कोरोना आणि श्रद्धा-अंधश्रद्धा

    09-Oct-2020   
Total Views | 174

covid 19 _1  H


कोरोना सैतान आहे. त्यामुळे सैतानाला संपविण्यासाठी येशूला शरण जायला हवे, असे तिथल्या काही चर्च व्यवस्थेने जाहीर केले. दुसरीकडे झिंबाब्वे प्रॉफेट इम्यॅनुअल माकनदिवा यांनी जाहीर केले की, “कोरोनाने तुम्ही मरणार नाही, कारण देवाचा दूत तुमच्या सोबत आहे.” टांझानियामध्ये तर ‘लॉकडाऊन’ काळात मशिदी आणि चर्च खुले होते.


कोरोनाबाबत जगभरात विविध श्रद्धा-अंधश्रद्धांचा उदय झाला. टांझानिया देशात सत्ताधार्‍यांनी सांगितले की, देशाला संपविण्यासाठी सैतानाने पाठवलेले विषाणू आहेत. कोरोना सैतान आहे. त्यामुळे सैतानाला संपविण्यासाठी येशूला शरण जायला हवे, असे तिथल्या काही चर्च व्यवस्थेने जाहीर केले. दुसरीकडे झिंबाब्वे प्रॉफेट इम्यॅनुअल माकनदिवा यांनी जाहीर केले की, “कोरोनाने तुम्ही मरणार नाही, कारण देवाचा दूत तुमच्या सोबत आहे.” टांझानियामध्ये तर ‘लॉकडाऊन’ काळात मशिदी आणि चर्च खुले होते. कारण, तिथल्या सत्ताधार्‍यांचेच म्हणणे होते की, कोरोना सैतान आहे, सैतानाला मारण्यासाठी अल्लाचे आणि येशूचे घर बंद असून कसे चालेल. अर्थात, हे जगभरात थोड्याबहुत स्वरूपात सुरूच होते. कोरोनाबद्दल धर्मग्रंथात काही लिहिलेले आहेे का, याची चाचपणी, अभ्यासही काही धर्मातील लोकांनी केला. त्यानुसार कुराणामध्ये कोरोनाबद्दल लिहिलेले आहे का, याचा शोध घेताना काही मुस्लीम धर्मविद्वानांनी असेही सांगितले की, अमुक एका पानावर अमुक एका ओळीमध्ये कोरोनाचा उल्लेख पुसटसा आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीएए’विरोधात आंदोलन करणार्‍या भारतातील एका मुस्लीम महिलेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ती म्हणाली होती, “कोरोना आमच्या ‘कुराणा’तून निघाला आहे, तो आम्हाला काही करणार नाही.” पाकिस्तान आणि इतर मुस्लीम राष्ट्रांतील काही मुस्लिमांची श्रद्धा होती की, कोरोना जगाला मुस्लीम धर्मकांड शिकविण्यासाठी आला आहे. तसेच आम्ही मांस आणि शक्तिशाली अन्न खातो, आमची प्रतिकारशक्ती चांगलीच आहे, त्यामुळे आम्हाला कोरोना होणार नाही. याच काळात तबलगींचे धर्मगुरू मौलाना साद यांनी तर श्रद्धाळूंना सांगितले की, “लोक एकत्र येऊन मरण्यासाठी मशिदी इतकी चांगली जागा नाही.” याच काळात काही ख्रिस्ती धर्ममार्तंडांनीही ‘बायबल’मध्ये कोरोनाबद्दल लिहून ठेवले होते, असे सांगणे सुरू केले. याच काळात पोप यांनी जाहीर केले की, “दया, करुणा ही येशूची शिकवण आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची प्रेमाने गळाभेट घ्या.” कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शारीरिक दुरावा अनिवार्य असतो. मात्र, पोप यांनी तर कोरोना रुग्णांची गळाभेट घ्यायला लावली. दुसरीकडे येशू विरुद्ध सैतान कोरोना हे गृहितक कायम होतेच आणि आहेच; अर्थात मनाची शक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक श्रद्धा योग्यच आहे.

आशिया खंडातही कोरोनासंदर्भात अनेक श्रद्धा, अंधश्रद्धांचा कहर माजला. कोरोना जन्मदाता चीनमध्येही या काळात कोरोनाबद्दल खूप सार्‍या श्रद्धा-अंधश्रद्धांचे पेव तयार झाले. वटवाघुळामुळे कोरोना जन्माला आला, तर वटवाघुळांचा नायनाट करणे, इतकेच नव्हे तर चीनमध्ये सापाला खूपच औषधी मानले जाते, तर त्या सापापासून बनवलेले सूप पिणे, जुन्या चिनी संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या आजारांबद्दल काय लिहिले आहे यावरून औषधे बनवणे सुरू झालेे, तर कंबोडियाने कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या ‘खमेर’ या जुन्या औषध पद्धतीचा उपयोग सुरू केला. आपल्या भारतातही आयुर्वेदाचा वापर नव्याने सुरू झाला आणि कोरोनावर त्याचा यशस्वी प्रभावही झाला. असो, तर या सगळ्या औषधी व्यवस्थांमध्ये बदल झाला आणि तोही श्रद्धाबदलच होता. कोरोना काळात आणखी एक अंधश्रद्धा बळावली. ती म्हणजे सॅनिटायझर किंवा तत्सम प्रकारचे पेय प्यायल्याने शरीरात गेलेला कोरोना मरेल. त्यामुळेच की काय, जगभरात शेकडो लोकांनी वॉर्निश, विषारी द्रव पदार्थ प्राशन केले. हेतू हाच की हे पेय प्यायल्याने शरीरात चुकून माकून गेलेला कोरोना मरेल. पण, तसे झाले नाही, उलट असे विषारी द्रव पिणारे लोक हकनाक मृत्युमुखी पडले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातही बिहार वगैरे भागात कोरोनाची ‘कोरोना माता’ म्हणून पूजा केली. प्रसाद देऊन तिला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्र्रमाणे पूर्वी मरीआईचा गाडा वेशीबाहेर सोडून येत, त्याचप्रमाणे कोरोनाआईची वाजत-गाजत पूजा करून तिला गावाबाहेर टाकण्याचा प्रयत्नही झाला. थोडक्यात जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धांचे जाळे विणले गेले. पण, मानवी मनाचा आणि त्याच्या जगण्याचा विचार करता जगाच्या पाठीवर हाहाकार माजविणार्‍या कोरोनाच्या बाबतीत या श्रद्धा-अंधश्रद्धा निर्माण होणारच...!

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121