राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-४

    दिनांक  31-Aug-2019 19:45:12महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यास करताना भक्तीभाव
, आदर, द्वेष या भावना बाजूला सारून लेखन करावे लागते. ऐतिहसिक पुराव्यांच्या छाननीतून समोर आलेले ऐतिहासिक निष्कर्ष व्यक्तिगत मते बाजूला ठेवून स्वीकारावी लागतात. तसे न केल्यास महापुरुषांच्या कार्याबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि यातूनच नवे वाद निर्माण होण्याचा संभव असतो. टिळकांच्या विचारांचा मागोवा घेणारे लेखन आजवर अनेकदा झाले आहे. तरीही व्यक्तिगत अभिनिवेश बाजूला सारून टिळक चरित्र लिहिण्याचे प्रयत्न फार क्वचित दिसून येतात हेही तितकेच खरे. म्हणूनच कोल्हापूर प्रकरणाचा विचार करताना आजवर फारसे समोर आले नाहीत असे काही पैलू, ऐतिहासिक पुराव्यांच्या आधाराने समोर आणणे गरजेचे आहे.


टिळक
-आगरकरांच्या शिक्षेनंतर त्यांची झालेली सुटका आणि तत्पूर्वी त्यांच्या सुटकेसाठी जनमानसातून झालेले प्रयत्न याबद्दलची काही मतमतांतरे दिसून येतात. कधीकधी काही आक्षेपही घेतले जातात. मतमतांचा हा गलबला कितीही मोठा असला तरी अस्सल कागदपत्रांच्या, पुराव्यांच्या आणि ऐतिहासिक नोंदींच्या आधारे टिळकचरित्राचे अवलोकन करणे हा आपला संकल्प आहे. त्यानुसार या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हाती नेमके काय गवसते हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूर खटल्याचा निकाल लागला हे कळवताना १८ जुलै, १८८२ च्या ‘केसरी’च्या अंकात नोंद आहे. ‘काल रात्री तारेतून जी बातमी आली तीवरून असे कळते की ‘मराठ्या’चे एडिटर व ‘केसरी’चे एडिटर या दोघांस कोल्हापूर खटल्यात चार-चार महिन्यांची शिक्षा दिली व बखले यासही चार महिन्याची शिक्षा मिळाली नाना भिडे व वामन गोविंद रानडे यांस दोन वर्ष कैद व एकेक हजार रुपये दंड प्रत्येकास झाला. ‘केसरी’ने लिहिलेले पुढील वाक्य खूप काही सांगून जाते. ‘केसरी’ म्हणतो, या खटल्यात जो न्याय झाला त्याचे स्वरूप आजच वर्णन करता येत नाही. परंतु, ते कधीतरी लोकांपुढे येईल यात शंका नाही.


फक्त
‘केसरी’लाच ही शिक्षा अन्यायकारक वाटत होती का? याचे उत्तर नकारार्थी सापडते. तत्कालीन बहुतेक वृत्तपत्रे उदा. ‘ज्ञानप्रकाश,’ ‘इंदूप्रकाश,’ ‘इंडियन स्पेक्टेटर,’ ‘जगदादर्ष,’ ‘भडोच समाचार,’ ‘गुजराती,’ ‘जामे जमशेद,’ ‘रास्त गोफ्तार’ ही वृत्तपत्रेसुद्धा सांगत होती की, टिळक-आगरकरांना केवळ समज देऊन सोडायला हवे होते. त्यांना शिक्षा देण्याची काहीच जरुरी नाही. आपल्यावर खटला भरला जाईल व नंतर कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल, याची काहीशी कल्पना ‘केसरी’कारांना आलेली दिसते. लोकांना मदतीसाठी आवाहन करणारी काही वाक्ये २४ जानेवारीच्या ‘केसरी’त आगरकर लिहितात, ‘आमच्या लेखांची सत्यता कसास लागण्याचा समय आला आहे. आजपर्यंत आम्ही जे लिहिले त्यापैकी प्रत्येक अक्षराला सबळ पुरावा आहे, पण तो बारिस्टरमुखाने न्यायाधीशासमोर आणण्यास विलक्षण खर्च लागणार आहे. याप्रसंगी सर्वांनी द्रव्यद्वारा होईल तितकी मदत केली पाहिजे.’ आगरकरांनी केलेल्या या आवाहनाला लोकांतून अमाप प्रतिसाद लाभला, असे दिसते. आपल्या हिमतीवर कोल्हापूरच्या राजाची बाजू लढवणार्‍या या तरुण संपादकांच्या बचावासाठी अनेकांनी जीवाचे रान केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या सुटकेसाठी सर्व स्तरातील लोकांचा सहभाग नव्हता, त्यांचे सहकारी या कार्यात मागे राहिले असे कुतर्क काढणारे काही महाभाग आजही आजूबाजूला दिसतात. त्यामुळे टिळक-आगरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍यांमध्ये कोण कोण होते, याचा तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे आहे असे वाटते.


