त्यांनी जपला ज्ञानरूपी वसा

    दिनांक  09-Jul-2019   
मैत्रीचा उपयोग समाज उद्धारासाठी करण्याचा अनोखा पायंडा भांडुपस्थित मित्रांनी पाडला. या शाळकरी मित्रांची २००३ ची शाळेची बॅच सुमारे ८ वर्षांनी २०११ साली भेटली. सिमाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, अशी भावना या मित्रामध्ये निर्माण झाली. त्यातूनच मग आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा या समाजासाठी काहीतरी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने १ मे २०११ रोजी ‘उमंग द युथ सोशल फोरम’ची स्थापना झाली.

 

सुरुवातीला केवळ १० सदस्यांपासून ‘उमंग द युथ सोशल फोरम’ची स्थापना झाली. संस्थेची स्थापनाच मुळी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी झाली होती. समाजाला भेडसावणारे प्रश्न मुख्यतः आरोग्य आणि शिक्षणाचे. त्यामुळे संस्थेने या प्रश्नावर काम करण्याचे ठरवले. त्यातूनच मग रक्तदान शिबीर, परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती करण्यासाठी सामाजिक प्रश्नावर आधारित वेगवेगळ्या स्पर्धा, वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा असे अनेक उपक्रम राबविले गेले. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय केवळ स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून निधी उभारला जात होता.

 

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या उमंगच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे उमंगने ‘शिक्षण’ या विषयावर पूर्णवेळ काम करायचं ठरवलं. जिल्हा परिषदेच्या शाळा त्यातही आदिवासी परिसरातील शाळांसाठी काम करण्याचे ध्येय उमंगने योजले. आदिवासी विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षण घेता यावे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरीपाडा विळशेत, तालुका विक्रमगड जिल्हा पालघर ही शाळा साधारण २ वर्षांपूर्वी दत्तक घ्यायचं संस्थेने ठरवलं. डोंगरीपाडा हे मुंबईपासून थोड्याच अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं छोटंसं गाव. या गावातील शाळेला संस्थेने दत्तक घेतले. विद्यार्थी कोंडगाव आतापर्यंत २८ विद्यार्थी १ ली ते ५ वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

 

एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रवास गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करीत आहे.शाळेच्या विकासाचा हा प्रवास येथेच थांबला नाही, तर आदिवासी किंवा ग्रामीण विद्यार्थ्यांनाही संगणक युगाची ओळख व्हावी, यासाठीही उमंगने काम सुरू केले. जानेवारी २०१६ मध्ये पिंपळनेर जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देत ही शाळा डिजिटल करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता शाळेला एलसीडी टीव्ही, संगणक आणि ई-लर्निंग साहित्य देऊन शाळा खर्या अर्थाने संपूर्णपणे डिजिटल करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.

 

खरेतर हा उपक्रम इथेच संपत नाही. कारण, या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत इथल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या. त्यामुळे विद्यार्थी चौकटीबाहेरचे शिक्षण घेऊ लागला. जे शिक्षण सध्याच्या युगात महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये जल शुद्धीकरण यंत्रे लावण्यात आली. गेली ३ वर्षे परिसरातील इतर गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे नियोजन केले जाते. प्रागतिक विद्यालय, भांडुप येथील गरजू विद्यार्थ्यांना संस्था शैक्षणिक मदत करते.

 

प्रोजेक्ट शिक्षा अंतर्गत संस्थेने शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. तसेच संस्था दत्तक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. तसेच भारतीयत्वाचे बंध जपताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या आश्रमासाठी धान्य आणि इतर वस्तूंची मदतही संस्था करते. शिक्षण या मूलभूत प्रश्नावर काम करतानाच सामाजिक आरोग्य आणि जीवनातील निखळ आनंद सर्वांना मिळावा, ‘प्रोजेक्ट हेल्थ’ आणि ‘प्रोजेक्ट स्माईल’ अंतर्गत वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे केली जाणारी मदत तसेच नैसर्गिक अथवा इतर संकटकाळात सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प करण्यात आला. दिवाळीनिमित्त संस्थेचे पदाधिकारी आदिवासी पाड्यात फराळ वाटप करतात. हा एक आनंदसोहळाच असतो. यावेळी या पाड्यांवर रोषणाईही संस्थेतर्फे करण्यात येते. दिवाळीचा सण आपल्या आदिवासी बांधवांबरोबर करण्याचा हा उपक्रम बहुतेक सगळ्याच संस्था करत असतात. पण या आदिवासी पाड्यांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवत, त्यांच्या विकासासाठी नवनवीन योजना कार्यान्वित करण्याचे काम संस्था करते.

 

संस्थेच्या पदाधिकार्यांशी बोलले असता त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजना सांगितल्या. किमान ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे लक्ष्य आहे, दत्तक घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची डागडुजी करायची आहे, जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृहांची उभारणी करायची आहे. दुर्गम भागातील शाळांमध्ये विजेची समस्या सोडविण्यासाठी सौर उर्जेची सोय उपलब्ध करून देत शाळांना स्वावलंबी बनवायचे आहे, विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचनालयाची उभारणी करायची आहे.

 

त्याचप्रमाणे मुंबईतील गरजू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबविणे, दत्तक शाळांमधील विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन आणि व्यावसायिक प्रशिक्षण, दुर्गम आदिवासी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रगत शेतीप्रधान रोजगार निर्मिती करणे, दुर्गम ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे राबविणे, भावी पिढीला सुशिक्षित तसेच सुसंस्कृत बनविण्यासाठी विविध मार्गदर्शन शिबीर राबविणे यासारख्या अनेक समाजोपयोगी योजना आगामी काळात संस्थेने आखल्या आहेत. संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यासाठी तनमनधनाने काम करत आहेत. या सर्वांच्याच मनात एक उमंग आहे की, येणार्‍या कालावधीत गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्यातही चांगल्या भविष्याची उमंग निर्माण करावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat