार्‍या मुस्लिमांनी तर खिलाफतीची गरजच काय, असा प्रश्न उभा केला. खलिफा हा कुरेश कबिल्याचाच असावा की अन्य कोणी चालेल, या गहन प्रश्नावर सुन्नी मुस्लिमांत आजही वाद झडत असतात. सर्व मुस्लिमांना मान्य असलेली खिलाफत सन ७५० मध्येच संपुष्टात आली होती. इस्लामी साम्राज्याच्या अंतर्गत असलेले अनेक स्वतंत्र राज्यकर्ते एकाचवेळी स्वतःला ’अमीर-उल-मोमिनीन’ (श्रद्धावंतांचा आज्ञाधिकारी) अशी बिरुदे मिरवत होते. एकाच वेळी श्रद्धावंत मुस्लिमांच्या निष्ठेवर दावा सांगणारे तीन खलिफा मुस्लीम जगताने पाहिले. एकमुखी खिलाफतीचे असे धिंडवडे निघत असताना, अल-मावर्दी (९७४-१०५८) आणि अल-गजाली (१०५८-११११ ) यांच्यासारखे इस्लामी विधिज्ञ मात्र या पोकळ कल्पनेला गोंजारत होते. सन १२५८ मध्ये मंगोल लोकांनी बगदादमधील खिलाफतीचे तीनतेरा वाजविल्यानंतरही ‘खिलाफत’ नावाचे थोतांड जीवंतच राहिले (कुरेशी,उपरोक्त, पृ. ७).



खलिफा-सुलतान यांचे लागेबांधे

सन ७११ मध्ये अरब मुस्लिमांनी सिंधवर विजय मिळवताच, एकमुखी ‘खिलाफत’ नामक थोतांडाची तोंडओळख आपल्या देशाला झाली. मुघल-पूर्व इस्लामी शासनकाळात हिंदुस्तानातील सुलतान स्वतःच्या वैधतेसाठी बगदादच्या अब्बासी खलिफाच्या नाही, तर कैरोमधील त्याच्या उत्तराधिकार्‍याच्या अनुज्ञेचा हवाला देत असत. महमूद गजनवी (९९८-१०३०), शमसुद्दीन इल्तुत्मिश (१२११-१२३६) आणि मुहम्मद बिन तुघलक (१३२५-१३५१) या सुलतानांनी खलिफाकडून आपल्या पदाची औपचारिक प्रतिष्ठापना करवून घेतली होती. दिल्ली सल्तनतपासून स्वतःला अलग करून राज्य करणारी काही सुन्नी राजघराणीदेखील अब्बासी खलिफाच्या नावे राज्यकारभार करावयाची आणि त्याच्या नावे नाणी पाडायची. मुघल सत्ता स्थापन होईपर्यंत खलिफा आणि सुलतान यांच्यातील मधुर संबंध चालू राहिले. सन 1526 मध्ये मुघल सत्ता स्थापन झाली, तेव्हा खिलाफतीचे केंद्र नुकतेच कुठे कैरोहून कॉन्स्टॅन्टिनोपोलला गेले होते. ऑटोमन साम्राज्य आणि मुघल सत्ता यांच्यात अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंत दूतांचे आदानप्रदान होत असले, तरी शिया पर्शियाप्रमाणेच मुघलांनी एकमुखी खिलाफतीवर ऑटोमन तुर्कांचा दावा कधीही मान्य केला नाही. मुघल सत्तेचे कंबरडे मोडल्यावर ही परिस्थिती बदलली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्तानातील मुस्लिमांच्या मनात ऑटोमन तुर्कांविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे फुटकळ पुरावे आहेत. शहा वलिउल्लाह (१७०३ -१७६२) या दिल्लीतील प्रख्यात इस्लामी विद्वानाने त्याच्या ’तफहीमात-ई-इलाहियाह’ या पुस्तकात तुर्कस्तानच्या सुलतानाचा ’अमीर-उल-मोमिनीन’ असा दोनदा उल्लेख केला होता. टिपू सुलतानाने 1789 साली ऑटोमन खलिफा अब्दुल हमीद प्रथमकडून आपल्या पदाची औपचारिक प्रतिष्ठापना करून घेण्याचे जे प्रयत्न केले, ते याच प्रेमाचे द्योतक होते (कुरेशी, उपरोक्त, पृ. ८,९ ).

