अष्टपैलू महागुरु

    दिनांक  21-Nov-2020 21:40:19
|

Sachin Pilgoankar_1 
 
 
बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेले आणि चित्रपटसृष्टीतील ज्यांचे स्थान आजही अढळ आहे, असे हरहुन्नरी अष्टपैलू कलावंत म्हणजेच महागुरू सचिन पिळगांवकर.
  
 
दिवस नेमका कुठला ते आठवत नाही. अभिनेते सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरिअम’ या उपक्रमावर आधारित पुस्तकाचे शब्दांकन मी करत होतो. त्यावेळी मला अनेक दिग्गज कलावंतांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. एका दिग्गज अभिनेत्याला फोन केला. त्यांनी मला वेळ दिली. मी शूटिंगच्या सेटवर पोहोचलो. कामातील निष्ठा, वेळेचे नियोजन व अभिनयाची प्रामाणिक पूजा करणारा हा कलावंत पाहून मन भरून गेले. लहानपणी ज्यांचे सिनेमे बघून मोठा झालो, त्या कलाकाराची मुलाखत घ्यायला मिळणार, ही फार मोठी गोष्ट होती. पण, प्रचंड दडपण आले होते. ते माझ्याशी कसे बोलतील? मला कसा प्रतिसाद देतील? अशी भीती मनात वाटत असतानाच, काही क्षणात यांनी ती भीती घालवली. मनमोकळ्यापणाने ते माझ्याशी गप्पा मारू लागले. तेव्हा एक एवढा मोठा कलावंत असूनही त्यांचे पाय जमिनीवर असल्याचे जाणवले. मी ज्यांच्याबद्दल एवढं सगळं सांगतोय ते अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक आणि निर्माता आहेत. १९६२ सालच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांचे वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटक्षेत्रात पदार्पण झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून सुमारे ६५ चित्रपटांत काम केले होते आणि ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘अँखियों के झरखों से’ आणि ‘नदियां के पार’ यांसारख्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून त्यांनी काम केले. ते सर्व चित्रपट यशस्वी झाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमातही चांगले काम केले आहे. ‘तू तू मैं मैं’ आणि ‘कडवी खट्टी मेथी’ यांसारख्या भारतीय टेलिव्हिजनवर यशस्वी, विनोदी कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन म्हणून काम करणारे चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू हरहुन्नरी कलावंत म्हणजेच महागुरू सचिन पिळगांवकर.
 
 
 
चेहऱ्यावर विलक्षण गोडवा, अभिनयातून डोकावणारा आत्मविश्वास आणि जोडीला असणारे भाबडेपण यांच्या बळावर बालवयातच चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘मास्टर सचिन’ची आजही चित्रपटसृष्टीतील ऊठबस तेवढीच आहे. सचिन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट, १९५७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील शरद पिळगांवकर हे छपाईचा व्यवसाय सांभाळत. हे पिळगांवकर कुटुंब गोव्याचे ‘राजाध्यक्ष’, पण मुंबईत आल्यावर ते ‘पिळगांवकर’ झाले, ते कायमचे. याच नावाने सचिन यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. वडील शरद पिळगांवकर नोकरदार, तर आई सुशीला गृहिणी. काही घरगुती कारणांमुळे दादर परिसरातील घराजवळच्या एका लॉजवर सचिन यांना काही दिवस राहावे लागले आणि लहान वयातच चित्रपटसृष्टीने त्यांना आपणहून आमंत्रण दिले. सूर्यकांत यांच्या सल्ल्यानुसार सचिन यांचे वडील त्यांना कोल्हापूरला चित्रपटात काम करण्यासाठी घेऊन गेले आणि वयाच्या चौथ्या वर्षी सचिन यांना ‘सूनबाई’ या चित्रपटात भूमिका मिळाली. पण, घरात चित्रपट जगताचा वारसा नसणाऱ्या, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, तसेच बालवयामुळे भांबावलेल्या सचिन यांना चित्रीकरणदरम्यान रडू कोसळले. त्यामुळे चित्रपटात काम न करताच त्यांना वडिलांसोबत मुंबईला परतावे लागले. लॉजवरून परत घरी राहायला आल्यावर मात्र बाबूजींच्या (सुधीर फडके यांच्या) रूपाने सचिन यांना पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीची कवाडे उघडली गेली आणि उपजतच असणाऱ्या नृत्याच्या आवडीने सचिन यांना या कवाडातून प्रवेश मिळाला. पण, त्यासाठी त्यांना राजाभाऊ परांजपे यांच्या परीक्षेला उतरावे लागले. २०० मुलांच्या ऑडिशनमधून निवडल्या गेलेल्या सचिन यांची ‘हा माझा मार्ग एकला’ मधील भूमिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली. या भूमिकेसाठी सचिन यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते वयाच्या सहाव्या वर्षीच स्वीकारण्याचे भाग्य लाभले होते. यानंतर सचिन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून ‘बायको माहेरी जाते’ (१९६३), ‘पाहू रे किती वाट’ (१९६३), ‘स्वयंवर झाले सीतेचे’ (१९६४), ‘पडछाया’ (१९६७), ‘मधुचंद्र’ (१९६७), ‘अन्नपूर्णा’ (१९६८), ‘नंदिनी’ (१९६९), ‘अजब तुझे सरकार’ (१९७१), ‘बाजीरावचा बेटा’ (१९७१) या चित्रपटांमधून कामे केलेली आहेत. लहानपणीच चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या सचिन यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले ते दादर इंग्लिश स्कूलमधून. यानंतर बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपले स्थान दृढ करण्यात व्यग्र असणाऱ्या सचिन यांना पुन्हा शिक्षणाकडे वळता आले नाही. पण, मुख्याध्यापकांच्या आग्रहाखातर त्यांनी दहावीची परीक्षा बाहेरून दिली आणि ते मॅट्रिक झाले.
 
