गूढता की बघणार्‍यांची मूढता?

    दिनांक  24-Oct-2020 21:24:26   
|

RSS_1  H x W: 0राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज विजयादशमीला ९५वर्षे पूर्ण झाली, तर २०२५साली १००वर्षे पूर्ण होतील. या १००वर्षांत संघ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न देशातील विद्वानांनी केलेला नाही, याउलट संघाविरुद्ध बदनामीची मोहीम यातील ९०टक्के लोकांनी अत्यंत प्रामाणिकपणे चालविली. त्यामुळे संघाचे काडीचेही नुकसान झालेले नाही. बदनामी करणार्‍यांची बदनामी भावी काळातील इतिहासाच्या पानांवर पुढच्या पिढीला वाचायला मिळेल.तुकारामांचा छळ करणार्‍यांकडे समाज घृणेच्या भावनेने पाहतो. ज्ञानदेवांचा छळ करणार्‍यांविषयी समाजात संतापाची भावना असते. हीच भावना संघाची बदनामी करणार्‍या लोकांविषयी येणार्‍या पिढीच्या मनात राहील. या ‘बदनामी गँग’ने संघाविषयी भ्रम निर्माण करणारे काही विषय समाजात पेरले आहेत. त्यातील एक विषय संघ ही गूढ संघटना आहे आणि तिचे कार्य गुप्तरूपाने चालते. संघाचा दाखवायचा एक चेहरा आहे आणि त्यांचे अनेक छुपे अजेंडे आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे सगळे जीवन (आज माझे वय ७५आहे) संघात गेले. संघाची गूढता आणि संघाचा छुपा अजेंडा मला कधीच समजला नाही आणि दिसलादेखील नाही. संघात असलेला मी अज्ञानी आणि संघाबाहेर असलेले सज्ञानी, असा हा विचित्र न्याय आहे.संघ ही गूढवादी संघटना वाटते. कारण, संघात कधी भांडणे होत नाहीत. संघाचे पदाधिकारी एकमेकांविरूद्ध पत्रके काढीत नाहीत. माझ्यावर अन्याय झाला, मला पद मिळाले नाही, म्हणून मी संघ सोडतो आहे, असे संघातील कुणी गेल्या ९५ वर्षांत म्हटलेले नाही. लहान-मोठ्या संघटनांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत प्रत्येक संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते भांडणे करतात. काहीजण मारामार्‍या करतात. एकमेकांचे कपडे फाडतात. असा तमाशा झाला की, या विद्वानांना वाटते की काय लोकशाही आहे! काय विचार स्वातंत्र्य आहे! काय अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे! संघात असे काही घडत नाही, म्हणून संघ गूढवादी संघटना आहे.

अन्य संघटनांतील नेते एकमेकांविरूद्ध पत्रके काढतात. कमलनाथ काही बोलले, त्यावर राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. कमलनाथ म्हणतात की, ‘मी माफी मागणार नाही.’ हा विषय मोठ्या बातमीचा भाग झाला. संघातील केंद्रीय अधिकारी आणि प्रांतीय अधिकारी असे एकमेकांविरुद्ध बोलत नाहीत. सार्वजनिक वटवट करीत नाहीत. म्हणून या लोकांना संघ एक गूढवादी संघटना वाटते. त्यांच्या बुद्धीची मोजपट्टी आपण सर्व जणांनी करावी. या लोकांनी असे सांगायला सुरुवात केली होती की, संघाला दिल्लीची सत्ता बळकवायची आहे. तो त्यांचा ‘हिडन अजेंडा’ (गुप्त विषयसूची) आहे. त्यासाठी त्यांनी आपला धार्मिक आधार पक्का केला. वनवासी क्षेत्रात त्यांनी काम सुरू केले. छोट्या-मोठ्या संघटना उभ्या केल्या. हे सर्व सत्ताप्राप्तीसाठी केले. प्रथम अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. या आरोपातील हवा आता निघून गेली आहे. सत्तास्थानी सरसंघचालक नाहीत, सरकार्यवाह नाहीत, कुठलाही संघचालक नाही, संघाचा कुठलाही पदाधिकारी नाही. मग ही काय भानगड आहे, हे आरोप करणार्‍या विद्वानांना, राजनेत्यांना लक्षातच येत नाही. बिचारे विद्वतेच्या भाराने इतके वाकले आहेत की, त्यांना काही दिसेनासे झाले आहे.