उलेमाचा तुर्की उमाळा


हिंदुस्तानातील कडव्या मुस्लिमांची ऑटोमन खिलाफतविषयक भूमिका १८४०च्या दशकात स्थिरावू लागली. सन १८४१ मध्ये वलिउल्लाहचा नातू शाह मुहम्मद इसहाक (१७७८-१८४६) याने मक्केत स्थलांतर केले. ऑटोमन तुर्कांच्या परराष्ट्रनीतीला पाठिंबा देणारा हाच पहिला आलिम (इस्लामी विद्वान, अनेकवचन-उलेमा) ठरला. वलिउल्लाहला मानणारे हिंदुस्तानातील उलेमा आता एकमुखी खिलाफतीवर ऑटोमन तुर्कांच्या दाव्याचा उघडपणे पुरस्कार करू लागले. सन 1850 च्या दशकाच्या सुरवातीला ऑटोमन तुर्क हिंदुस्तानात त्यांचे दूत पाठवून तुर्की सुलतान खलिफा असल्याचा दावा हिंदुस्तानातील मुस्लिमांमध्ये प्रसृत करीत होते. तुर्कस्तानातील या तथाकथित ’श्रद्धावंतांच्या आज्ञाधिकार्‍या’ बाबत हिंदुस्तानातील मुस्लिमांना बरेच स्वारस्य आणि सहानुभूती असल्याचे गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसीला १८५४ साली आढळून आले यात आश्चर्य ते काय? किंबहुना, अशी भावना १८३५ किंवा १८३६ सालीदेखील होती, असे एका वकिलातीच्या अहवालात सूचित करण्यात आले होते.
सन १८५४ मध्ये क्रायमियन युद्ध सुरू झाले. यात ब्रिटन, फ्रान्स, सार्डिनिया आणि ऑटोमन साम्राज्य एका बाजूला, तर रशिया दुसर्‍या बाजूला उभे ठाकले. या युद्धाच्या वेळी हिंदुस्तानातील विशेषतः पश्चिम सीमेवरील मुस्लिमांमध्ये बरेच कुतूहल आणि खळबळ आढळून आली. हिंदुस्तानातील इस्लामी राज्याचे उरलेसुरले अवशेष १८५८साली नाहीसे झाल्यावर कॉन्स्टॅन्टिनोपोलशी इथल्या मुस्लिमांचे संबंध घनिष्ट होत गेले. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी, नवीन इस्लामी सत्ताकेंद्राच्या शोधात असलेल्या हिंदुस्तानातील उलेमानी ऑटोमन खलिफाकडे आपली तोंडे वळविली. रहमतुल्लाह कैरानवी (१८१८-९१), हाजी इमदादुल्लाह (१८१७-९९), अब्दुल गनी (मृत्यू १८७८), मुहम्मद याकूब (जन्म १८३२) आणि खैरुद्दीन (१८३१-१९०८) सारख्या उलेमानी मक्केला स्थलांतर केले आणि काहींनी तर कॉन्स्टॅन्टिनोपोल गाठले. ब्रिटिशांची हांजीहांजी करणारे करामत अली जौनपुरी (१८००-७३) सारखे उलेमादेखील ’ब्रिटिश राष्ट्र आणि आपला दीनप्रमुख तुर्कस्तानचा सुलतान यांच्यात असलेल्या मैत्री’ चा हवाला देत होते (कुरेशी, उपरोक्त, पृ. ८,९).