 
 
घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांनी बालवयातच घरची सर्व आर्थिक जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेतली आणि चित्रपटसृष्टीत प्रस्थापित होत होत आपली अभिनयातील कारकिर्द घडवली. याच दरम्यान त्यांनी बालकलाकार म्हणून रंगमंचावरही पाऊल ठेवले. ‘अपराध मीच केला’ या नाटकात संजूबाळाची भूमिका सचिन यांनी केली होती. त्यानंतर त्यांना ‘म्हैस येता माझ्या घरा’, ‘शिकार’ या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण, खऱ्या अर्थाने बालकलाकार म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला, तो हिंदी चित्रपटसृष्टीत. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणाऱ्या सचिन यांना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला तो ‘झिंबो का बेटा’ (१९६६) या चित्रपटातून. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाल्यावर सचिन यांनी ‘ज्वेल थीफ’ (१९६७), ‘मंझली दीदी’ (१९६७), ‘ब्रह्मचारी’ (१९६८), ‘दुनिया’ (१९६८), ‘दिल और मुहब्बत’ (१९६८), ‘चंदा और बिजली’ (१९६९), ‘वारिस’ (१९६९), ‘प्रेमपुजारी’ (१९७०), ‘बचपन’ (१९७०), ‘हिम्मत’ (१९७०), ‘सफर’ (१९७०), ‘जाने अनजाने’ (१९७१), ‘मेला’ (१९७१) आदी चित्रपटांमध्ये कामे करून हिंदीतील आपली अभिनय कारकिर्द सातत्याने यशस्वी ठेवली. हिंदीतील यशस्वी कारकिर्द घडविताना त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध आला तो अभावानेच. किशोरवयातही त्यांना पहिली संधी दिली, ती हिंदी चित्रपटसृष्टीनेच. ‘शोले’ या हिंदीतील सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटाने, तर त्यांच्यातील अभिनेता अधिक सजग झाला आणि वयात आल्यावर या बालकलाकाराला ‘नायक’ केले, तेही हिंदीतील ‘गीत गाता चल’ (१९७५) या चित्रपटातील श्यामच्या व्यक्तिरेखेने. या चित्रपटात सारिका त्यांची नायिका होती. त्यानंतर त्यांनी अनेकानेक हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या असल्या, तरी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली सगळ्यात लहान भावाची, सनीची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.
 