रावसाहेब मांडलिक आणि प्रि
. वुड्सवर्थ यांनी टिळक-आगरकरांच्या सुटकेसाठी जेम्स फर्ग्युसन यांच्याकडे पीटीशन दाखल करून टिळक-आगरकरांची शिक्षा माफ व्हावी, अशी विनंती केली होती. माधवराव नामजोशी यांनी टिळक-आगरकरांवरील या खटल्यासाठी निधी गोळा केला. नामजोशींनी खटल्याच्या खर्चासाठी निधी गोळा करताना जे जे साधन दिसले व सुचले त्याची कास धरली, असे वर्णन फाटकांनी टिळकचरित्रात केले आहे. नामजोशी यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यूनंतर टिळक मदत पाठवत असत. नामजोशी व बडोद्याचे ‘नाट्यार्णव’कर्ते शंकर मोरो रानडे यांनी खटल्यासाठी निधी गोळा करताना लोकांमध्ये पेटी फिरवून ४०० रुपये गोळा केले, असाही उल्लेख सापडतो. नाटकमंडळ्यांना आपापल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग करायला सांगून रानडे यांनी खटल्यासाठी पैसे मिळवले. पुढे रानडे-टिळक संबंध जवळचे होते असेच आढळते. अगदी रानड्यांच्या मृत्यूनंतरही टिळक त्यांच्या कुटुंबाला पैसे पुरवत असे उल्लेख मंडालेहून लिहिलेल्या पत्रात सापडतात. टिळक-आगरकरांच्या कार्याने प्रभावित झालेले मुंबईचे अण्णासाहेब नेने स्वतः जामीन राहायला पुढे झाले, असेही टिळकांच्या काही चरित्रकारांनी लिहिले आहे, हेही विसरून चालणार नाही. नेने आणि टिळकांचे संबंध पुढच्या काळात जवळचे होते, असे केळकरांनी नमूद केले आहे. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत टिळकांच्या विश्वासाला संपूर्णपणे नेने पात्र झाले होते, असाही उल्लेख त्यांच्या टिळकचरित्रात आहे. ‘न्यू इंग्लिश शाळा’ आणि ‘डेक्कन कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी पैसे जमवले, याचेही उल्लेख अढळतात. पुणे, मुंबईत सभा भरून जाहीर वर्गण्या जमा झाल्याच्या नोंदी टिळकांच्या बहुतेक चरित्रात सापडतात. (टिळकांच्या आठ-दहा चरित्रकारांनी आपापल्या टिळकचरित्रात हे उल्लेख केले आहेत. अनेक विखुरलेल्या उल्लेखांचे हे एकत्रीकरण म्हणावे लागेल.)