सर्वसामान्य मुस्लिमांच्या रोमारोमांत तुर्की प्रेम

तुर्कस्तानच्या सुलतानाविषयी केवळ उलेमांनाच उमाळा होता असे समजण्याचे कारण नाही. निदान १८५०च्या दशकापासून हे प्रेम मुस्लीम वृत्तपत्रांत आणि सर्वसामान्य मुस्लिमांत उमटताना दिसते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस असलेल्या नवजात मुस्लीम वृत्तपत्रांचा अभ्यास केल्यास, मुस्लिमांमध्ये अखिल-इस्लामवादी प्रवृत्ती १८७५ पासूनच वाढीस लागल्याचे दिसून येते. त्या वर्षी झालेले रशिया-तुर्कस्तान युद्ध याला निमित्त ठरले. पुढील चार दशकांत तुर्कस्तान-ग्रीस युद्ध (१८९६), लिबियातील त्रिपोलीवर इटलीचा छापा (१९११) आणि बाल्कन युद्धे (१९१२-१४) अशा घटना घडल्या. हिंदुस्तानातील मुस्लिमांची ब्रिटिशांप्रती भूमिका ही तुर्कस्तानप्रती ब्रिटिशांच्या भूमिकेप्रमाणे बदलत गेली (शरीफ अल-मुजाहिद लिखित समीक्षा: द खिलाफत मूव्हमेंट: रिलीजस सिम्बॉलिजम अ‍ॅण्ड पोलिटिकल मोबिलायजेशन इन इंडिया, गेल मिनॉल्ट, पाकिस्तान होरायजन, खंड ३९, क्र. २, १९८६, पृ.८७). थोडक्यात, हिंदुस्तानच्या हिताला अनुसरून नव्हे, तर अखिल-इस्लामवादाच्या आधारे हिंदुस्तानातील मुस्लीम त्यांची भूमिका ठरवू लागले. सन १८७०च्या दशकापासूनच हिंदुस्तानातील मुस्लीम इस्लामच्या खळिफाच्या दीर्घायुष्याची, समृद्धीची आणि विजयाची प्रार्थना खुतब्यात (शुक्रवारी मशिदीत होणारा दुपारचा नमाज, ज्यात सार्वभौम राज्यकर्त्याविषयी निष्ठा व्यक्त केली जाते) करीत होते (अल-मुजाहिद, उपरोक्त, पृ. ८१). सर सैय्यद अहमद (१८१७-९८) सारखे मध्यमवर्गीय मुस्लीम बुद्धिजीवी मंडळीदेखील एकमुखी तुर्की खिलाफतीच्या मिथकाला खतपाणी घालत होते.


