वैदिक साहित्यात ‘आर्य’

    दिनांक  25-Apr-2020 22:36:06
|


rugveda_1  H xआर्यशब्दाचे मुळातले विविध अर्थ मागच्या लेखात आपण पाहिले. पुढच्या विषयाकडे वळण्याआधी याच्या सोबतच युरोपीय संशोधकांनी वंशवाचकठरवून टाकलेले असेच अजून दोन शब्दही पाहूया. ते आहेत दस्युआणि दास.

 

‘आर्य’ शब्दाचे मुळातले विविध अर्थ मागच्या लेखात आपण पाहिले. पुढच्या विषयाकडे वळण्याआधी याच्या सोबतच युरोपीय संशोधकांनी ‘वंशवाचक’ ठरवून टाकलेले असेच अजून दोन शब्दही पाहूया. ते आहेत ‘दस्यु’ आणि ‘दास’. मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या संस्कृत कोशवाङ्मयात या शब्दांचेही अर्थ आपण असेच पाहू शकतो. ‘दस्यु’ शब्दाचे (१) धाडसी डाकू / चोर, (२) खल / दुष्ट, (३) राक्षसी वृत्तीचा, (४) शत्रू, इत्यादि अर्थ करण्यात आलेले आहेत. यावरून स्पष्टपणे लक्षात येते, की हे अर्थ सुद्धा गुणवाचक किंवा कर्मवाचकच आहेत, यांपैकी कोणताही अर्थ वंशवाचक नाही. तीच गोष्ट ‘दास’ शब्दाची. याचेही अर्थ (१) नोकर, (२) सेवक, (३) शूद्र, (४) निरोप्या / दूत, इत्यादि दिलेले आहेत. ते ही गुणवाचक किंवा कर्मवाचकच आहेत, वंशवाचक नाहीत. आर्य आणि दस्यु या शब्दप्रयोगांचे वैदिक साहित्यातले काही दाखले आता पाहूया.

 

वैदिक संदर्भ :

संस्कृत साहित्यात सर्वाधिक प्राचीन मानला गेलेला ग्रंथ म्हणजे ‘ऋग्वेद’. यामध्ये ‘आर्य’, ‘दस्यु’ हे शब्द तुरळक कुठे कुठे आढळतात. त्यांपैकी आत्तापुरते इथे उदाहरणार्थ म्हणून एक-दोन संदर्भ पाहू:

वि जानीह्यार्यान्ये च दस्यवो बर्हिष्मते रन्धया शासदव्रतान् ।

शाकी भव यजमानस्य चोदिता विश्वेत्ता ते सधमादेषु चाकन ॥

ऋग्वेद १.५१.८॥

अर्थ :

“हे इंद्रा, तू आमच्यातल्या आर्यांना जाण आणि दस्यूंनाही जाण. जे आपल्या व्रतापासून ढळलेले आहेत, त्यांना तू वश करून कठोर दंड दे. हे इंद्रा, आमची अशी इच्छा आहे की, तू अधिक सामर्थ्यवान हो आणि यज्ञाच्या कर्त्या यजमानाला योग्य ती प्रेरणा दे”. या मंत्रात इंद्राला एक प्रार्थना केली आहे. त्यात ‘आर्य’ आणि ‘दस्यु’ असे दोन शब्दप्रयोग आलेले दिसतात. त्याचा आपल्या भाष्यकारांनी जो अर्थ केलेला आहे, तो देखील पाहूया. ऋग्वेदाचे प्राचीन भाष्यकार सायणाचार्य (इ. सनाचे १४वे शतक) यांनी दिलेल्या अर्थानुसार “हे इन्द्र, त्वं आर्यान् विदुष: अनुष्ठातॄन् वि जानीहि, विशेषेण बुद्ध्यस्व, ये च दस्यव: तेषामनुष्ठातॄणामुपक्षपयितार: शत्रव: तानपि वि जानीहि”, अर्थात “हे इंद्रा, जे ‘आर्य’ म्हणजे विद्वान (यज्ञ)कर्ते आहेत, त्यांना तू जाण, आणि जे ‘दस्यू’ म्हणजे त्या ‘आर्यांना’ त्रास देणारे त्यांचे शत्रू आहेत, त्यांनाही जाण”. इथे सायणाचार्यांनी ‘आर्य’ शब्दाचा अर्थ ‘विद्वान यज्ञकर्ते’ असा केला आहे आणि ‘दस्यु’ शब्दाचा अर्थ ‘त्रासदायक शत्रू’ असा केला आहे. हे दोन्ही शब्द इथे कोणत्या अंगाने ‘वंशवाचक’ दिसतात?