संघाचा छुपा अजेंडा राज्यघटना बदलण्याचा आहे, असा आरोप त्यांनी सुरू केला. मध्यंतरी ‘संविधान बचाव रॅली’चा पूर आला. पुरातून खूप पाणी वाहून गेले. आता संघकार्यकर्ते संविधान अभ्यास वर्ग घेतात. पुढच्या दोन वर्षांत अतिशय उत्तम प्रकारे संविधान मांडणारे तीन-चारशे वक्ते महाराष्ट्रात उभे राहतील. ते संविधानशास्त्राचा खोलात जाऊन अभ्यास करतात. उत्तम लिहितात आणि उत्तम बोलतात. मीच संविधानावर तीन पुस्तके लिहिली आहेत. आणखी तीन पुस्तके जानेवारीत प्रकाशित होतील. यानंतर ‘संविधान बदलण्याचा छुपा अजेंडा’ बोलणारे ‘कहाँ पर छुपे जाएंगे, पता नही चलेगा.’ पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सा.‘विवेक’च्या ‘राम मंदिर ते राष्ट्रमंदिर’ या ग्रंथासाठी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी गौरवाने आणि श्रद्धेने तीन वेळा संविधानाचा उल्लेख केला. मी त्यांना माझी तीन पुस्तके भेट दिली. तेव्हा त्यांनी मला विचारले की, “अजून किती पुस्तके लिहिणार आहात?” मी त्यांना म्हणालो की, “आधुनिक संविधानाची संकल्पना ज्या देशात विकसित झाली, त्यांच्या संविधानाच्या निर्मितीवर मी लिहिणार आहे, त्याशिवाय आपले संविधान नीट समजत नाही.” ‘असा आमचा संविधानाचा छुपा अजेंडा आहे.’ खरं म्हणजे, संघ ही एक पारिवारिक भाव जगणारी संघटना आहे. संघात कुणी नेता नसतो. सगळेच स्वयंसेवक असतात. संघटनेच्या गरजेनुसार अधिकारी असतात. सर्वोच्च स्थान सरसंघचालकांचे असते. नंतर सरकार्यवाह, सहसरकार्यवाह, क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह, प्रांत संघचालक, प्रांत कार्यवाह अशी शेवटच्या घटकापर्यंत अधिकार्‍यांची एक रचना असते. संघाचा अधिकारी त्या त्या क्षेत्राचा नेता नसतो. तो परिवार प्रमुख असतो. सर्वांना बरोबर घेऊन काम करणे ही त्याची जबाबदारी असते. असा संघाचा पदाधिकारी सामूहिक चिंतनाने सहमती निर्माण करून, निर्णय करीत असतो. निर्णय एका व्यक्तीचा नसतो. निर्णय संघाचा असतो. एका व्यक्तीच्या नावाने निर्णयाची ग्वाही फिरविली जात नाही. ही पद्धती केंद्रापासून ते तालुका पातळीपर्यंत अमलात आणली जाते. त्यामुळे सर्वजण एकदिलाने, एकमताने, एक भावनेने, एकमय होऊन काम करीत राहतात. मतभेदाला कोणतीच जागा राहत नाही.वेगवेगळया संघटनांमध्ये मतभेद होतात, फाटाफूट होते, याचे कारण असे की, व्यक्तीचे अहंकार कामापेक्षा मोठे होतात. ‘मी मोठा की तू मोठा, माझे नाव मोठे की तुझे नाव मोठे, मला विचारल्याशिवाय ही गोष्ट कुणी ठरविली, माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे,’ अशी भावना एका संघटनेतील अनेकांच्या मनात जेव्हा निर्माण होते, तेव्हा फाटाफूटीला काही पर्याय नसतो. संघटना तुटते, तिचे दोन, चार, दहा तुकडे होतात. प्रत्येक नेत्याचे आपले एक बेट तयार होते. नंतर मग ऐक्य करण्याच्या वाटाघाटी सुरू होतात. नेता कोण, या खडकावर ऐक्याचे जहाज आपटते आणि बुडते. संघामध्ये अहंकाराला जागा नाही. जो अहंकारी, तो काही कामाचा नाही. संघरचनेतून तो आपोआप दूर होतो, त्याला बाहेर घालवावे लागत नाही. शरीर जसे शरीराला अपायकारक असलेले घटक आपणहून बाहेर फेकून देते, तशी ही संघरचना आहे. फाटाफुटीचे दुसरे कारण वैचारिक मतभेदाचे असते. समाजवाद की भांडवलवाद की मार्क्सवाद की नक्षलवाद, हा भांडणाचा विषय होतो. भांडण करणारे आपल्या मतांवर ठाम राहतात आणि वेगळी चूल मांडतात. त्याला आमचे विद्ववान वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असे म्हणतात. काही प्रमाणात ते खरे मानले तरी ते पूर्ण सत्य नसते. विचाराचा आधार घेणार्‍याच्या मनात अधिकारशाही, वर्चस्वाची भावना असते. स्टॅलिन आणि माओ याची ही दोन उदाहरणे आहेत. संघात वैचारिक कलह होऊ शकत नाहीत. वैचारिक कलहासाठी विचारांचा एक ग्रंथ असावा लागतो. संघाचा असला कसलाही ग्रंथ नाही. संघाचा विचार एक वाक्याचा आहे, ‘हे एक राष्ट्र आहे, हे हिंदुराष्ट्र आहे, हिंदू समाज हा या राष्ट्राचा पुत्ररूप समाज आहे.’ या वाक्यात संघविचार संपतो आणि मग कार्यक्रम सुरू होतो, हिंदू समाजसंघटनेचा. संघाला हिंदुराष्ट्र निर्माण करायचे नाही, ते अनादी काळापासून अस्तित्वात आहे. त्याची ओळख हिंदूंना करून द्यायची आहे. एका वाक्याचा हा संघविचार, राष्ट्र म्हणजे काय हिंदू म्हणजे काय, हिंदूंचा धर्म म्हणजे काय, हिंदूंची संस्कृती म्हणजे काय, हिंदूंची समाजरचना म्हणजे काय, हिंदूंचे तत्त्वज्ञान कोणते, अशा असंख्य प्रकारे सांगावा लागतो.संघाचा अधिकृत ग्रंथ नसल्यामुळे संघात कुणी विचारवंत नाहीत, प्रज्ञावंत नाहीत, मूलभूत चिंतन करणारे नाहीत, असा आमच्या विद्वानांचा शोध आहे. संघाला काहीही समजत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळ आहे, पण ते बिनडोक आहेत, असा गोड समज विद्वानांचा आहे. त्यांना त्यांच्या गोडव्यात आपण राहू द्यावे. तसेच अनेकांना वाटते की, संघाला इस्लाम समजलेलाच नाही. मुसलमान समाज काय आहे, हेदेखील समजलेले नाही आणि त्यांना असे वाटते की, संघाचे सरसंघचालक बेताल बडबड करतात. मुसलमान आपल्यालाच समजलेला आहे, असे मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात आहे, चांगली गोष्ट आहे. जर काही लोकांचा तसा प्रामाणिक समज असेल, तर त्याला आपण काही करू शकत नाही. त्यांनाही त्यांच्या आनंदात जगू द्यावे. संघ ही प्रज्ञावंतांची खाण आहे. मूलगामी विचार करणार्‍यांचा एक जबरदस्त संच आहे. त्यांना आपल्या प्रज्ञेचे प्रदर्शन करावे असे कधी वाटत नाही. आपल्या कर्तृत्वाचा डंका पिटावा असे वाटत नाही. आपल्या कार्यांचे गोडवे गायले जावे, असे त्यांना वाटत नाही. विवेकानंद रूग्णालयाचे डॉ. अशोकराव कुकडे आणि डॉ. हेडगेवार रूग्णालयाचे डॉ. अनंत पंढरे ही दोन नावे महाराष्ट्रातील वैद्यकीय सेवाक्षेत्रातील हिमालयाची शिखरे ठरावीत, अशी आहेत. हा लेख त्यांनी वाचला आणि आपल्या नावाचा उल्लेख केला आहे असे वाचले, तर त्यांना ते आवडणार नाही. मी हे त्यांच्यासाठी लिहिले नसून आमच्या संघ टीकाकारांसाठी लिहिले आहे. दीनदयाळजींच्या प्रज्ञेतून जनसंघ आणि आजचा भाजप उभा राहिला. दत्तोपंत ठेंगडींच्या प्रज्ञेतून क्रमांक एकची कामगार संघटना उभी राहिली. एकनाथजी रानडेंच्या कर्मयोगातून विवेकानंद शिलास्मारक उभे राहिले. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रज्ञेतून उद्या होणारे राम मंदिर उभे राहणार आहे. या प्रज्ञेचे ज्यांना दर्शन होत नाही, त्यांचा दृष्टिदोष आपण दूर करू शकत नाही.