खटल्यासाठी देणग्या गोळा करण्याच्या निमित्ताने एक निराळा योगायोग जुळून आला. कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटक बसवले आणि आणि त्यातून येणारा निधी टिळक-आगरकरांच्या खटल्यासाठी देणार, असे जाहीर केले. या नाटकात गोपाळ कृष्ण गोखले या तरुणाने ‘स्त्री’ पात्राची भूमिका साकारली, असे म्हणतात. टिळक-आगरकरांच्या सुटकेनंतर महाविद्यालयात झालेल्या पानसुपारीच्या कार्यक्रमात गोखले यांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यातील पहिले भाषण केले, अशीही नोंद काही चरित्रकार घेतात. पुढच्या काळात टिळक-गोखले वादाच्या पार्श्वभूमीवर हा पूर्ववृत्तांत काहीसा सुखावून जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात खटल्यासाठी मदत उभी राहिली, पण तरीही १०१ दिवसांची का होईना, शिक्षा या दोघांच्या नशिबी होती, असेच म्हणावे लागेल. अवघ्या पंचविशीच्या वयात या दोघा संपादकांनी दाखवलेल्या धडाडीमुळे तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात सत्कार व्हावा, अशी लोकांची इच्छा होती. ‘दीनबंधू’ वृत्तपत्रात उल्लेख आढळतो-‘अन्यायाने या उभय होतकरुंस कारागृह प्राप्त झाले आहे, तर त्यांच्या मनातून सजेविषयी तीळमात्र न राहू देण्याकरिता, ते सुटतील तेव्हा त्यास मानपत्र द्यावे व तुरुंगातून सुटतेवेळेस एका मोठ्या रथात त्यांना बसवून वाजतगाजत इच्छिलेले स्थळी पोहोचवावे. असे करण्यास आम्ही मुखत्यार आहो.’ त्यापूर्वी म्हणजेच त्यांच्या सुटकेपूर्वी दोन दिवस, २४ ऑक्टोबरच्या ‘केसरी’च्या अंकात या सत्काराला आणि वाजतगाजत मिरवण्याला टिळक-आगरकरांनी नम्रतापूर्वक नापसंती दर्शवली आहे, असे दिसून येते. आमच्या हातून हा सन्मान मिळवण्याजोगे काही झालेले नाही. लोकांनी सन्मान देण्याची इच्छा दाखवली हेच पुरेसे आहे. आम्हाला मिरवण्याची गरज वाटत नाही. अशा आशयाचे उत्तर टिळक-आगरकरांनी दिले आहे.

 

लोकशक्तीला मात्र या दोघांचे मोठ्या प्रमाणात स्वागत व्हावे, असेच वाटत होते. २६ ऑक्टोबर, १८८२ रोजी टिळक-आगरकरांची सुटका झाली. सुटकेपूर्वी (तुरुंगाजवळ) सुमारे शंभर-सव्वाशे गाड्या आलेल्या असून लोकसमाज सुमारे दोन हजारांवर जमला होता. कोणी एक जुन्नरचा उपदेशक पहाटे ४ वाजताच मोठी घोड्यांची गाडी, टिळक-आगरकरांस पागोटे, शालजोडी, पोशाख घेऊन तुरुंगाच्या दारापाशी आला. अशी आठवण भाऊसाहेब आठवले यांच्या ‘चक्षुवैसत्यं वृत्तांता’त सापडते. टिळक-आगरकरांच्या सुटकेचा ‘केसरी’तील वृत्तांत फार थोडा आहे. आपल्याच वर्तमानपत्रातून आपलेच कौतुक करणे, ही समाजात रूढ असलेली पद्धत टिळक-आगरकरांना मंजूर नव्हती, याचे हे द्योतक म्हणावे लागेल. ‘केसरी’पेक्षा सविस्तर वर्णन दि. २९ ऑक्टोबरच्या ‘नेटिव्ह्स ओपिनीयन’च्या अंकात सापडते. लोकांच्या उत्साहाचे वर्णन पुढीलप्रमाणे, ‘सुटका होण्याची बातमी अगोदर शहरात सर्वत्र पसरली असल्यामुळे तुरुंगाच्या बाहेर मित्रमंडळींची व लोकांची अतिशय गर्दी झालेली होती. जमलेल्या लोकांनी टिळक-आगरकर व बखले यांच्या गळ्यात घालण्याकरिता हारतुरे, गजरे वगैरे आणले असून शिवाय जमलेल्या लोकांस वाटण्याकरिता पेढे, विडे, अत्तर वगैरे सामानही आणण्यात आले होते. सुटका होण्याच्या अगोदर सुमारे पाच-चार मिनिटे चार-पाच माणसे बसण्यासारखी उघडी गाडी तुरुंगात नेण्यात येऊन तीत तिघाजणांसह बसवून आणिले व तुरुंगातून गाडी बाहेर पडताच तिघांच्याही गळ्यात हार घालणे वगैरे समारंभ झाला. तिघेजण बाहेर आल्यावर एका गाडीत रा. टिळक व एका गाडीत रा. आगरकर व बखले याप्रमाणे बसवून पानसुपारी व पेढे वाटणे सुरू होऊन गाड्या उत्तर दिशेने निघाल्या. रस्त्याच्या दुतर्फा घरांच्या व दुकानांच्या ओट्यांवरून व खिडक्यांमधून लोकसमुदाय या त्रिमूर्तीकडे पाहत असून तुरुंगातून मुरारजींच्या बंगल्यापर्यंत ५००-६०० लोक त्यांच्यासोबत आले होते. कित्येक लोकांनी आपल्याला झालेला आनंद प्रदर्शित करण्याकरिता गरीब भिकार्‍यास पैसा वाटण्यात आल्याचे अढळते. यावेळी रा. नारायणराव लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे वगैरे ब्राह्मणेतर पुढारी ब्राह्मणांच्याही पुढे होते. दोघांना गाडीत घालून शहरात आणल्यानंतर मोरारजी गोकुळदास यांचा बंगला, ‘दीनबंधू’ पत्राची कचेरी, युनियन क्लब, माधवदास रघुनाथदास यांचा बंगला व इतर काही ठिकणी शेकडो हजारो लोकांनी त्यांचा सत्कार केला,’ अशा नोंदी आहेत. पुण्याला येण्यापूर्वी रेल्वे थांबवून खडकी स्थानकावर काही विद्यार्थ्यांनी टिळक-आगरकर यांचा सत्कार केला असेही सांगितले जाते. पुण्यात आल्यावर सार्वजनिक सभेसह ठिकठिकाणी या दोघांचा सत्कार झाला, भाषणेही झाली.


