इतनी शक्ति हमें देना दाता...

    दिनांक  29-Jun-2020 20:55:04
|
Depression_1  H
आपण यापूर्वीही खरेतर यापेक्षा आव्हानात्मक आणि कठीण दगडांना फोडून आपला इथवरचा मार्ग स्वतःच घडविला. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा समस्या तेवढीच लांबी-रुंदीची असते. पण, आपली लांबी-रुंदी मात्र कित्येक पटीने वाढते.अजूनही संपूर्ण जग ‘कोविड-१९’ महामारीच्या संकटातून सावरलेले नाही. कित्येक देशांमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आहे. या महामारी आणि ‘लॉकडाऊन’मुळे आपल्या रोजच्या जगण्याची दिशा आणि भाषाच बदलून गेली. आयुष्य कोरोनापूर्वीही दगदगीचे होते आणि शहरात तशीही ही अस्वस्था प्रकर्षाने, पावलोपावली जाणवतही असते. पण, हे असे बेचैन जीवन बर्‍यापैकी अंगवळणी पडल्याने आपल्या सवयीचे असते. किंबहुना, आपण या निराशेबरोबर हात मिळवत जगण्याची भाषा लहानपणीच शिकून घेतली आहे. त्यामुळेच मातृभाषेइतकीच ही जगण्याची भाषा आपल्याला आपलीशी वाटते. या जगण्यात आपल्याला डळमळीत किंवा साशंकता वाटत नाही. ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणत आपण आपली मुशाफिरी कधी काळजीपूर्वक, तर कधी भन्नाटपणे करत पुढे जातो.


आज आपल्याला नक्की समजलं आहे की, जगण्यात स्वप्न पाहत राहण्यापेक्षा आपलं जगणं मोलाचं आहे. जगणं शाबूत ठेवण्याकरिता आपल्या मोकळीकीपेक्षा आपल्यावरचं बंधन महत्त्वाचं आहे. या तथ्यावर आपली अमान्य तात्विकता व्यक्त करणारेही बंडखोर आपल्या नजरेच्या टप्प्यात आहेत. पण, एक गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे, ती म्हणजे शास्त्र शेवटी निर्विवाद आहे. शास्त्राचा दुसरा टप्पा जोपर्यंत क्षितिजावर येत नाही, तोपर्यंत पहिला टप्पा शाश्वत राहतो. आपण प्रसंगी कितीही जटील असलो तरी आपल्या स्वप्नांना आणि ध्येयांना पुढे घेऊन जाण्यात एक प्रकारचे पारलौकिक समाधान मानतो. एकदा मुक्कामाला पोहोचलो की, मगच दम खाईन, अशी माणसाची मनोप्रवृत्ती. अशी मनोप्रवृत्ती स्वीकारायला आणि शिकायला फार कठीण नाही. मात्र, माणसाचा या ‘फिलॉसॉफी’वरचा अतूट विश्वास आवश्यक आहे. ज्यांचा या विन्स्टन चर्चिल यांनी सांगितलेल्या ‘Never never never give up’ या तत्त्वज्ञानावर विश्वास नसतो, तेव्हा त्यांच्या मनात काय क्लिष्टता असते, यावर विचार करणेही गरजेचे आहे. आपण आयुष्यात कठीण ध्येयांवर काम करीत असतो, तेव्हा तिथे पोहोचण्याची वाट खडतर असणे साहजिकच आहे. मनात सगळे विचार नकारात्मक येणेही नैसर्गिक आहे. उदाहरणार्थ - “मला वाटलं, त्यापेक्षा हे खूप कठीण आहे.” “कितीही प्रयत्न केले तरीही काहीच साध्य होत नाही.” “माझ्याच्याने काही हे शक्य नाही आता.” “इतका प्रचंड वेळ का लागतो आहे, हे काम पूर्ण व्हायला? काही खरं नाही बुवा!!!” “मला काही हे कधीच जमायचं नाही यापुढे.” अशा पद्धतीचे निराशाजनक एकापेक्षा अधिक विचार मनात घोंगावत राहिले की, मनाचा स्वीच ऑफ होतोच. बर्‍याच व्यक्तींना मग हातात घेतलेले आणि मनात रुजलेले ते काम सोडून द्यावेसे वाटते. किंबहुना, ते सोडूनही देतात.


जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट तशीच अर्धवट सोडून द्यावीशी वाटते, तीसुद्धा अनंत प्रयत्न केल्यावर तर एक महत्त्वाचा विचार करण्याची निकड आहे. ती म्हणजे आज जे इतकं कठीण वाटत आहे, अविश्वसनीय वाटत आहे, ते करण्यासाठी आपण इतकी प्रचंड हिंमत आणि ऊर्जा मुळात आणली होती कुठून? आत्महत्येचे प्रयत्न करणार्‍या किंवा तसा विचार करणार्‍या व्यक्ती जेव्हा मला समुपदेशनासाठी भेटतात, तेव्हा नेहमी मी एक प्रश्न त्यांना आवर्जून विचारते की, “आजपर्यंत इथवर इतक्या दूर तुमिही कसे काय पोहोचू शकलात? कुठून मिळाली ही इतकी कुवत आणि बळ तुम्हाला? आज अचानक हे अवसान असे कसे गायब झाले तुमच्यातून???” हा प्रश्न विचारताना त्यातील इरादा महत्त्वाचा आहे. त्यातील शाब्दिक अस्मिता महत्त्वाची आहे. त्या व्यक्तीने बाह्य समस्यांकडे पाठ फिरवून आत्मनिरीक्षण करण्याची वृत्ती जागवणं अपेक्षित आहे. माझ्या आणि त्याच्या सुदैवाने तसं घडतंही. आपण यापूर्वीही खरेतर यापेक्षा आव्हानात्मक आणि कठीण दगडांना फोडून आपला इथवरचा मार्ग स्वतःच घडविला. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा समस्या तेवढीच लांबी-रुंदीची असते. पण, आपली लांबी-रुंदी मात्र कित्येक पटीने वाढते. जेव्हा परिस्थितीने आपल्याला घेरलेले असते, तेव्हा हातातले सर्व काही सोडून सगळे बंध सोडून आपण शरणागती पत्करतो, हार मानतो. पण, आपला विजय कुठेतरी जवळपास असू शकेल. ‘मी आभाळ कोसळले तरी हार मानणार नाही,’ हा मनोनिग्रह खूप महत्त्वाचा आहे. हा मनोनिग्रह आपल्याला आपण जे जे वांछिलेले आहे, ते ते मिळवेपर्यंत तिथे टिकून राहायची प्रेरणा आपल्याला या मनोनिश्चयातूनच मिळते. आपण सतत स्वतःची प्रेरणादायी शक्ती वृद्धिंगत करतो, ते स्वतःच्या स्वत:शी असणार्‍या संवादातूनच... “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी ही तितकाच चिवट आहे.” “मी स्वतःचा मार्ग शोधून तरी कठीण किंवा नवा निर्माण करेन.” “जगात समस्या आहेत आणि त्यांचा तोडही असायलाच हवा.” “मार्ग खडतर आहे, पण मला मात्र दिशा दाखवणारा आहे.” “जरी परिस्थिती कठीण आहे, तरी मी माझ्याकडून आता उत्तम प्रत्युत्तर शोधायलाच पाहिजे.” शेवटी काय, आयुष्य एकदाच मिळते. हार मानू नका.
इतनी शक्ति हमें देना दाता ।
मन का विश्वास कमजोर होना ॥


- डॉ. शुभांगी पारकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.