 
 
आपल्या वडिलांची निर्मिती असलेल्या ‘मायबाप’ (१९८२) या मराठी चित्रपटापासून सचिन यांनी दिग्दर्शनालाही सुरुवात केली आणि ते पुन्हा नव्या दमाने, उत्साहाने मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. मराठी चित्रपटसृष्टीशी नाळ जोडण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वत:च दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये स्वत: अभिनय करण्याची नवी पद्धतही रूढ केली. म्हणूनच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (१९८४), ‘गंमत जंमत’ (१९८७), ‘माझा पती करोडपती’ (१९८८), ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८), ‘भुताचा भाऊ’ (१९८९), ‘आत्मविश्वास’ (१९८९), ‘एकापेक्षा एक’ (१९९०), ‘आमच्यासारखे आम्हीच’ (१९९०), ‘आयत्या घरात घरोबा’ (१९९१), ‘नवरा माझा नवसाचा’ (२००५), ‘आम्ही सातपुते’ (२००८), ‘आयडियाची कल्पना’ (२०१०), ‘एकुलती एक’ (२०१३) आदी चित्रपटांमधून त्यांचा अभिनयही पाहायला मिळतो. स्वत:च्या दिग्दर्शनाखाली केलेल्या कामांमुळे त्यांच्या अभिनयातील नेमकेपणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. विनोदी चित्रपटांमधून अशोक सराफ, निवेदिता जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन पिळगांवकर अशी एक टीमच तयार झाली. या टीमने अभिनय केलेल्या आणि सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला खुमासदार विनोदाची देणगीच दिली. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट दि. २३ सप्टेंबर, १९८८ रोजी प्रदर्शित झाला होता. तरीही त्या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. बहुतेक जणांचा तो अख्खा चित्रपट पाठच असेल. आजच्या सोशल मीडियाच्या जगात त्यावरचे मीम्सही अनेकदा व्हायरल होतात. प्रेक्षकांना असे हसविण्यात सचिन यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची हातोटी असलेली दिसते. आपल्या चित्रपटाच्या घडणीत सर्व पातळ्यांवर कार्यरत असणाऱ्या सचिन यांनी छोट्या पडद्यावरही आपली नाममुद्रा तितक्याच ताकदीने उमटविलेली आहे, म्हणूनच त्यांच्या ‘तू तू मैं मैं’, ‘हद कर दी आपने’, ‘तेरे घरच्या समोर’, ‘कुणासाठी कुणीतरी’, ‘तू तोता मैं मैना’ आदी मालिका लोकप्रिय झाल्या, तर त्यांनी निवेदक, परीक्षक म्हणून रिअ‍ॅलिटी शोजमध्ये निभाविलेल्या भूमिकाही महत्त्वपूर्ण होत्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सोहळा’, ‘रणांगण’, ‘शर्यत’ व ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांमधील त्यांनी केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. अभिनय बेर्डे याला घेऊन नुकताच त्यांनी ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपटदेखील दिग्दर्शित केला होता.
 
 
 
सचिन यांनी सुप्रिया सबनीस या अभिनेत्रीशी विवाह केला, त्यांना श्रिया नावाची एक मुलगी असून, तीही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. सचिन यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, नृत्यदिग्दर्शक, संकलक, निर्माता, गायक, संगीतकार या चित्रपटसृष्टीतील भूमिका जितक्या ताकदीने पार पाडल्या, तितक्याच ताकदीने व्यक्तिगत जीवनातील मुलगा, पती आणि पिता या भूमिकाही निभावलेल्या दिसतात. बालकलाकार म्हणून नावारूपाला आलेल्या या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे चित्रपटसृष्टीतील स्थान आजही अढळ असलेले दिसते. मुख्य म्हणजे, मराठीप्रमाणेच हिंदी तसेच काही भोजपुरी चित्रपटांतूनही सचिन नायक म्हणून चमकले आहेत.त्यांनी ‘नच बलिये’ या रिअ‍ॅलिटी शोचे विजेतेपद मिळविले. सतत ५० वर्षे रूपेरी पडद्यावर टिकून राहणे ही गोष्ट सोपी नाही. कालचे ‘स्टार’ इथे आज ‘एक्स्ट्रा’ म्हणून वावरतात. ‘हिरो’चा एका क्षणात ‘झिरो’ बनतो. या पार्श्वभूमीवर सचिन यांचे कर्तृत्व प्रशंसनीय आहे. त्यांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. आपल्या अभिनयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ‘हाच माझा मार्ग’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. सचिन पिळगांवकर एक असा अभिनेता ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा मान त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आणखी उंचावला. मराठी चित्रपटसृष्टीला सोनेरी दिवस आणणारा असा कलाकार आहे. ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांना चांगले दिवस आणले.अशा अष्टपैलू कलावंताला मनापासून सलाम आणि पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.
 
- आशिष निनगुरकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.