टिळक
-आगरकरांचा हा सत्कार सरकारी गोटात खपला नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सत्कारात डेक्कन महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि काही वकील मंडळींचा समावेश होता. यावरून डेक्कन महाविद्यालयाचे म्हणजेच सरकारचे विद्यार्थी आणि सरकारच्या मेहरबानीने कायद्याचा धंदा करणारे वकील हे, तीन महिने सजा भोगून आलेल्या गुन्हेगारांचा सत्कार कसा करतात?याबद्दल त्यांचे कान पिळावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांकडे काही कर्मचार्‍यांनी पाठवल्याची नोंद आहे, असे न. र. फाटकांनी त्यांच्या टिळकचरित्रात नमूद केले आहे. टिळक-आगरकरांचे सनातनी मित्र या खटल्याच्या प्रसंगी कामी आले नाहीत, या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी खुद्द आगरकरांनी डोंगरीच्या आठवणीत लिहून ठेवलेले वाक्य पुरेसे आहे. आगरकर म्हणतात, “वर्तमानपत्र काढून पुरे एक-दोन वर्ष झाले न झाले तो आम्हावर एक दोन बिकट प्रसंग येऊन गेले व त्यातून आम्ही निभावलो, हे केवळ अनेक ममताळू मित्रांच्या मदतीमुळे झाले हे आम्ही प्रांजळपणे कबूल करतो. ” तरीही टिळक-आगरकरांच्या सनातनी मित्रांपेक्षा त्यांचे वैचारिक विरोधक असलेले सत्यशोधक समाजाचे पुढारी अडचणीच्या प्रसंगी धावून आले, असे म्हटले जाते आणि याला काहीसा जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतो. या संपूर्ण खटल्यात उरवणे नावाचे व्यापारी हे जामीन म्हणून पुढे आले. जोतिबा फुलेंच्या सांगण्यावरून त्यांनी तसे केले, असेही सांगितले जाते. या प्रकरणातील नेमके सत्य काय, याचा परामर्श ऐतिहासिक साधनांच्या आधारे घ्यायलाच हवा.

(क्रमशः)

पार्थ बावस्कर

९१४६०१४९८९