जंगलासाठी लढणारी ‘लेडी टारझन’

    दिनांक  31-Jan-2019   

 


 
 
 
वनसंरक्षणासाठी झटणाऱ्या समाजसेविका जमुना टुडू यांचा यथोचित गौरव करत यंदा केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 

अन्य जातसमूहांपेक्षा मागास समजल्या जाणाऱ्या वनवासी समुदायाच्या महिला देशाची सर्वात महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती जंगल आणि हिरवाईला वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावत क्रूर वनमाफियांचा सामना करत असतील, तर ती भारतीय समाजमनातली एक असाधारण घटनाच म्हटली पाहिजे. आज जाणून घेऊया, भारताच्या अशाच एका वनवासी महिलेबाबत व तिने सुरू केलेल्या संघर्षाबद्दल.

 

झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्याच्या मुतुर्खुम गावातल्या वनवासी महिलांचा समूह तिथे जंगलाच्या सुरक्षेसाठी दररोज अगदी पहाटेपासूनच गस्तीवर निघतो. गावाच्या जवळचे जंगल बहुमोल अशा साल वृक्षांनी भरलेले आहे, ज्याची तस्करी वनमाफियांद्वारे केली जाते. मजबूत काठ्या, तीरकमठा, भाले आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन कामगिरीवर निघणाऱ्या या समूहाचे नेतृत्व करतात जमुना टुडू. १९९८ साली जमुना टुडू यांचा विवाह मुतुर्खुम गावातल्याच एका व्यक्तीशी झाला. पुढे गावाच्या आसपास असलेल्या जंगलाचे, वृक्षांचे संरक्षण करण्याची इच्छा जमुना टुडू यांच्या मनात जागृत झाली व त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला मात्र जमुना टुडू यांच्या पदरी निराशाच पडली. गावातल्या महिलांची सोबत जमुना यांना मिळाली नाही. पण त्यांनी हार न मानता काम सुरूच ठेवले. गावातल्या महिलांचे म्हणणे होते की, जंगल वाचवण्यासाठी आपल्याला गावातल्या पुरुषांच्याविरोधात भूमिका घ्यावी लागेल. ज्याला इथल्या महिलांची भीती, दडपण वा पुरुषांच्या वर्चस्वाला असलेल्या मूकसंमतीमुळे मंजुरी नव्हती. पण नंतर मात्र जमुना टुडू यांनी गावातल्या लोकांनाच प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर जंगलच राहिले नाही तर आपण सगळे श्वास कसा घेणार? जंगलात राहणारे सगळेच प्राणी-पक्षी, जीव-जंतू कुठे जातील? अखेर प्रत्येक घरात जाऊन, घरातल्या सदस्यांना जमुना टुडू जंगलाचे महत्त्व समजावून सांगू लागल्या. तरीही २००४ सालापर्यंत जमुना यांच्याबरोबर चारच महिला आल्या. म्हणजेच सहा वर्षांत केवळ चारच माणसांना जंगलाचे महत्त्व व आवश्यकता समजली!

 

असे असले तरी इच्छाशक्ती असली की, मार्ग दिसतो, या उक्तीचा प्रत्यय हळूहळू का होईना जमुना टुडू यांना येऊ लागला. २००४ नंतर जमुना टुडूंच्या अभियानाला महिलांच्या बरोबरीने पुरुषांचेही समर्थन मिळू लागले. पण हे काम एकट्या-दुकट्याने होण्यासारखे नव्हते, तर त्याला नियोजन, वेळापत्रक व एकमेकांची पुरेशी साथही गरजेची होती. म्हणूनच संघर्षात सुरू झालेल्या या कामाला संघटित रूप देण्यासाठी जमुना टुडू यांनी ‘वन सुरक्षा समिती’ची स्थापना केली. आज या समितीत जंगलाची काळजी घेणाऱ्या, सुरक्षा करणाऱ्या ६० सक्रिय महिला सदस्या आहेत. या महिला आता दररोज तीन वेळा क्रमाने सकाळ-संध्याकाळ जंगलात गस्तीला जातात. इथल्या झाडांवर, नैसर्गिक साधनसंपत्तीवर लक्ष ठेवतात. एखादा वनमाफिया जंगलातल्या वृक्षराजीची, वनराईची अवैधरित्या कत्तल तर करत नाही ना, हे त्या पाहतात. पण हे काम वाटते, तितके सोपे नाही. कित्येकदा वनमाफियांशी या महिलांचा समोरासमोर सामना होतो. जंगलाची नासधूस करण्याच्या उद्देशाने आलेल्या वनमाफियांच्या हल्ल्याला या महिला तोंड देतात. कित्येक महिला जखमी होतात, धडपडतात, पण आपला लढाऊ बाणा सोडत नाहीत, हे विशेष.

 

सुरुवातीला वनमाफिया रेल्वेच्या साहाय्याने लाकडाची तस्करी करत असत. पण जमुना टुडू यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांनाही आपल्या बाजूने वळवले व हा व्यापार बंद केला. परिणामी, रेल्वेस्थानकातून माघारी परतताना कित्येकदा वनमाफियांनी टुडूंवर घातक हल्ले केले, दगडफेकही केली. पण, त्या बधल्या नाहीत. यामुळेच जमुना टुडूंना इथले लोक ‘लेडी टारझन’ म्हणूनही ओळखू लागले. दुसरीकडे इथे कोणत्याही घरात मुलीचा जन्म झाला की, सालाची १८ रोपे लावली जातात. मुलीचे लग्न होताना यापैकी १० झाडे संबंधित कुटुंबाला दिली जातात. रक्षाबंधनाचा सण संपूर्ण गावकरी झाडांना राखी बांधून साजरा करतात. वनविभागाही जमुना टुडूंना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करतो. जमुना टुडूंच्या कामामुळे आज या वनवासी गावात उत्तम शाळा व पक्क्या रस्त्यांचीही उभारणी झाली आहे. शाळा व कूपनलिकेसाठी जमुना टुडूंनी आपली जमीनही दान केली आहे. म्हणजेच जंगल, वृक्षराजी व हिरवाई वाचविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे गावाचा सर्वांगीण फायदा होत आहे.

 

जमुना टुडूंच्या या मोहिमेने आज देशव्यापी रूप घेतले आहे. आतापर्यंत जमुना टुडूंच्या पुढाकाराने जंगलांच्या रक्षणासाठी १५० समित्या सुरू करण्यात आल्या आहेत, ज्याचे सहा हजार सदस्य आहेत. जमुना टुडूंच्या या निसर्गाशी नाते सांगणाऱ्या कार्याचा गौरव २०१३ च्या ‘अ‍ॅक्ट ऑफ सोशल करेज’च्या श्रेणीत ‘गॉडफ्रे फिलिप्स ब्रेव्हरी’ अ‍ॅवार्ड आणि २०१४ साली स्त्री शक्ती पुरस्कार, २०१६ च्या राष्ट्रपती पुरस्कार आणि २०१७ च्या नीति आयोगाच्या वनसंरक्षणासाठी असलेल्या ‘वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ अ‍ॅवार्डद्वारे करण्यात आला. वनसंरक्षणासाठी झटणाऱ्या या समाजसेविकेचा यथोचित गौरव यंदा केंद्र सरकारनेही करत जमुना टुडूंना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर केला. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे जमुना टुडूंच्या या कार्याला व जिद्दीला सलाम!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/