लडाखमध्ये चिनी अतिक्रमण आणि भारताचे प्रत्युत्तर (भाग-२)

    दिनांक  13-Jun-2020 21:30:35   
|


china_1  H x W:लडाख सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये चीन जास्तीत जास्त किती सैन्य आणू शकतो, याचे विश्लेषण करूनच भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे चीनकडे इतर भागांमध्ये कितीही जास्त सैन्य असले, तरी भारत-चीन सीमेवर जेवढे सैन्य आणता येईल, त्याला तोंड देण्याची/हरवण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे.लडाखमध्ये दीर्घकाळ तणावाची स्थिती राहू शकते, त्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सीमेवर सज्ज आहे. सीमेवर अतिरिक्त सैन्यतुकड्यांची कुमक, साहित्य आणी आवश्यक रसदही पाठवण्यात आली आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे, पण अजून कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. भारत-चीन सीमेवर नेमके किती सैन्य तैनात आहे, त्यांची क्षमता काय आहे आणि ते कशा पद्धतीने लढू शकतील, या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

चीनकडून सतत घुसखोरी


भारत-पाकिस्तान सीमेवर ज्याप्रमाणे गोळीबार होतो, तसा भारत-चीन सीमेवर होत नाही. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्कीचे प्रसंग काहीवेळेला उद्भवतात. भारताची चीनबरोबरची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा या भागामधून जाते. त्यामुळे या प्रदेशात घुसण्याचे प्रयत्न चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून अनेकदा झाले आहेत. भारत व चीनदरम्यान झालेल्या कराराप्रमाणे आजवर या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कधी गोळी झाडली गेलेली नसून संघर्ष हाणामारीवर मर्यादित राहिला आहे. मात्र, यावेळी लाकडी दंडुके, लोखंडी सळ्यांचा वापर झाला, ज्याला भारतीय सेनेने योग्य प्रत्युत्तर दिले.

चीन सैन्याला पराभूत करण्याची भारतीय सैन्याची पूर्ण क्षमता


भारत आणि चीनमध्ये ३,४८८ किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. ही सीमारेषा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते. सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागलेली आहे. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मिडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.

अरुणाचल प्रदेशमध्ये एक ते सव्वा लाख सैन्य आणि सैन्यसामग्री तैनात आहे. सिक्कीमच्या सीमेवर ६० हजारांहून जास्त सैन्य तैनात आहे. उत्तराखंड सीमेवर ३० ते ३५ हजार सैन्य तैनात आहे आणि लडाख- जिथे सध्याचा स्टॅण्ड ऑफ’ सुरू आहे, तिथे - ३० हजारांहून जास्त सैनिक, १०० मोठ्या तोफा, १२० रणगाडे, चिलखती गाड्या सीमेचे रक्षण करत आहेत.
भारतीय सैन्याची तैनाती, या भागांमध्ये चीन जास्तीत जास्त किती सैन्य आणू शकतो, याचे विश्लेषण करून करण्यात आलेली आहे. त्यामुळे चीनकडे इतर भागांमध्ये कितीही जास्त सैन्य असले, तरी भारत-चीन सीमेवर जेवढे सैन्य येऊ शकेल/आणता येईल, या सैन्याला तोंड देण्याची/हरवण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे आहे.
तिबेटमध्ये फारसे चिनी सैन्य तैनात नाही


चीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये प्रवेश करायला लागेल, आपल्याला सॅटेलाईट आणि विमानाच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल, ज्यामुळे आपणसुद्धा आपले अजून जास्त सैन्य इथे तैनात करू शकतो. चीनने जर सैन्याच्या पोस्ट (चौक्या) किंवा लढण्याकरिता बंकर्स बनवायचे ठरवले, तर त्याला प्रचंड वेळ लागू शकतो. आपले बंकर्स, चौक्या आधीच तयार आहेत आणि आपली लढण्याची इतर सामग्रही त्या भागांमध्ये साठवली आहे. त्यामुळे त्या भागातील आपल्या सीमेच्या रक्षणाची काळजी नसावी.

भारताचे सुरक्षात्मक लाईन किंवा डिफेन्सेस तयार


सीमेचे रक्षण करण्याकरिता सैन्याला बंकर्स, शस्त्रसाठा, दारूगोळा याची गरज असते. भारताचे या भागातले डिफेन्सेस (पिकेट्स किंवा चौक्या) तयार आहेत. चिनी सैन्याने या भागांमध्ये स्वतःची सुरक्षात्मक लाईन किंवा डिफेन्सेस बनवलेले नाहीत. त्यांचे सैन्य हे तिबेटमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी बॅरेक्समध्ये राहते. गरज पडते त्याच वेळेला गस्त किंवा पेट्रोलिंग करण्याकरिता किंवा अतिक्रमण करण्याकरिता सीमेवर येते. याशिवाय भारतीय सैन्याकडे अनेक रिझर्व्ह फॉर्मेशन (सैन्याच्या तुकड्या) उपलब्ध आहेत. ‘१७ काएर’ हे रिझर्व्ह फॉर्मेशन आपण पानागड येथे तैनात केले आहे आणि त्यांची क्षमता तपासून अरुणाचल प्रदेशपासून लडाखमध्ये कुठेही गरज पडल्यास शत्रूवर हल्ला करण्याची/शत्रूला बाहेर हाकलण्याची आहे.