तुर्की पुळक्याचे स्वरूप


सन १८३०च्या दशकात हिंदुस्तानातील मुस्लिमांच्या हाडामासांत भिनलेल्या तुर्की पुळक्याची तीन वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत. पहिले, अखिल-इस्लामी भावना हिंदुस्तानातील मुस्लिमांपुरती सीमित नव्हती, मध्य आशिया, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये सतराव्या शतकाच्या शेवटी ही भावना अखिल-इस्लामवादी चळवळींच्या रूपाने प्रकट झाली होती. दुसरे, तुर्कीच्या सुलतानांना अंतर्गत असंतोषाचा सामना करावा लागत होता. युरोपीय सत्ता त्यांच्या प्रदेशावर अतिक्रमण करीत होत्या. तुर्की साम्राज्यातील अरबांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृत होत होती. तुर्की खिलाफतीचे अवडंबर माजविण्यामागे सुलतान अब्दुल-अजीज (१८६१-१८७६) आणि अब्दुल-हमीद द्वितीय (१८७६-१९०९) या तुर्की सुलतानांचा स्वार्थ होता. सुलतानाचा दावा पुढे रेटण्यात काही युरोपीय राष्ट्रांचाही स्वार्थ होता. ऑस्ट्रिया-हंगेरी (१९०८), इटली (१९१२), ग्रीस-बल्गेरिया (१९१३) या देशांमध्ये झालेल्या संधींमध्ये खलिफा असल्याचा सुलतानाचा दावा मान्य करण्यात आला. तिसरे, मुस्लीम जगतात इतरत्र दिसणार्‍या दृश्याप्रमाणे ऑटोमन खिलाफतीच्या प्रश्नावर हिंदुस्तानातील शिया मुस्लिमांनी सुन्नी मुस्लिमांना साथ दिली. मुस्लीम समाजाच्या एकीच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा मानण्यात आला. याबाबतीत मुंबईच्या ‘अंजुमन-ई-इस्लाम’ संघटनेचे बोहरा शिया नेते बद्रुद्दीन तैय्यबजी (१८४४-१९०६) आणि मुहम्मद अली रोगे यांनी पुढाकार घेतला. त्यांचा कित्ता आधी निजाम हैदराबादचे चिराग अली (१८४४-१८९५) आणि मग अमीर अली (१८४९ -१९२८), आगा खान (१८७७-१९५७), एम. एच. इस्पहानी, मुहम्मद अली जिना (१८७६ -१९४८) आणि इतर शिया नेत्यांनी गिरविला (कुरेशी, उपरोक्त, पृ. १५) .खिलाफत चळवळ १९१९ साली हिंदुस्तानात सुरू झाली, असे वरवर पाहता वाटत असले तरी सैद्धांतिक आधार असलेल्या या चळवळीला दीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी होती, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदुस्तानातील इस्लामी शासनकाळाच्या सुरुवातीलाच ही पार्श्वभूमी निर्माण झाली होती. एकमुखी खिलाफत मुळातच कपोलकल्पित असली तरी तिची भुरळ सुलतान आणि बादशाह, उलेमा आणि बुद्धिजीवी, पत्रकार आणि सर्वसामान्य मुस्लिमांना पडली होती. हा कल्पनाविलास हिंदुस्तानातील मुस्लिमांपुरता सीमित नव्हता, हेही लक्षात घेतले पाहिजे. मुस्लीम जगताचा मोठा भाग अखिल-इस्लामवादाच्या मायाजालात अडकलेला होता. ’जगातील खर्‍या अर्थाने सभ्य आणि सुसंस्कृत लोकांसाठी चेष्टेचा विषय’ अशी खिलाफतीची संभावना करीत मुस्तफा केमाल अतातुर्क यांच्या नेतृत्वाखालील तुर्की गणराज्याच्या महासभेने दि. ३ मार्च १९२४ला खिलाफतीचा गाशा एकदाचा गुंडाळून टाकला. तिच्या पुनर्स्थापनेच्या दीर्घ संघर्षातील एक लहानसे पर्व म्हणजे हिंदुस्तानातील खिलाफत चळवळ!


एकमुखी खिलाफत हे निव्वळ दिवास्वप्न आहे असे इतिहास ओरडून सांगत असला तरी मजहबी सिद्धांतापुढे शहाणपण चालत नसते. तुर्कस्तानच्या मुस्लिमांनी खिलाफत संपविली तरी पुढच्या काळात तिची स्वप्ने बघणारे महाभाग पुढीलप्रमाणे - शेवटचा ऑटोमन शेख अल-इस्लाम मुस्तफा साबरी एफेंडी (१८६९ -१९५४ ; १९२४ साली खिलाफतीचा पुरस्कार); तकी उद्दीन अल-नाभानी (१९०९ -१९७९,जॉर्डनच्या हिजबुल तहरीर अथवा मुक्ती पक्षाचा संस्थापक, १९२५ साली खिलाफतीचा पुरस्कार); सैय्यीद कुत्ब (१९०६ -६६ , इजिप्तच्या मुस्लीम ब्रदरहूडचा संस्थापक, १९६४ साली खिलाफतीचा पुरस्कार); अबू अल-आला मौदूदी (१९०३ -१९७९ , जमाते इस्लामीचे संस्थापक, १९६७ साली खिलाफतीचा पुरस्कार); मुल्ला मुहम्मद उमर (१९६० -२०१३mतालिबानचा म्होरक्या, १९९६साली खिलाफतीचा पुरस्कार); अबू बकर अल-बगदादी (१९७१-२०१९,आयसिसचा म्होरक्या, २०१४साली खिलाफतीचा पुरस्कार). खिलाफत चळवळ संपलेली आहे असे कोण बरे म्हणेल?



- डॉ. श्रीरंग गोडबोले
(क्रमश:)
@@AUTHORINFO_V1@@