ऋग्वेदाचे दुसरे एक भाष्यकार स्वामी दयानंद सरस्वती (इ. सनाचे १९वे शतक) याच मंत्राच्या भाष्यात म्हणतात, “आर्यान् धार्मिकानाप्तान् विदुषः सर्वोपकारकान् मनुष्यान् ...... दस्यवः परपीडका मूर्खा धर्मरहिता दुष्टा मनुष्याः” अर्थात “आर्य म्हणजे धार्मिक प्रवृत्तीचे, विद्वान, सर्वांना उपकारक अशा व्यक्ती” आणि “दस्यू म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणारे, मूर्ख, अधार्मिक, दुष्ट अशा व्यक्ती”. इथे सुद्धा हे दोन्ही शब्द आपल्याला कोणत्या अंगाने ‘वंशवाचक’ वाटतात?

ऋग्वेदातील अजून एका ठिकाणी

न वीळवे नमते न स्थिराय न शर्धते दस्युजूताय स्तवान् ।

 

अज्रा इन्द्रस्य गिरयश्चिदृष्वा गम्भीरे चिद्भवति गाधमस्मै ॥

ऋग्वेद ६.२४.८॥

या मंत्रात पहिल्या ओळीत ‘दस्युजूताय’ असा शब्दप्रयोग आलेला आहे. त्यावर भाष्य करताना सायणाचार्य ‘दस्यु’ शब्दाचा ‘कर्मवर्जित’ म्हणजे ‘कामधंदे सोडून दिलेला – रिकामटेकडा’ असाही अर्थ सांगतात! “अशा रिकामटेकड्यांनी भरीस घातलेल्या (दस्युजूत) यजमानाने कितीही स्तुती केली, तरी इंद्रदेव त्याला बधत नाही”, असा अर्थ सायणाचार्य इथे सांगतात!!

सायणाचार्य असोत की दयानंद सरस्वती असोत, या दोन्ही भाष्यकारांनी ‘आर्य’ म्हणजे ‘इ. स. पूर्व १८०० मध्ये मध्य-आशियातून भारतात स्थलांतर करून आलेले आक्रमक उपरे लोक’ आणि ‘दस्यू’ म्हणजे ‘आर्यांच्या आक्रमणापूर्वी भारतात राहत असलेले मूलनिवासी लोक’ असा अर्थ सांगितलेला नाही. १९व्या शतकापर्यंत हजारो वर्षे ज्या शब्दांचे अर्थ इथे ‘गुणवाचक’ होते, ते १९व्या शतकाच्या उत्तरार्धापासून अचानकच ‘वंशवाचक’ आणि ‘जमातवाचक’ कसे काय बनले?