त्यामध्ये ३ इन्फट्री डिव्हिजन, ८ माऊंटन डिव्हिजन, स्वतंत्र सियाचीन ब्रिगेड, आर्मर्ड ब्रिगेड आणि राखीव इन्फट्री ब्रिगेडचा समावेश होतो. एकूण १२० हून जास्त रणगाडे, १०० हून अधिक इन्फट्री कॉम्बॅट वाहने, २० हजारांहून अधिक सैनिक तसेच १०० हून अधिक तोफा अशी त्याची ताकद आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात असलेली ‘३९ माऊंटन डिव्हिजन’, श्रीनगरच्या १५व्या कोअरखालील सैनिक व शस्त्रास्त्रं लगेच लडाखमध्ये दाखल होऊ शकतात.
चिनी सैन्याची लडाखमध्ये युद्धसज्जताच नाही


भारतीय सैन्य हे सीमेवर तैनात आहे. लडाखचा भाग हा १४ हजार फुटांहून जास्त उंचीवर आहे आणि तिथे सैन्य एकदम पाठवता येत नाही. सैन्याला सर्वप्रथम नऊ हजार फुटांवर कमी प्राणवायूमध्ये आणि अतिथंड जागी शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते. ही तयारी सात दिवस चालते. नंतर पुन्हा ११ हजार फूट उंचीवर हीच तयारी सात दिवस करावी लागते आणि त्यानंतर पुन्हा सात दिवस १३ हजार फूट उंचीवर हीच तयारी केली जाते. त्यानंतरच सैन्य लडाखच्या भागांमध्ये युद्धाकरिता सज्ज असते. भारतीय सैन्याची ही तयारी आहे, चिनी सैन्याची नाही.

भारतीय वायुदलाची लक्षणीय मदत


या भागांमध्ये वायुदलाकडून मिळणारा आधार आणि मदत ही सर्वथा लक्षणीय आहे. महत्त्वाचे असे की, हवाईदलाची सगळी विमानतळे/अड्डे हे समुद्रपातळीवरील असलेल्या हवाईपट्टीवर आहेत. त्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता १०० टक्के आहे. चिनी हवाईपट्ट्या तिबेटमध्ये १४ हजार फुटांहून जास्त उंचीवर बांधल्या गेल्या आहेत आणि तिथे असलेल्या हवाईदलाची क्षमता प्राणवायू कमी असल्यामुळे अतिशय कमी असते. त्यामुळे तिबेटमध्ये चिनी हवाईदलाची क्षमता ही ६० ते ७० टक्के कमी होते.

भारतीय सैन्याला लढण्याचा प्रचंड अनुभव


भारतीय सैन्याला लढण्याचा अनुभव प्रचंड आहे. भारतीय सैन्य सतत दहशतवादविरोधी अभियान काश्मीर खोर्‍यामध्ये राबवित असते. लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानशी चकमकी रोजच होत असतात. या तुलनेत चिनी सैन्य शेवटची लढाई १९७८ साली लढले होते, ज्यात व्हिएतनामने त्यांचा पराभव केला होता. भारतीय सैन्याचे नेतृत्व ज्युनियर आणि सीनियर लेव्हलला अति उत्तम आहे. भारताच्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी कारगिलमध्ये महापराक्रम गाजवले होते, जे आपल्या आजही स्मरणात आहेच.

अतिक्रमणाला पटकन प्रत्युत्तर


आता आपले रस्ते गेल्या सहा वर्षांत जास्त चांगले झाल्यामुळे, अरुणाचल प्रदेशच्या एका नदीच्या खोर्‍यामधून दुसर्‍या खोर्‍यामध्ये किंवा ब्रह्मपुत्रा नदी पार करून ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेपासून उत्तरेकडे जाण्याची क्षमता आणि भारत-पाकिस्तान सीमेवरून काही सैन्य भारत-चीन सीमेकडे हलवण्याची क्षमता नक्कीच वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे, आपण या भागात नवीन रस्ते बांधत आहोत. याचा सर्वात मोठा फायदा आहे की, याआधी भारत आणि चीन सीमेवर पोहोचण्याकरिता रस्ते नसल्यामुळे तिथे चीनला प्रत्युत्तर देण्याकरिता खूप वेळ लागायचा आणि अनेक वेळा, चिनी सैन्य येऊन गेले हेसुद्धा कळायला उशीर लागायचा. परंतु, आता या भागात रस्ते बांधले गेल्यामुळे चीनच्या कुठल्याही अतिक्रमणाला पटकन तोंड देणे आपल्याला सोपे झाले आहे. यामुळे अर्थातच चीनची घुसखोरी आपण लगेच थांबवू शकतो. नेमके हेच लडाख भागांमध्ये झाले आहे. याच्याशिवाय गलवान खोरे आणि सिक्कीममध्ये डोकुला येथे आपण त्यांना पटकन थांबवू शकलो. त्याला मोठे यश मानायला पाहिजे. भारताने लडाख सीमेवर पायाभूत सुविधा अत्यंत मजबूत केल्या आहेत. भारताने लडाख ते अरुणाचल प्रदेश या २३८८ किमी लांबीच्या ‘एलएसी’वर रस्ते आणि हवाई कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत चीनला तोडीस तोड उत्तर दिले आहे.

चिनी वस्तूंवर भारतात बहिष्कार आवश्यक


भारत आणि चीनचा व्यापार २०१९ साली ९३ अब्ज इतका होता. चीन भारतात आपल्या वस्तू विकून प्रचंड नफा कमवितो. परिणामी, त्यांची आर्थिक ताकत वाढते. ही आर्थिक ताकद चीन लष्कर बलाढ्य करण्यास वापरतो. त्यामुळे भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालायलाच हवा. यामुळे चीनची आक्रमकता कमी करण्यात आपल्याला यश मिळेल.
 
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.