शेवटी प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, इतिहासाच्या पानावर कलुषित लोक म्हणून आपली नोंद व्हावी की सत्याचा शोध घेणारे म्हणून आपली नोंद व्हावी हे ज्याचे त्याने ठरवावे. संघाची निंदा केल्यामुळे संघकामावर काही परिणाम होत नाही आणि संघाची स्तुती केल्यामुळे संघकाम वाढत नाही. संघ स्वयंसेवकांच्या कष्टाने, त्यागाने, समर्पणाने, संघ वाढत असतो. सा. ‘विवेक’ हे संघसृष्टीतील साप्ताहिक आहे. जवळजवळ सहा महिने त्यांची आर्थिक उलाढाल बंद होती. पण, पुढील दोन महिन्यांत सा. ‘विवेक’च्या सदस्यांनी चमत्कार वाटावा असे काम करून सहा महिन्यांचा घाटा भरून काढला, ही संघ समूहाची ताकद आहे. अशा स्वयंसेवकांची संख्या जेवढ्या प्रमाणात वाढेल, तेवढा संघ वाढेल आणि संघाच्या वाढीची ही गती रोखण्याचे सामर्थ्य कोणाच्याही लेखणीत नाही, वाणीत नाही. संघ आपल्या गतीने वाढणार, आपले कार्य यशस्वी करणार, याचे कारण ही ईश्वरीय योजना आहे. संघकाम हे परमेश्वरी काम आहे, हाच भाव सर्व स्वयंसेवकांच्या मनात असतो आणि ती संघाची शक्ती आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.