 

भरकटलेले तर्क :

‘आर्य’ शब्दाचे विविध अर्थ आपल्या संस्कृत कोशवाङ्मयात कसे दिलेले आहेत, ते आपण मागच्या लेखात पाहिलेच. पण यात सर विल्यम जोन्स आणि मॅक्स म्यूलर यांच्यासारख्या विद्वानांना मागच्या २ क्रमांकाच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे ‘गोरा’, ‘उंच’, ‘धिप्पाड’, ‘घाऱ्या डोळ्यांचा’, ‘धारदार / सरळ नाक असलेला’, ‘युद्धशास्त्रात प्रवीण’, ‘आक्रमक वृत्तीचा’ वगैरे वगैरे अर्थ कुठून दिसले असावेत, याचे ठोस उत्तर पाश्चात्त्य विद्वानांच्या प्रबंधांमधून आणि ग्रंथांमधून नेमकेपणाने मिळत नाही. पण एक भरकटलेले गृहीतक मात्र मागे पहिल्याच लेखात म्हटल्यानुसार मोर्टिमर व्हीलर (Mortimer Wheeler) यांनी मानलेले दिसते, त्यात याचे मूळ असावे - असे म्हणायला भरपूर वाव आहे. ते म्हणजे - ऋग्वेदातील ‘आर्यांची’ देवता ‘इंद्र’ याच्या वर्णनांवरून आणि सिंधू खोऱ्यातल्या उत्खननात सापडलेली हरप्पा, मोहेंजोदरो, वगैरे उद्ध्वस्त नगरे पाहून त्या इंद्रानेच ती फोडलेली आहेत, असे वाटते. तर मग इंद्र आणि इतर देवतांची ऋग्वेदातील अशी सगळी वर्णने ही ‘आर्य वंशा’चीच असणार – हे ते गृहीतक! आणि मग अशा विविध देवतांच्या वर्णनातूनच या संशोधकांनी ‘आर्यां’चेही वर्णन जुळवायला सुरुवात केली. कशी? यासाठी आपण उदाहरणार्थ म्हणून ऋग्वेदातला एक मंत्र पाहूया:

ये शुभ्रा घोरवर्पसः सुक्षत्रासो रिशादसः ।

मरुद्भिरग्न आ गहि ॥

ऋग्वेद १.१९.५॥

‘मेधातिथि काण्व’ ऋषींनी अग्निदेवतेचे आवाहन करताना अग्नी आणि मरुत् यांना उद्देशून केलेली स्तुतिपर प्रार्थना यामध्ये आहे. या मंत्राचा अर्थ आहे, “जे शुभ्र वर्णाचे (गोरे), उग्र देहाचे (उंच / धिप्पाड), उत्तम क्षत्रिय आणि शत्रूंना खाणारे - मारणारे (युद्धशास्त्रात प्रवीण / आक्रमक वृत्तीचे) आहेत, अशा मरुतांबरोबर हे अग्ने, तू इथे ये”. यातली मरुत् देवता ही ‘आर्य देवता’ असल्यामुळे तशाच वर्णनाचे ‘आर्य’ लोक सुद्धा असणार, असे या संशोधकांनी गृहीत धरून टाकले! विविध देवतांच्या रूपांची वर्णने असलेले असे अनेक मंत्र ऋग्वेदात अजूनही आहेत. अशा पद्धतीने युरोपीय विद्वानांनी असंख्य वेदमंत्रांवरून केलेली गृहीतके ठिकठिकाणी भरकटलेली दिसतात. त्यामुळे यावर आधारित संशोधने जरी भारतीय अभ्यासकांनी केली, तरी ती सुद्धा तितकीच भरकटलेली असणार, हे ओघानेच आले!

तर वाचकहो, अशा पद्धतीने या पाश्चात्त्य विद्वानांचे आर्य, दस्यु वगैरे शब्दांचे अर्थ त्यांच्या सोयीनुसार हवे तिकडे वळवण्याचे प्रयत्न पाहून असे वाटते, की हे लोक ‘वडाची साल पिंपळाला’ लावून त्यालाच ‘वटवृक्ष’ म्हणून सिद्ध करण्यामागे लागलेले आहेत, या असल्या बिनबुडाच्या तर्कांचेच ‘सिद्धांत’ बनवून जगात खपवत आहेत. सगळ्याच मनगढंत कहाण्या आणि सगळी फक्त मनोराज्येच!

 
(क्रमश:)

- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -

अर्थात भारतविद्याअथवा प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.